प्रश्नोत्तरे

question answer
question answer

माझ्या वडिलांना दोन महिन्यांपूर्वी हार्ट ॲटॅक आला होता. त्यांच्या दोन हृदयवाहिन्यांमध्ये अवरोध असल्याचे तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले. त्यांना दम लागतो असे वाटते. डॉक्‍टरांनी लवकरात लवकर अँजिओग्राफी करण्यास सांगितले आहे. तरी या बाबतीत आपण मार्गदर्शन करावे.
... झंवर 

उत्तर - हृदयवाहिन्यांमध्ये अवरोध असला, की सहसा शस्त्रकर्माचा पर्याय सुचवला जातो. मात्र जोपर्यंत अवरोध होण्याची प्रवृत्ती दूर होत नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा अवरोध तयार होऊ शकतात. त्यामुळे सरळ शस्त्रकर्माचा निर्णय न घेता अवरोधाची प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आहार-आचरणात बदल करणे, औषधे, उपचार घेणे हे श्रेयस्कर असते. यामुळे हृदयगाची सर्व लक्षणे क्रमाक्रमाने कमी होतात, तपासणी केली तर अवरोधसुद्धा कमी झाल्याचे, बऱ्याचदा नष्ट झाल्याचे निदर्शनास येते. यादृष्टीने वैद्यांच्या सल्ल्याने ‘कार्डिसॅन प्लस’सारखे चूर्ण सुरू करता येईल. त्रिफळा गुग्गुळ, ‘हृदसॅन’सारख्या गोळ्या, ‘संतुलन सुहृदप्राश’सारखे रसायन घेण्याचा उपयोग होईल. नियमित अभ्यंग करणे, नियमित चालायला जाणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पंचकर्म, हृदबस्ती करून घेण्याचाही उत्तम फायदा होईल.

माझे वय ३० वर्षे असून, मला नऊ महिन्यांची मुलगी आहे. बाळंतपणानंतर माझ्या नाकावर नाकपुडीच्या वर काळी रेष तयार झाली आहे. अनेक उपचार झाले, पण रेष कमी होत नाही. कृपया आपला सल्ला मिळू शकेल का?   ...गायत्री कुलकर्णी

उत्तर - बाळंतपणानंतर शरीरात जे बदल होतात त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची लक्षणे उद्‌भवू शकतात. बाळंतपणानंतर वाढलेला वात कमी करण्यासाठी, तसेच रक्‍तशुद्धीसाठी पंचतिक्‍त घृत घेण्याचा तसेच ‘मंजिष्ठासॅन’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन रोझ ब्युटी तेल’ लावण्याचा, तसेच स्नानाच्या वेळी चेहऱ्याला ‘सॅन मसाज पावडर’ चोळून लावण्याचा फायदा होईल. रोज सकाळी ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष करण्याचाही उपयोग होईल. दही, टोमॅटो, अननस, वाटाणा, कुळीथ, चवळी, आंबवलेले पदार्थ टाळणे श्रेयस्कर होय.

माझ्या मुलीचे वय १९ असून तिच्या स्त्रीबीजाची वाढ व्यवस्थित होत नाही. यासाठी कृपया उपाय सुचवावा. तसेच कोरफडीचा वापर कसा करावा यासाठी मार्गदर्शन करावे.
... सावंत

उत्तर - अनियमित पाळी किंवा स्त्रीबीज तयार न होणे, वेळेवर न फुटणे वगैरे त्रासांवर जितक्‍या लवकर आणि योग्य म्हणजे नैसर्गिक द्रव्यांच्या मदतीने उपचार होतील तितके चांगले असते. यासाठी रोज सकाळी चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेणे चांगले असते. कोरफडीची पात काढून ठेवता येते. साधारण एक ते दीड सेंमी आकाराचा तुकडा कापून, त्यावरची साल काढून टाकून आतील गर रोज सकाळी नाश्‍त्यापूर्वी पाण्याबरोबर घेता येतो. अशा प्रकारे कोरफडीचा गर कायम घेतला तरी चांगले असते. याशिवाय शतावरी, अशोक, आवळा वगैरे स्त्रीसंतुलनासाठी मदत करणाऱ्या वनस्पतींपासून बनविलेली, शतावरी कल्प, अशोकादी घृत, धात्री रसायन वगैरे रसायने सेवन करणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे हे उपाय योजणेही चांगले. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने नेमके उपचारही सुरू करणे सर्वांत श्रेयस्कर.

