पावसात जपा !

पावसात जपा !

पावसाळा म्हटले, की पावसात भिजणे, गरमागरम वडापाव-भज्यावर ताव मारणे आणि मस्त एन्जॉय करणे या सगळ्या गोष्टींना उत येतो. मात्र याच पावसाळ्यात रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असते. आसपासचे दवाखाने हाऊसफुल होतात. पावसाळ्यात पाण्यावाटे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असते. हवामानात ओलसरपणा असल्याने सर्दी, ताप यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते. प्रदूषित पाणी आणि आहार यांच्यामुळे आजारपण येण्याची शक्‍यता अधिक असते, त्यामुळे या दिवसांत प्रामुख्याने आहाराच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवे. पावसाळ्यात हवेत दमटपणा बरोबरच थोडा गारवाही असतो. अन्नपदार्थांत जंतू वाढण्याची शक्‍यता असते. या दिवसांत शक्‍यतो ताजे शिजवलेले अन्न खावे. ज्या पदार्थात जास्त प्रमाणात प्रोटीन असते, असे मटण, चिकन, मासे, पनीर, चीज हे पदार्थ या हवेत लवकर खराब होण्याची शक्‍यता असते, त्यामुळे हे पदार्थ फ्रिजमध्येच ठेवावेत. पावसाळ्यात दूषित अन्न ग्रहण केल्याने पोटात जंतुसंसर्ग होतो. पावसाळ्यात हलके अन्न ग्रहण करावे, डाळी, कडधान्ये, भाकरी, सूप यांचा आहारात समावेश कारावा. विविध भाज्यांचे सूप घेतल्याने प्रतिकारशक्तीही वाढते.

या दिवसांमध्ये अन्नपदार्थ जास्त प्रमाणात शिजवून घ्यावेत. जास्त शिजवलेल्या अन्नात जंतूंची वाढ होण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे अन्न लवकर खराब होत नाही. स्वयंपाक तयार होऊन जास्त वेळ झाला असेल, तर अन्न पुन्हा गरम करा. जेणेकरून त्यात जंतू वाढण्याची शक्‍यता कमी होते. या दिवसांत जास्त मसालेदार आणि तेलकट आहार घेणे टाळा. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका. 

बेकरीतील कोणतेही पदार्थ खात असाल तर त्याची ‘एक्‍सपायरी डेट’ तपासून पाहा.  पावसाळी हवेत या पदार्थांना लवकर बुरशी लागण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे हलका पण योग्य आहार घेणे योग्य ठरते. आहारात मुगाची खिचडी, फळभाज्या, मका यांचा समावेश करावा. पावसाळ्यात अतिआंबट आहार टाळावा. त्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. बाहेरील थंड हवामानाला अनुसरून शरीराचे तापमान ठेवण्यासाठी आलं, सुंठ, गवती चहा, तुळस यांचा चहाच घ्यावा. 

पाण्यामुळे होणारे आजार लक्षात घेता बाहेरील पाणी पिणे टाळावे. उकळून गार केलेले पाणी प्यावे. घराबाहेर पडतानाही आपल्याबरोबर पाणी बाळगावे. मुलांना आणि इतर सदस्यांना घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत द्यायला विसरू नये. फळे खातानाही स्वच्छ धुऊन खावीत. भाजी चिरण्याआधी स्वच्छ पाण्यात चार ते पाच वेळा धुऊन मगच वापरावी. कापून ठेवलेली फळे खाऊ नयेत. बाजारात मिळणारा उघड्यावर ठेवलेला ज्यूस पिऊ नये. पावसाळ्यातील थंडगार वातावरणामुळे तळलेले गरम गरम पदार्थ खाण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही; परंतु हे पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरीच बनवून खाल्ले तर आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही योग्यच असते. बाहेरचे पाणी, तेल यांद्वारा जंतुसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. लहान मुलांना यांपासून दूरच ठेवावे. 

