प्रतिष्ठा ज्ञानाची

प्रतिष्ठा ज्ञानाची

समाजात सुख, शांती, समृद्धी मिळावी अशी इच्छा असेल तर ज्ञानसंवर्धन होणे, ज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त होणे आवश्‍यक आहे. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना योग्य प्रतिष्ठा, मान व मोबदला मिळायला हवा. सतत शिकत राहणे ही आयुष्याची गरज असायला पाहिजे. शिकायचे म्हटले तर शिक्षकाची, गुरूची आवश्‍यकता असते. ज्ञानशक्‍ती असो की इतर शक्‍ती असो, ती वरून खाली म्हणजे मोठ्या प्रवाहातून खाली वाहत येते हे लक्षात घेऊन गुरू किंवा शिक्षक यांना मोठेपणाचा आदर देणे, मान देणे ओघानेच येते.

ज्ञानदान देणारा किंवा शिकविणारा तो शिक्षक असे जर म्हटले तर प्रत्येक दिवस शिक्षक दिन म्हणूनच लक्षात ठेवायला पाहिजे. सतत शिकत राहणे ही आयुष्याची गरज असायला पाहिजे. शिकायचे म्हटले तर शिक्षकाची, गुरूची आवश्‍यकता असते. ज्ञानशक्‍ती असो की इतर शक्‍ती असो, ती वरून खाली म्हणजे मोठ्या प्रवाहातून खाली वाहत येते हे लक्षात घेऊन गुरू किंवा शिक्षक यांना मोठेपणाचा आदर देणे, मान देणे ओघानेच येते. 

मूल जन्माला आल्यानंतर माता ही त्याची सर्वप्रथम शिक्षक असते. आपणा सर्वांना माहीत आहे की, छत्रपती शिवरायांना बालपणापासून मातुःश्री जिजाबाईंनी घडविल्यामुळे त्यांचे सामर्थ्य व प्रताप स्वराज्यासाठी उपकारक ठरले. आई ही आपल्या अपत्याला गर्भात असतानाच शिक्षण, संस्कार देणे सुरू करते. संस्कारी अपत्याचा जन्म झाल्यावर त्याला पुढचे शिक्षण देणे (मातेने किंवा शिक्षकांनी) सोपे होते. शिकण्याची सवय मुळात गर्भातच लागणे चांगले असते, कारण गर्भात असताना फक्‍त श्रद्धा, प्रेम, आदर या गोष्टीच अस्तित्वात असतात, अशा वेळी शिकण्याची निर्माण झालेली आवश्‍यकता व शिकण्याचा आदर जीवनात पुढे चालू ठेवणे सोपे होते. साधारण पाच ते सहा वर्षांपर्यंत आई व वडील हे अपत्याचे शिक्षक असतात. या काळात बालकांना व्यवस्थित वेळ देऊन त्यांनी शिक्षकाची जबाबदारी पार पाडली तर त्यांचा पुढच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेपासून, प्रत्येक मिनिटाला काही तरी शिकायचे, ज्ञान मिळवायचे व ज्ञान देणाऱ्याबद्दल आदर बाळगायचे, ज्ञान देणाऱ्याची सेवा करून त्याच्यापासून ज्ञान मिळवायचे हा स्वभाव बनतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटना बरेच संस्कार करून जातात. म्हणजे निसर्ग एका अर्थाने शिक्षकाचे काम करतो.

आपल्या सर्वांना श्रीगुरू दत्तात्रेयांची गोष्ट माहिती आहे. त्यांनी केलेल्या चोवीस गुरूंमध्ये पर्वत, नद्या, वनस्पती, जीवजंतू वगैरेंचाही समावेश होता. प्रत्येक अस्तित्वाकडून काही तरी शिकता येतेच, पण शिकण्याची सवय लागणे खूप महत्त्वाचे असते. गुरूजी काय शिकवितात यापेक्षा त्यांनी शिकविलेले जीवनात उपयोगी आहे, त्यात ज्ञान आहे व यातूनच जीवन सुखकर होऊ शकते अशी श्रद्धा ठेवून शिकण्याची सवय लागणे हे महत्त्वाचे आहे. 