माझे वय ५९ वर्षे असून, तरुण मित्रांच्या नादी लागून मी विसाव्या वर्षापासून धूम्रपान करत होतो. गेल्या सहा वर्षांपासून मी धूम्रपान पूर्ण थांबविले आहे, परंतु आता छातीत कफ तयार होतो व तो सहजपणे निघत नाही. त्यामुळे मोकळा श्वासोच्छ्वास करता येत नाही. मुद्दाम खोकले की थोडा वेळ बरे वाटते. तसेच माझ्या तोंडातही सतत चिकटपणा राहतो. डॉक्‍टरांनी तपासण्या केल्या, त्यात फुप्फुसांचे काम थोडे कमी प्रमाणात होते आहे, एवढेच सांगितले. कृपया उपाय सुचवावा.
... त्र्यंबक मोरे

उत्तर - लहान वयात आणि बरीच वर्षे धूम्रपानाची सवय लागल्याने त्याचा फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. छातीत कफ तयार होण्याची ही प्रवृत्ती कमी करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा तालिसादी चूर्ण मधात मिसळून घेण्याचा, ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेण्याचा फायदा होईल. वैद्यांच्या सल्ल्याने ‘प्राणसॅन योग’, श्वासकुठार घेण्याचाही फायदा होईल. तोंडातील चिकटपणा कमी होण्यासाठी सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना ‘संतुलन योगदंती’ने दात घासणे, ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष करणे चांगले. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, तसेच छातीतील कफ सुटा करण्यासाठी अगोदर छातीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेक करण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली छाती-पाठीवर विशेष वनस्पतींनी तयार केलेल्या पोटलीने अभ्यंग व स्वेदन करण्याचाही फायदा होईल.  

आपल्या लेखातून आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असणाऱ्या खूप गोष्टींचे उत्तम मार्गदर्शन होते. माझे वय ३५ वर्षे आहे. मला दोन-तीन वर्षांपासून कंबरदुखीचा खूप त्रास आहे. तपासण्यांमध्ये काही सापडत नाही, मात्र कंबर खूप आखडते व खूप वेदना होतात. तरी कृपया यासाठी मार्गदर्शन करावे.
... शुक्रदर्शन

उत्तर - आखडणे, वेदना होणे ही लक्षणे वाताशी संबंधित असतात. वातदोष कमी करण्यासाठी अभ्यंग हा सर्वोत्तम असतो या दृष्टीने रोज सकाळी स्नानापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी पाठीच्या कण्याला खालून वर या दिशेने ‘संतुलन कुंडलिनी तेल’ जिरविण्याचा उपयोग होईल. तूप-साखरेत मिसळून ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ तसेच ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. पाठीमध्ये नेमक्‍या ज्या ठिकाणी वेदना होतात ती जागा एरंड, निर्गुडी पाने, शेवगा यापैकी मिळतील ती पाने वाफवून त्याच्या साह्याने शेकण्याचा उपयोग होईल. दूध, खारीक, खसखस, डिंकाचा लाडू वगैरे गोष्टींचा आहारात समावेश करण्याचाही उपयोग होईल. वाटाणा, चवळी, चणे, मैद्यापासून बनविलेले पदार्थ, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर वगैरे वात वाढविणारे पदार्थ टाळणे श्रेयस्कर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com