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या मिळतात. त्या जरूर घ्याव्यात; मात्र त्यांच्या स्वच्छतेबाबत जराही हलगर्जीपणा करू नये. स्वयंपाकघरामध्ये आणि एकूणच घरामध्ये कोरडे वातावरण ठेवावे. किचनमध्ये सिंकजवळचा भाग ओला राहणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवसांत माश्‍यांचे प्रमाण अधिक असते. त्यांच्यामुळे जंतुसंसर्ग होत असतो, त्यामुळे अन्नपदार्थ उघडे ठेवू नका. माशांबरोबरच डासांचे प्रमाणही या दिवसांत वाढते. डेंगीसारखे आजार डोके वर काढतात, त्यामुळे घरामध्ये आणि घराबाहेर पाणी साचू देऊ नका. घरामध्ये पाणी साठवणुकीची भांडी उघडी ठेवू नका. कुंड्यांच्या खाली ठेवलेल्या प्लेटमध्ये पाणी साचले असल्यास त्या तत्काळ कोरड्या करा. पावसाळ्यात ओले कपडे वापरल्यामुळे त्वचेच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते. त्यामुळे कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशिनमधील ड्रायरचा वापर करा. शक्‍य असल्यास मुलांचे आणि इतरांचे रोजच्या वापरातील कपड्यांसाठीचे चार सेट तयार ठेवावेत. जेणे करून ओले कपडे घालण्याची वेळ येणार नाही. 

आजारांचे कारण कोणतेही असले तरीही स्वच्छता हाच खबरदारीचा उपाय आहे. हिवताप, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतो. आपल्या आजूबाजूचा परिसरात पाणी साठून राहिल्यास डासांची पैदास होते. अशा ठिकाणी मच्छर प्रतिबंधक औषध फवारणी करून घेणे गरजेचे ठरते.

 कसे वागाल?
मोठ्या पावसात शक्‍यतो घराबाहेर पडू नये.
मजेखातर पहिल्या पावसात भिजणे वेगळे; पण ऐन पावसाळ्यात वारंवार ओले होणे प्रकृतीच्या दृष्टीने योग्य नाही.
बाहेरून आल्यावर ओले शरीर पुसून कपडे लगेच बदलावेत. 
पाय काळजीपूर्वक कोरडे करावेत. अन्यथा पाय सतत ओलसर राहिल्याने बोटांच्या बेचक्‍यात चिखल्या होण्याचा संभव असतो. 
ओले झालेले केस व्यवस्थित वाळवावेत. अन्यथा दमट हवेमुळे जर ते नीट वाळले नाहीत, तर त्यात उवा - कोंडा होण्याचा संभव असतो. तसेच, सर्दी, डोकेदुखीलाही निमंत्रण मिळते.

या काळात थंड वारा वाहत असतो. त्यामुळे कानाचे, कपाळाचे रक्षण व्हावे म्हणून डोक्‍यावर स्कार्फ किंवा मफलर बांधावा.

घरात, कार्यालयात शक्‍यतो पादत्राणे घालून फिरावे. गार फरशीमुळे शरीरात वात वाढण्याची किंवा किडनीला त्रास होण्याची शक्‍यता असते.

व्यवस्थित सुकलेले कपडे वापरावेत. किंचित ओलसर कपड्यामुळे त्वचेला जंतुसंसर्ग होऊन त्वचाविकार होऊ शकतो.

पावसाळ्यात घाम येईस्तोवर व्यायाम करू नये. मात्र साधा व्यायाम नियमित, पण कमी प्रमाणात करावा.

शारीरिक ताण पडला तर आवर्जून विश्रांती घ्यावी.

पावसाळ्यात रात्री जागरण करू नये. दुपारी झोपू नये. 

काय खाल?
पावसाळ्यात हवेप्रमाणे पाण्यातही बदल होतो. म्हणूनच पाणी उकळून पिणे आवश्‍यक आहे. पाणी कमीत कमी वीस मिनिटे उकळले गेले पाहिजे. 

पावसाळ्यात वाताचा प्रकोप होत असल्याने शरीराचा कोरडेपणा वाढवणारे पदार्थ म्हणजे पाव, चुरमुरे, हरभरे, वाटाणा असे पदार्थ खाणे टाळावे. अंडी, मांसाहारही वर्ज्य करणे उत्तम.

ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू ही धान्ये भाजून घेऊन त्यांचा उपयोग करावा. 

दुधी भोपळा, लाल भोपळा, गवार, तोंडली, दोडकी, कारली, भेंडी या भाज्या तसेच, स्वच्छ व चांगल्या पाण्यावर पोसलेल्या पालेभाज्या सेवन कराव्यात. 

मूग, मटकी, तूर, कुळीथ यासारख्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

सफरचंद, पपई, अंजीर या फळांचा, तसेच नारळाचा आहारात समावेश असावा.

ताजे दूध, गोड ताक व घरचे साजूक तूप घ्यावे.

खीर, शिरा, केशरभात, मुगाचा लाडू हे गोड पदार्थ खावेत.

साळीच्या लाह्या, मध, खडीसाखरही खावी. 

