ज्येष्ठांचे आरोग्य

ज्येष्ठांचे आरोग्य

आरोग्यासाठी आवश्‍यक असते निरोगी मन. मुळात मन अनेक विचारांनी भरलेले असते, त्यामुळे ते हेलकावे खात राहते. ते भूत-भविष्यामध्ये कमी-अधिक डोकावत राहील तेवढे त्याचे हेलकावे लहान-मोठे असतात. मनाच्या अस्वास्थ्यामुळेच सर्व रोगांची निर्मिती होते असे म्हटले जाते. म्हणून स्वास्थ्यासाठी मनाचे संतुलन असणे आवश्‍यक असते. 

तरुण वयात काय केले असता उतार वयात त्रास कमी होईल याचा विचार तरुण वयातच करावा लागतो. ज्येष्ठांना कुठल्या प्रकारचे त्रास होऊ शकतात व या सर्व त्रासांवर उपचार कसा करायचा याचा या ठिकाणी विचार करावा लागेल. वय वाढेल तसे शरीर दुर्बल होते हा निसर्गनियम आहे. लहानपणी व तरुणपणी हवी ती काळजी घेऊनही म्हातारपणी त्रास होतो किंवा अशी काळजी न घेतल्याने त्रास होत आहे असा फरक असू शकतो. पूर्वी चांगला प्रकृतीनुरूप योग्य व पौष्टिक आहार घेतला असेल, दूध, तूप, मध, यांचे सेवन केलेले असेल तर म्हातारपणात होणारे त्रास कमी असतात, आटोक्‍यात येण्यासारखे असतात. परंतु पूर्ववयात काळजी घेतली नसल्यास वयपरत्वे होणारे त्रास क्‍लिष्ट असू  शकतात, त्यांच्यावर उपाय करणे अवघड असू शकते. गुजरातीत असलेल्या एका म्हणीचा अर्थ असा आहे की ‘आम्ही लहानपणी तूप-केळे खाल्लेले आहे’. म्हणजे असे की पौष्टिक आहार घेतलेला असल्यास छोट्या-मोठ्या साथीच्या रोगांना किंवा म्हातारपणात होणाऱ्या त्रासांना तोंड द्यायला अडचण येत नाही. ज्यांनी पूर्वी काळजी घेतलेली नाही त्यांनी निदान उतारवयात काळजी घेणे आवश्‍यक असते.

शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या, दुखणारी कंबर-पाठ, दुखणारे गुडघे, अधून मधून होणारे विस्मरण यांचा बाऊ न करता असे निसर्गनियमाने होत आहे असे लक्षात घ्यावे व त्या कशा थांबवाव्या याचा विचार करावा. शरीरात असलेल्या पेशींना, इंद्रियांना अवयवांना अति ताणाखाली ठेवलेले असले तर त्यांना आता तरी ताबडतोब ‘रसायन’ पुरविणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात व भारतीय परंपरेत आवळा हे उत्तम रसायन मानले गेले आहे. तेव्हा आवळ्याच्या ऋतूत आवळा खाणे आणि इतर वेळी आवळ्यांपासून शुद्ध पाठाप्रमाणे बनविलेला च्यवनप्राश खाणे हितकर ठरते. तसेच खारकेची पूड टाकून उकळविलेले दूध रोज पिणे, खजूर खाणे, ताज्या फळांचा रस घेणे किंवा फळे खाणे, पाणी व्यवस्थित पिणे, थंड वारा शरीरातील रसधातूला वाळवतो तेव्हा पावसाळ्यात व हिवाळ्यात गळ्याभोवती स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, स्वेटर वगैरे घालणे, घरातील फरशी थंड असेल तर घरात वावरताना मोजे वापरणे वगैरे काळजी घेणे आवश्‍यक असते. 

ज्येष्ठांनी नक्की करावा असा आणखी एक उपचार म्हणजे मानेच्या वरचा भाग म्हणजे नाक, कान, डोळे, मुख व टाळू यांची शुद्धी करणे व त्यांना ताकद मिळवून देणे. यासाठी नाकात तुपाचे थेंब टाकणे, तोंडात सुमुख तेलासारख्या तेलाचा गंडूष करणे, कानात तेल टाकणे, डोळ्यात औषधी तेल वा तूप घालणे, टाळूवर तेल जिरवणे आवश्‍यक ठरते. यासाठी आयुर्वेदाने निरनिराळ्या प्रकारचे पाठ सांगितलेले आहेत. पाठ, पोट, वगैरे मानेखालच्या सर्वांगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’सारख्या तेलाने मसाज करून घेणे किंवा स्वतःच्या हाताने तेल चोळणे उपयुक्‍त ठरते. तेल लावल्यावर अर्धा-पाऊण तास व्यवस्थित जिरू द्यावे, नंतर पुसून घ्यावे किंवा स्नान करावे. अशा वेळी इतर काम करता येत नाही तेव्हा पेपर वाचता येतो, टीव्ही पाहता येतो. टीव्ही पाहात असताना किंवा गप्पा मारत असताना गुडघ्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेला’सारखे तेल लावावे. आज गुडघे दुखत नसले तरी वय वाढेल तसे अचानक केव्हातरी गुडघे दुखायला सुरुवात होते. म्हणून गुडघ्यांना अधून मधून तेल लावणे इष्ट ठरते. तसेच  पाठीच्या कण्यावर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ जिरविणे उपयोगी ठरते. 