आपले जीवन सुखकर करणाऱ्या शिक्षकाबद्दल आदर व्यक्‍त करण्यासाठी वर्षातून एक दिवस तरी शिक्षक दिन साजरा केला जातो. शाळेत पहिलीच्या वर्गात श्री गणेशाय नमः पासून सुरुवात करून नंतर अ, आ, इ, ई वगैरे शिकविणाऱ्या शिक्षकांची आठवण काढणे, त्यांनी केलेल्या कार्यासाठी आभार मानणे व त्यांना मान देणे महत्त्वाचे असते. विद्यार्थ्याने शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला व त्यामुळे त्याचे आयुष्य सार्थकी लागले तर ते ज्ञान देणाऱ्याला खूप मोठा आनंद देत असते. वर्गात शिकवले जाते त्यावेळी खिडकीबाहेर पाहणारे, गप्पा मारणारे विद्यार्थी एक प्रकारे शिक्षकाचा अनादरच करत असतात, केवळ शिक्षकाचाच नव्हे तर ज्ञानाचाही अनादर करत असतात. 

ज्ञानाचे महत्त्व कमी झाले की दांडगाई केली जाते किंवा आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू आपल्याला मिळायलाच पाहिजे असा एक समज तयार होतो व ज्याच्याकडे जास्त वस्तू तो मोठा अशी कल्पना मनात रुजते. मनुष्य वस्तूंच्या संग्रहाने नव्हे तर त्याच्याकडे असलेल्या ज्ञानामुळे मोठा होत असतो, ज्ञानदान करणारा देवतुल्य आहे अशी भावना वाढणे आवश्‍यक असते.

या सगळ्यांचा साकल्याने विचार व्हावा या दृष्टीने वर्षातून एक दिवस शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी आपल्या आठवणीतील शिक्षकांना, गुरूंना आदर देणे, त्यांची आठवण ठेवून त्यांना नमस्कार करणे अपेक्षित असते. ज्ञानाचे व ज्ञानदान करणाऱ्याचे मूल्य वाढविण्याने एकूणच जीवनातील मूल्ये वृद्धिंगत होतात. 

सध्या शिकविण्याचा, तसेच शिक्षणाचा धंदा झालेला आहे असा एक सोईस्कर आरोप करून शिक्षणाचे, पर्यायाने शिक्षकदिनाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु शिक्षणाचा धंदा करणारे वेगळे व हाडाचे शिक्षक वेगळे. प्रत्येक क्षेत्रात काही चांगले, काही वाईट असतेच. पण म्हणून शिक्षण हा एक नुसता धंदा झालेला आहे असे म्हणण्यात अर्थ नाही.

शाळा, कॉलेजमध्ये दिलेले ज्ञान किंवा आपल्या हितचिंतकांनी उपलब्ध करून दिलेले अनुभवजन्य ज्ञान असे विविध मार्गांनी ज्ञान मिळतच असते. समाजामध्ये काही चोर असतात, काही अतिरेकी असतात, काही दुष्ट असतात, पण मुळात परमेश्वराने जग बनविताना ते सुंदर, शांत व सृजनशील असेच केलेले असते. काही मंडळी वाईट मार्गाकडे गेली म्हणजे सर्व समाजच वाईट रस्त्याने जात आहे असे नव्हे. समाजात कुठला तरी दोष शोधून काढणारे, त्या दोषाच्या मागे लागून त्रास देणारे, दुसऱ्यांच्या हक्कांवर आक्रमण करणारे, दुसऱ्यांची संपत्ती हिरावून स्वतःचा फायदा करून घेणारे काही लोक असतातच. 

अशाच प्रकारे शिक्षणक्षेत्रातही काही वाईट लोक असू शकतात. याचा अर्थ सर्वच असे वाईट प्रवृत्तीचे असतात असे म्हणणे उचित नाही. आजही अनेक शिक्षक व्यवस्थितपणे, श्रद्धेने व प्रेमाने शिकवत आहेत, यातूनच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक मोठी माणसे तयार झालेली आहेत (कारखानदार, संशोधक, समाजसेवक, राजकारणी, आध्यात्मिक वगैरे). 
समाजात सुख, शांती, समृद्धी मिळावी अशी इच्छा असेल तर ज्ञानसंवर्धन होणे, ज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त होणे आवश्‍यक आहे. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना योग्य प्रतिष्ठा, मान व मोबदला मिळायला हवा. शिक्षकांप्रती आदर दाखवण्यासाठी एक सुरुवात म्हणून शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांची आठवण ठेवून त्यांना नमस्कार करावा. यातूनच पुढे ज्ञानाची उपासना चालू राहू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com