प्रश्नोत्तरे 

प्रश्नोत्तरे 

माझ्या आईला झोप कमी लागते. गेल्या वर्षापासून तिचे डोके दुखते आहे. कधी कधी डोक्‍याची वरची बाजू जड झाल्यासारखी वाटते, कधी कधी तिची मानही दुखते. डॉक्‍टरांनी बऱ्याच तपासण्या केल्या, सर्व रिपोर्टस्‌ व्यवस्थित आहेत. तरी यावर योग्य मार्गदर्शन करावे. कधी कधी ती गोंधळून जाते, चलबिचल होते.
- महेश पाटील
उत्तर -
मन शांत, स्थिर राहण्यासाठी, गोंधळून न जाण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची असते. अपुऱ्या किंवा अशांत झोपेमुळे शरीरातील वात व पित्त हे दोन्ही दोष बिघडतात व त्यातून डोके दुखणे, जड होणे, मान दुखणे वगैरे वर उल्लेख केलेले सर्व त्रास होऊ शकतात. तेव्हा सर्वप्रथम आईला झोप शांत लागेल यासाठी मदत करणारे उपचार योजायला हवेत. उदा. रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करणे, संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे, टाळूवर दोन-तीन थेंब ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे, नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन  थेंब टाकणे या उपायांची मदत होईल. ‘निद्रासॅन’ तसेच ‘रिलॅक्‍स सॅन सिरप’ घेण्याचा, आहारात किमान चार-पाच चमचे घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे, अधूनमधून रक्‍तदाब तपासून घेणे चांगले. 

***********************************************
माझे वय पन्नास वर्षे असून गेल्या आठवड्यात जेवणाअगोदर व नंतर  रक्‍ततपासणी केली असता रक्‍तामध्ये साखरेचे प्रमाण अनुक्रमे ११० व १४० असे आले. तरी साखरेचे प्रमाण यापेक्षा अधिक वाढणार नाही व ते नियमित राहील यासाठी मार्गदर्शन करावे.
- वेदपाठक
उत्तर -
रक्‍तातील या साखरेच्या प्रमाणावरून मधुमेह असे निदान करता येणार नाही, मात्र आपण उल्लेख केल्याप्रमाणे हे प्रमाण या पेक्षा अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न नक्की करता येतील. नियमित चालणे, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, ज्योतिध्यान यासारखी योगासने, योगक्रिया करणे यांचा उपयोग होईल. रात्रीचे जेवण उशिरा न करणे व ते पचण्यास सोपे असणे, विशेषतः ताज्या द्रवपदार्थांचा (सूप, कढण वगैरे) समावेश असणे चांगले. बाजारात मिळणाऱ्या मिठाया, दूध, आटवून तयार केलेले गोड पदार्थ, सिताफळ, चिकू, फणस, आंबा, दही, दिवसा झोपणे या गोष्टी वर्ज्य करणे आवश्‍यक. मात्र दिवसभरात दीड ते दोन चमचे साखर खायला हरकत नाही. मधुमेह होऊ नये यासाठी पचन सुधारणे, विशेषतः पॅनक्रियाची व यकृताची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी आयुर्वेदात उत्तमोत्तम औषधे असतात. यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे चांगले. बरोबरीने शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी करून घेणे सर्वांत श्रेयस्कर. 

***********************************************

मी बोलताना अडखळतो. काही अक्षरे पटकन बोलता येत नाही. तरी यावर काही औषधे असतील तर मला कळवावीत.
- विलास 
उत्तर -
प्रश्नात आपल्या वयाचा, व्यवसायाचा उल्लेख नाही. पण सहसा या समस्येवर स्थानिक व मेंदूवर अशा दोन्ही प्रकारे काम करावे लागते. बऱ्याचदा अशक्‍त मानसिकता, असुरक्षितता ही कारणे सुद्धा अशा त्रासाला कारणीभूत असू शकतात. तेव्हा नेमके निदान करून वैद्यांच्या सल्ल्याने औषधे सुरू करणे सर्वांत चांगले. तत्पूर्वी ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष करणे (म्हणजे अर्धा ते एक चमचा तेल नुसते किंवा थोड्या पाण्यात मिसळून तोंडात दहा मिनिटांसाठी धरून ठेवणे) हे उपाय सुरू करता येईल. वेखंड, अक्कलकरा, जटामांसी, पिंपळी यांचे चूर्ण मधात मिसळून जिभेवर चोळणे, सकाळ-संध्याकाळ सारस्वतारिष्ट तसेच ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेणे हे उपाय योजता येतील. आवश्‍यकता वाटली तर ‘स्पीच थेरपिस्ट’चा सल्ला सुद्धा घेता येईल. 

***********************************************
आपण ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये गोमूत्राचे फायदे समजावले होते. सध्या शहरात योग्य गोमूत्र उपलब्ध होत नाही. शहराबाहेरील वाडी-वस्तीवरून ते आणता येईल, आपण सांगता त्यानुसार ते सात वेळा गाळून घेता येईल, मात्र असे गोमूत्र किती दिवस साठवता येते? ते कशाबरोबर व किती प्रमाणात घ्यायचे असते याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
-मोहन देशपांडे
उत्तर -
गोमूत्र ताजे व त्याच दिवशी घेता येते, ते साठवून ठेवता येत नाही. गोमूत्रावर काही विशिष्ट प्रक्रिया केल्या व त्याचा अर्क काढला तर काही दिवस साठवता येतो, मात्रा तो ताज्या गोमूत्रासारखा प्रभावी नसतो. त्यामुळे खरे पाहता ताजे गोमूत्र घेणे चांगले, एरवी अधून मधून अर्क घेता येईल. ताजे गोमूत्र पारदर्शक आहे याची खात्री करून, ते जाडसर सुती कापडातून सात वेळा गाळून घ्यायचे असते. नंतर त्यात समभाग प्यायचे पाणी मिसळायचे असते. या मिश्रणाचे सहा-सात चमचे रोज सकाळी घेता येतात. यकृत  किंवा किडनीचा विकार असला तर वैद्यांच्या सल्ल्याने याचे प्रमाण ठरवावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com