उतार वयात जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा मीठ लावून चघळणे किंवा आल्याचा रस-लिंबाचा-मध हे मिश्रणे घेणे, जेवणानंतर अन्नयोगसारखी गोळी घेणे पचनासाठी मदतरूप ठरते. वयानुसार आतड्यात वात वाढतो त्यामुळे मळ कोरडा होण्याची प्रवृत्ती असते, मळ मऊ व्हावा यासाठी झोपताना मळ पुढे सरकायला मदत करणारे, मळ मऊ होण्यासाठी मदत करणारे, पचनासाठी मदत करणारे सॅनकूल सारखे चूर्ण घ्यावे.

वाचन करताना, टीव्ही पाहताना एक तासानंतर पाच मिनिटे डोळे बंद करून शांत बसावे म्हणजे डोळ्यांवर किंवा मेंदूवर ताण येत नाही. ‘गप्पांच्या ओघात रात्र कशी निघून गेली हे कळलेच नाही’ असे प्रकार या वयात होऊ देऊ नयेत. या वयात कमी बोलावे, वेळेवर झोपावे, हेच इष्ट.

‘आता म्हातारपणी देवधर्म करायला निघाले आहेत’ असे उद्गार आपण बऱ्याचदा ऐकतो. पण याला हरकत नसते. निदान आता तरी ध्यान-धारणा, श्रद्धा, विश्वास वाढविण्यासाठी जे काही करता येईल ते करणे आवश्‍यक असते. परंतु सर्वांत महत्त्वाचे असते घरातील माणसांशी जुळवून घेणे. अनेक दिवस मनात खदखदणारा राग वेळोवेळी दाखवत राहिले तर दुरावा वाढत राहतो आणि ज्येष्ठ व्यक्‍ती एकट्या पडत राहतात. या वयात एकटेपणासारखे दुसरे मोठे दुःख नसते. मुलांवर अति बंधन लादल्यामुळे बंधनातून सुटण्यासाठी मुले परदेशात कायम राहण्याचा मार्ग स्वीकारतात, त्यामुळे ज्येष्ठांची देखभाल करण्यासाठी कोणी जवळ राहात नाही असे अनेकदा दिसते. ज्या मुलांना बोट घरून चालवले, क्वचित प्रसंगी स्वतः उपाशी राहून मुलांना दोन घास भरवले ती मुले आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून देतात, तेव्हा ज्येष्ठांच्या मनात क्‍लेश उत्पन्न होऊ शकतो. आपण हे सर्व कोणासाठी व कशासाठी केले असे त्यांना वाटू लागते. पण यावर त्यांना इलाज मात्र सापडत नाही, पण त्यामुळे मनःस्वास्थ्य बिघडते व प्रकृतीवर परिणाम होतो.  

वृद्धांनी उशिरा उठल्याने कधीच आरोग्य मिळत नाही. कुठल्या तरी देवावर श्रद्धा असल्याशिवाय, पूजा पाठ वगैरेत वेळ  काढता येत नाही. कुठेतरी चांगले ऐकावे, त्यातील दोन वाक्‍ये तरी आचरणात आणावी. आपला वेळ सत्कारणी लावावा. रोज सकाळी  फिरायला जाणे आवश्‍यक असते. तरुणपणापेक्षा आहार थोडा कमी असावा. विशेषतः रात्रीचा आहार तर नक्कीच कमी असावा. आहार पचण्यास सोपा व सात्त्विक असावा. वयाची पंच्याऐंशी ओलांडल्यानंतर तर आहाराची योजना फार काळजीपूर्वक करावी, रात्री शक्‍यतो सूप वगैरे घ्यावे. रोज पंचामृत (दूध, तूप, दही, साखर, मध) अवश्‍य घ्यावे. 

वृद्धांनी स्वतःच्या कुटुंबीयांबरोबर, मित्रमंडळींबरोबर थोडा वेळ घालवावा. जमेल तसा प्रवास करावा. तीर्थक्षेत्री जाऊन मन शांत होत असेल तर तीर्थस्थानाला भेट द्यावी. निसर्गात विहार करावा. असे आचरण ठेवले तर ज्येष्ठांनाही आपले आरोग्य नीट ठेवणे अवघड जाणार नाही व मन शांत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com