शुक्ररक्षण

Sperm
Sperm

नुसत्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक संतुलनासाठी आणि एकंदर प्रभावी व्यक्‍तिमत्त्वासाठीच शुक्रधातू संपन्न असणे अत्यावश्‍यक असते. आहाराचे सार असणारा शुक्रधातू हेच शरीरातील परमश्रेष्ठ तेज आहे. म्हणून संयमी बनून शुक्रधातूचे रक्षण करायला हवे.

शरीर धारण करणाऱ्या गोष्टींमध्ये शुक्रधातू महत्त्वाचा समजला जातो. म्हणूनच शुक्ररक्षण हे आरोग्याच्या तीन आधारस्तंभांपैकी एक सांगितलेले आहे. शुक्र हा सातवा धातू म्हणून प्रसिद्ध असला तरी इतर धातूंपेक्षा तो वेगळा आहे. रस-रक्‍तधातू रक्‍तवाहिन्यांमधून संपूर्ण शरीरात वाहत असतात, मांस-मेदधातू शरीराला आकार देतात, अस्थिधातू शरीराचा साचा तयार करत असतो, मज्जाधातू हाडांच्या आत असतो. मात्र शुक्रधातूचे एक ठराविक ठिकाण किंवा अस्तित्व नसते, तर तो संपूर्ण शरीरात, शरीराच्या कणाकणांत, रोमारोमांत व्याप्त झालेला असतो, असेही चरकाचार्य सांगतात.

यथा पयसि सर्पिस्तु गुडश्‍चेक्षौ रसो यथा ।
शरीरेषु तथा शुक्रं नृणां विद्यात्‌ भिषग्वरः ।।
...सुश्रुत शारीरस्थान

ज्याप्रमाणे उसाच्या कांडात रस, दुधामध्ये तूप अप्रत्यक्षतः ओतप्रोत भरलेले असते, त्याचप्रमाणे शुक्रधातूही सर्वांगात व्यापून राहिलेला असतो आणि म्हणून शुक्रधातू शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी जबाबदार असतो. 

उदा. गर्भधारणेसाठी बीज तयार करणे, मैथुनाची इच्छा व क्षमता, निर्भयता, आत्मविश्वास, प्रेमाची व आपुलकीची जाणीव, शारीरिक शक्‍ती, मानसिक उत्साह अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी शुक्रावर अवलंबून असतात. नुसत्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक संतुलनासाठी, एकंदर प्रभावी व्यक्‍तिमत्त्वासाठी शुक्रधातू संपन्न असणे अत्यावश्‍यक होय. म्हणूनच आयुर्वेदाने शुक्ररक्षणासाठी व शुक्रवर्धनासाठी रसायन व वाजीकरण या दोन विशेष शाखा मांडल्या आहेत. 

संयम महत्त्वाचा
पुरुषांमध्ये अभिव्यक्‍त होणारे शुक्र हे शुक्रधातूचा एक भाग असते व ते वायूच्या प्रभावाने शरीराच्या कणाकणांतून शुक्ररूपाने शरीराबाहेर प्रवृत्त होते. म्हणूच शुक्रधातूचा ऱ्हास हा अनारोग्याला कारणीभूत ठरणारा असतो. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत असे होऊ नये यासाठी आयुर्वेदात ‘वैवाहिक ब्रह्मचर्य’ ही संकल्पना दिलेली आहे. शुक्ररक्षणासाठी पाळावयाच्या नियमांचे उल्लंघन न करता गृहस्थाश्रमाचे पालन करणे म्हणजे वैवाहिक ब्रह्मचर्य पाळणे. यामध्ये संयमित मैथुन अध्याहृत आहे. सातत्याने मैथुनाची कल्पना, हस्तमैथुन, मन उत्कंठित करणारी दृश्‍ये, तत्सम वाचन वगैरे टाळणे यातच समाविष्ट आहे. 

अकाली वयात शुक्राची प्रवृत्ती, शुक्राचा ऱ्हास, हा तर फारच निषिद्ध समजला जातो. 

