आरोग्य ज्येष्ठांचे

आरोग्य ज्येष्ठांचे

वय वाढते तसतशी शारीरिक शक्‍ती कमी होणे स्वाभाविक असते. पूर्वी ज्या गोष्टी सहजतेने करता येत असत, त्या वयापरत्वे करणे अवघड होऊ शकते. परंतु तरीही शारीरिक पातळीवर कार्यक्षम राहण्यासाठी कायम प्रयत्न करत राहायला हवा. नियमितपणे चालायला जाणे, एका ठिकाणी स्वस्थ बसून दीर्घश्वसन करणे, अनुलोम-विलोम प्राणायाम करणे हे उपाय उत्तम होत. शारीरिक तसेच मानसिक पातळीवर आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी संतुलन क्रियायोगसारखी योगासने करत राहण्याचाही उत्तम फायदा होताना दिसतो. वाढत्या वयानुसार येणारे आजार टाळायला आणि एखादा आजार झालाच तर त्यातून बरे होण्यासाठी नियमित योगासने करण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. या वयात वात वाढू नये यादृष्टीने वेळेवर व पुरेशी झोप घेणे आवश्‍यक असते. 
डॉ. श्री बालाजी तांबे

घरात वडीलधारी व्यक्‍ती असणे हे घराचे घरपण वाढविणारी एक गोष्ट असते. वाढत्या वयानुसार अनुभव गाठीला जमणे स्वाभाविक असते, मात्र वय वाढले तरी आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रयत्न करता येतात. 

‘शीर्यते तत्‌ शरीरम्‌’ म्हणजे ‘उलटणाऱ्या प्रत्येक क्षणाला जे कणाकणाने झिजत असते ते शरीर’, अशी शरीराची व्याख्या केलेली आहे. एका बाजूने शरीर झिजणे स्वाभाविक असले, तरी दुसऱ्या बाजूने आयुर्वेदातील रसायन, वयःस्थापन, जराचिकित्सा यांसारख्या उपचारांच्या मदतीने ही झीज भरून काढता येणे शक्‍य असते. 

भूयिष्ठं वर्धते वायुर्वार्द्धक्‍ये ।...सुश्रुत सूत्रस्थान
वयाच्या या अवस्थेमध्ये वातदोषाचे प्राधान्य असते, असेही आयुर्वेद सांगतो. 

बाल, तरुण व मध्य या तीन अवस्थांपैकी बाल्यावस्थेत शरीराचा सर्व बाजूंनी विकास होत असतो, तरुण वयात शरीरात शक्‍ती, मनात उत्साह भरभरून जाणवतो, मध्यावस्थेतही झीज फारशी जाणवत नाही, मात्र यानंतर जसजशी धातूंची संपन्नता कमी होत जाईल तसतशी झीज भरून येण्याची प्रक्रिया मंदावते, यालाच वृद्धावस्था म्हणतात. थकवा जाणवणे, शारीरिक व मानसिक कार्यक्षमता खालावणे, लक्षात राहिनासे होणे, नजर मंदावणे, कमी ऐकू येणे यासारखी लक्षणे वृद्धावस्थेची नांदीस्वरूप असतात. 

निसर्गनियमानुुसार हे बदल होणे अपरिहार्य असले तरी ते शक्‍यतो सावकाश व कमीत कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करणे मात्र नक्कीच शक्‍य असते. त्यासाठी आहार, जीवनशैली, उपचार, व्यायाम, औषधे, तसेच रसायने यांची योग्य योजना करता येते. या वयात वातदोष दिवसेंदिवस वाढणार असतो, धातूंची ताकद कमी होत असते आणि पचनशक्‍ती मंदावलेली असते. त्यामुळे वातशामक, पचायला हलका आणि तरीही शरीराला पोषक अशा अन्नाची योजना करणे भाग असते. त्या दृष्टीने आहारात मुगाची खिचडी, भात, ज्वारी-बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, गव्हाचा फुलका, एखादी फळभाजी, एखादी पालेभाजी, ताक वगैरे गोष्टींचा समावेश करणे चांगले. वय जसजसे वाढते तसतशा शारीरिक हालचाली कमी होत जातात, याचाही पचनावर परिणाम होत असतो, त्या दृष्टीने आहाराचे प्रमाण बदलावे लागते. विशेषतः रात्रीचे जेवण हलके, कमी प्रमाणात घेणे उत्तम असते. यासाठी भाज्यांचे सूप, मुगाचे कढण, नाचणीचे सूप, रव्याची पातळ लापशी वगैरे गोष्टी घेता येतात. शरीराला योग्य प्रमाणात व योग्य प्रकारची स्निग्धता मिळणेसुद्धा आवश्‍यक असते. या दृष्टीने स्वयंपाक शक्‍यतो साजूक तुपात बनवणे, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान पाच-सहा चमचे अंतर्भाव करणे आवश्‍यक असते. 