जेवणाआधी थोडे आले व लिंबाचा रस एकत्र सेवन करावे. शक्‍य असल्यास त्यात थोडे काळे मीठ व जिरेपूड टाकावी.

गवती चहा, पुदिना, आले, तुळस, साखर टाकून केलेला चहा घ्यावा, म्हणजे सर्दी खोकला होत नाही. पचनशक्तीही वाढते.

केस आणि त्वचेची काळजी
खरेतर पावसाळा हा ऋतू आपल्या सौंदर्यात भरच घालतो; कारण पावसामुळे उष्णता कमी होते व हवेतही ओलावा असतो. त्यामुळे त्वचा रापतही नाही व त्वचेतील ओलावाही टिकून राहतो; तसेच पावसाळ्यात प्रदूषणाचा त्रासही कमी असतो. त्यामुळे एकंदरीतच त्वचा छान राहते. तरीही माझ्या त्वचेला अगदी काहीच त्रास होत नाही, असेही आपण म्हणू शकत नाही; कारण त्वचा व केस आपल्या आरोग्याशीही निगडित असतात व पावसाळ्यात आपल्याला पचनाचा सर्वाधिक त्रास होतो. पाण्यातून होणाऱ्या जंतूंच्या प्रादुर्भावामुळे उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात व पचनसंस्थेला होणाऱ्या त्रासामुळे त्वचेवर मुरूम, पुरळ येतात आणि ठाणच मांडून बसतात. अशा वेळी लगेचच त्यावरही उपाय केल्यास पुढे त्रास वाढत नाही.

पावसाळ्यात किडे, डास यांच्या चावण्यामुळेही त्वचेवर फोड येतात. अशा वेळी त्यावर चंदनाचा लेप लावावा, त्यामुळे दाह पटकन कमी होतो. अशा जागेवर खाजही सुटते; पण कधीही नखाने खाजवू नये, त्यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. बऱ्याच लोकांना धूळ, चिखलाची ॲलर्जी असते. पाय सारखे ओलसर राहून चिखल लागल्यास टाचांना चिरा पडतात व बोटांमध्ये चिखल्या होतात. त्यासाठी फक्त पाय रात्री स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करूनच झोपावे.

पावसाळ्यात त्वचेला फारसा त्रास होत नसला, तरी केसांवर मात्र परिणाम होतो. त्यामुळे त्वचेपेक्षा केसांची अधिक निगा घ्यावी लागते. आपण केस धुतले, की ते बराच वेळ वाळत नाहीत. त्यांची मुळे बराच वेळ ओलसर राहतात. त्यामुळे केस गळू शकतात. खरेतर डोक्‍याची त्वचा ओलसर राहिल्याने ती मऊ होते व त्यामुळे केस विंचरताना, बांधताना थोडे जरी ओढले गेले, तरी ते लगेच मुळासह निघून येतात. हे थांबवण्यासाठी केस धुतल्यावर ड्रायरचा थोडा वापर करून केस सुकतील याची काळजी घ्यावी; तसेच पावसाळ्यात कोंडाही होतो. तो त्वचेवर चिकटून बसतो. नंतर त्याचे रूपांतर खपलीत होते व ती उचकटली गेल्यावर तिथे फोड येतात. सतत पावसाचे पाणी डोक्‍यावर पडल्यास केस ओले राहतात व त्यावर धूळ व अन्य प्रदूषित कण चिकटतात. हवेतही अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू असतात. ते ओलसर त्वचेवर हल्ला करतात व त्यामुळे कोंडा तयार होतो. तो चिकटून बसल्याने खाज सुटते. खाजवल्याने जखम होण्याची शक्‍यता वाढते आणि म्हणून पावसापासून डोक्‍याचे संरक्षण करणे फारच महत्त्वाचे आहे.

जर कोंडा झालाच तर कोंड्यासाठी खास मिळणारे शाम्पू पावसाळ्यात वापरावेत. आठवड्यातून दोनऐवजी तीन वेळा तेल लावून शाम्पू वापरावा. कोंडा फक्त पावसाळ्यातच होत असेल, तर एक चमचा बेसन व पाणी घालून पेस्ट करावी. ती दहा मिनिटे मुळांना लावून नंतर केसांना शाम्पू करावे. बेसन नैसर्गिकपणे केसांना स्वच्छ करते. यानंतरही त्रास जाणवत असल्यास तज्ज्ञ व्यक्तीशी लगेच संपर्क साधावा. पावसाळ्यात सौंदर्य जोपासण्यासाठी स्वच्छता व आहारावर नियंत्रण या दोन गोष्टीही फारच महत्त्वाच्या ठरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com