अतिबालो ह्यसंपूर्णसर्वधातुः स्त्रियं व्रजन्‌ ।
उपशुष्येत सहसा तडागमिव काजलम्‌ ।।
...चरक चिकित्सास्थान
लहान वयात जोपर्यंत शरीरधातू पूर्णपणे तयार झालेले नसतात, तेव्हा शुक्र कमी झाले तर कमी पाणी असलेला तलाव जसा उन्हामुळे शुष्क होतो, तसा तो मनुष्य सुकून जातो. अर्थात, त्याची शक्‍ती क्षीण होते. 

लक्षणे जाणा, सावध व्हा!
कारण काहीही असो, पुढील लक्षणे उद्‌भवू लागली तर शुक्ररक्षण करणे गरजेचे आहे हे समजणे श्रेयस्कर होय. 
  शरीरशक्‍ती कमी झाल्यासारखे वाटणे, चक्कर येणे.
  मांड्या गळून जाणे.
  शरीर आळसावून जाणे, उत्साह न वाटणे.
  इंद्रियांची ताकद कमी होणे, विशेषतः जननेंद्रिय उत्तेजित न होणे.
  शुक्र पातळ होणे.
  मैथुनसमयी शुक्राचा स्राव कमी किंवा थोडासाच होणे.
  वेदना होणे, मैथुनाची इच्छा हळूहळू कमी होऊ लागणे.
  मानसिक चिडचिड होऊन नैराश्‍याची भावना जाणवू लागणे.
शुक्रक्षयाकडे दुर्लक्ष झाले तर अनेक समस्या उद्‌भवू शकतात, एवढेच नव्हे तर अकाली मृत्यूही येऊ शकतो. 
हे टाळायचे असेल, तर शुक्ररक्षण आणि त्यापाठोपाठ शुक्रवर्धनासाठी उपाय योजावे लागतात. मैथुनात खर्च झालेली शारीरिक शक्‍ती पुन्हा भरून येण्यासाठी स्त्री-पुरुष दोघांनीही कोमट पाण्याने स्नान करणे, स्नान करताना सुगंधी उटणे वापरणे, गोड, साखरेपासून तयार केलेले थंड पदार्थ, पाणी, दूध पिणे, आवश्‍यक तेवढी झोप घेणे हे आवश्‍यक असते. बरोबरीने शरीरात शुक्रधातू कायम उत्तम स्थितीत राहावा यासाठी दूध, तूप, लोणी, पंचामृताचे नित्यसेवन करणे, गोक्षुर, अश्वगंधा, मुसळी, शतावरी अशा रसायन वाजीकर औषधांपासून बनवलेले कल्प उदा. शतावरी कल्प, संतुलन चैतन्य कल्प, मॅरोसॅन, संतुलन प्रशांत चूर्ण यांसारख्या रसायनांचे सेवन करणे हेसुद्धा श्रेयस्कर असते.  

शुक्रधातू हा दशप्राणायतनांपैकी एक व धातूपरिवर्तनक्रमातील सर्वांत शेवटचा, म्हणूनच सर्वांत शुद्ध व ताकद देण्यात सर्वश्रेष्ठ धातू आहे. रसरक्‍तधातूंप्रमाणे शुक्रधातू हाही द्रव अवस्थेतील धातू आहे. शुक्राच्या स्वास्थ्यावर व उचित प्रमाणावर शरीराची अनेक कार्ये अवलंबून असतात; रोगप्रतिकारशक्‍ती शुक्रावर अवलंबून असते; हृदय, मेंदू वगैरे अवयवांची ताकद शुक्रामुळे असते. 

शुक्राचे रक्षण करण्याने शरीराची तेजस्विता टिकून राहते, रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम राहते, उत्साही वृत्ती कायम राहते. आयुर्वेदाच्या या सूत्रातून शुक्ररक्षणाचे महत्त्व स्पष्ट होते, 

कायस्य तेजः परमं हि शुक्रमाहारसारादपि सारभूतम्‌ ।
जितात्मना तत्परिरक्षणीयं ततो वपुः सन्ततिरप्युदारा ।।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
आहाराचे सार असणारा शुक्रधातू हेच शरीरातील परमश्रेष्ठ तेज आहे म्हणूून संयमी बनून शुक्रधातूचे रक्षण करावे, कारण शुक्राच्या बळावरच शरीर उत्कृष्ट, निरोगी राहते आणि भावी संततीही संपन्न अशी जन्माला येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com