शरीरधातूंना योग्य पोषण मिळावे यासाठी आहारात अधून मधून गोड पदार्थांचा समावेश करणेही चांगले असते. कधी रव्याचा नारायण शिरा, कधी तांदळाची किंवा शेवयांची खीर, कधी मुगाचा लाडू, कधी साखरीभात अशा गोड पदार्थांचा समावेश करता येतो. मात्र, मधुमेहाचे निदान झाले असल्यास वैद्यांचा सल्ला घेतलेला असावा. गोड पदार्थ किंवा कोणताही अन्नपदार्थ खाताना भरपेट खाणे टाळणेच श्रेयस्कर होय. भूक भागेल पण पोट जड होणार नाही अशा प्रमाणात दिवसातून चार-पाच वेळा थोडे थोडे खाणे चांगले. वात वाढल्याचा परिणाम मुख्यत्वे आतड्यांवर होतो. आतड्यांमध्ये कोरडेपणा वाढला की हळूहळू मलावष्टंभाची प्रवृत्ती तयार होते. पोटात वायू धरणे, गुडगुड आवाज येणे यासारखे त्रासही होऊ लागतात. हे टाळायचे असले तर जेवणापूर्वी रोज एक-दोन चमचे तूप घेणे, रात्री झोपण्यापूर्वी कपभर कोमट पाण्यात एक-दोन चमचे तूप मिसळून घेणे, काळ्या मनुका कोळून तयार केलेले पाणी पिणे, अंजीर खाणे वगैरे उपायांचा उपयोग होतो. बरोबरीने जड कडधान्ये, ढोबळी मिरची, गवार, कोबी, फ्लॉवर, चुरमुरे यासारख्या वात वाढविणाऱ्या गोष्टी टाळणेही आवश्‍यक होय. 

वय वाढते तसतशी शारीरिक शक्‍ती कमी होणे स्वाभाविक असते. पूर्वी ज्या गोष्टी सहजतेने करता येत असत, त्या वयापरत्वे करणे अवघड होऊ शकते. परंतु तरीही शारीरिक पातळीवर कार्यक्षम राहण्यासाठी कायम प्रयत्न करत राहायला हवा. नियमितपणे चालायला जाणे, एका ठिकाणी स्वस्थ बसून दीर्घश्वसन करणे, अनुलोम-विलोम प्राणायाम करणे हे उपाय उत्तम होत. शारीरिक तसेच मानसिक पातळीवर आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी संतुलन क्रियायोगसारखी योगासने करत राहण्याचाही उत्तम फायदा होताना दिसतो. वाढत्या वयानुसार येणारे आजार टाळायला आणि एखादा आजार झालाच तर त्यातून बरे होण्यासाठी नियमित योगासने करण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. या वयात वात वाढू नये यादृष्टीने वेळेवर व पुरेशी झोप घेणे आवश्‍यक असते. वृद्धावस्थेत दुपारी झोपण्यासही हरकत नाही असे आयुर्वेद म्हणतो. झोप शांत लागावी या दृष्टीने झोपण्यापूर्वी पादाभ्यंग, अंगाला ‘संतुलन अभ्यंग तेल’ लावणे, नाकात ‘नस्यसॅन घृता’चे थेंब टाकणे, ‘योगनिद्रा संगीत’ ऐकणे यासारखे उपाय योजता येतात. नियमित अभ्यंग करणे फक्‍त शांत झोपेसाठीच नाही तर एकंदर वातसंतुलनासाठीही उत्तम असते. यामुळे धातूंची संपन्नता टिकून राहण्यास मदत मिळते, रोगप्रतिकारशक्‍ती वाढल्याने रोग होण्यास प्रतिबंध होताना दिसतो.  

या वयात व्यक्‍तीची मानसिकता सांभाळणे सुद्धा महत्त्वाचे असते. घरातील इतर व्यक्‍ती आपापल्या जीवनक्रमात व्यस्त असल्याने एकाकीपणा जाणवू शकतो, असुरक्षित भावनेचाही आभास तयार होऊ शकतो. यावर उत्तम उपाय म्हणजे आपापल्या आवडीनुसार छंद जोपासणे, समाजाच्या भल्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलणे, मनावरचा ताण घालवू शकेल असे एखादे संगीत रोज थोडा वेळ तरी ऐकणे योग्य होय.

औषधे व रसायने - कमकुवत होणाऱ्या इंद्रियांना ताकद देण्यासाठी व त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपचार करता येतात. उदा. नाकात ‘नस्यसॅन घृत’, डोळ्यात ‘संतुलन सुनयन तेल’, कानात ‘संतुलन श्रुती तेल’ टाकता येते. ‘संतुलन सुमुख तेला’च्या साहाय्याने गुळण्या करण्याचा उपयोग होतो. मेंदू शांत राहावा, शेवटपर्यंत कार्यक्षम राहावा यासाठी टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणेही चांगले असते. 

वृद्धावस्था विनासायास पार करायची असेल तर त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नियमित बस्ती घेणे. विशेषतः वातशामक औषधांनी सिद्ध तेलाची किंवा क्षीरबस्ती घेण्याने वाताचे संतुलन होऊन या वयात होऊ शकणाऱ्या त्रासांना प्रतिबंध होऊ शकतो. वृद्धावस्थेसाठी आयुर्वेदाने दिलेले वरदान म्हणजे ‘रसायन’. धातू उत्तम राहावेत, शरीराची झीज कमीत कमी व्हावी एवढेच नाही तर इंद्रिये व मन यांची सक्षमता टिकून राहावी, हृदय व मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे काम व्यवस्थित चालू राहावे यासाठी रसायने उत्तम असतात. वास्तविक रसायने जितक्‍या लवकर सुरू केली असतील तितका गुण चांगला येतो. पण निदान वृद्धावस्थेत तरी रसायनांचा आधार घ्यायलाच हवा. च्यवनप्राश, ‘संतुलन धात्री रसायन’, ‘सॅनरोझ’ यांसारखी रसायने उत्तम होत. 

वय वाढले तरी त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही यासाठी आयुर्वेदाने अशा प्रकारे उत्तम मार्गदर्शन केले आहे. सुरवातीपासून याचा उपयोग करून घेतला तर वाढत्या वयाची धास्ती घ्यावी लागणार नाही, उलट दीर्घायुष्याचा आनंद घेता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com