अग्र्यसंग्रह

Til-Oil
Til-Oil

तिळाचे तेल वातदोष आणि कफदोषाचे शमन करण्यासाठी उत्तम असते. या ठिकाणी संस्कृत सूत्रात तैल शब्द वापरला आहे, ज्या ज्या ठिकाणी कोणते तेल हे स्पष्ट केलेले नसते तिथे तिळाचे तेल असे अध्याहृत धरायचे असते. कारण मुळात तीळ या शब्दावरूनच तैल हा शब्द आलेला आहे. तिळाच्या तेलाची  विशेषतः अशी की ते परस्परभिन्न गुण असणाऱ्या वात व कफ या दोन्ही दोषांवर काम करू शकते.

उपचार करताना, तसेच पथ्य ठरविताना चरकसंहितेमधील अग्र्यसंग्रह फार मदतीला येतो. एकच द्रव्य अनेक प्रकारची कामे करू शकते, पण ते एखाद्या कामासाठी सर्वोत्कृष्ट असते. नेमके हेच वैशिष्ट्य चरकाचार्य त्यांच्या या विभागात स्पष्ट करतात. मध कफ-पित्तदोषांना शमविण्यास उत्तम असते आणि तूप वात-पित्तदोषांना संतुलित करण्यासाठी उत्कृष्ट असते हे आपण मागच्या वेळी पाहिले. आज आपण या पुढचा भाग पाहूया.

तैलं वातश्‍लेष्मप्रशमनानाम्‌ - म्हणजे तिळाचे तेल वातदोष आणि कफदोषाचे शमन करण्यासाठी उत्तम असते. या ठिकाणी संस्कृत सूत्रात तैल शब्द वापरला आहे, ज्या ज्या ठिकाणी कोणते तेल हे स्पष्ट केलेले नसते तेथे तिळाचे तेल असे अध्याहृत धरायचे असते. कारण मुळात तीळ या शब्दावरूनच तैल हा शब्द आलेला आहे. तिळाच्या तेलाची  विशेषता अशी की ते परस्परभिन्न गुण असणाऱ्या वात व कफ या दोन्ही दोषांवर काम करू शकते, दोघांनाही संतुलनात आणू शकते. 

तैलं स्वयोनिवत्‌ तत्र मुख्यं तीक्ष्णं व्यवायि च ।
...अष्टांगहृदय
तीळ तेल गुणाने तीक्ष्ण व सूक्ष्म असल्याने शरीरात सर्वदूर पसरणारे असते, वीर्याने उष्ण असते, त्यामुळे वात आणि कफ या दोघांचे शमन करण्यास समर्थ असते. यामुळेच या तेलाची विशेषता अशी की सिद्ध केलेल्या तीळ तेलाच्या अभ्यंगाने स्थूल व्यक्‍तीचे वजन कमी होते, तर कृश व्यक्‍तीचे वजन वाढायला मदत मिळते. म्हणूनच आरोग्य काम ठेवण्यासाठी, बांधेसूदपणा राखण्यासाठी सिद्ध केलेल्या तिळतेलाचा अभ्यंग सर्वोत्तम समजला जातो.

वमनं श्‍लेष्महरणम्‌ - कफदोषाला कमी करण्यासाठी वमन हा उपचार सर्वोत्तम असतो. वमन म्हणजे उलटीद्वारा शरीरातील दोष बाहेर काढून टाकणे. कफदोषाचे शरीरातील मुख्य स्थान आमाशय आणि शरीरावरचा भाग असल्याने तेथील वातदोष मुखाद्वारा म्हणजेच उलटीद्वारा बाहेर काढून टाकणे सर्वांत सोपे व प्रभावी असते. कफदोष अधिक असला, तसेच मुळात व्यक्‍तीची प्रकृती कफप्रधान असली, तर वमन करणे अधिक सयुक्तिक ठरते. 

विरेचनं पित्तहराणाम्‌ - पित्तदोषाला कमी करण्यासाठी विरेचन हा उत्तम उपचार असतो. यात शरीरातील दोष मलमार्गाने बाहेर काढले जातात. पित्त हे मुख्यत्वे लहान आतड्यात राहत असल्याने तेथून बाहेर काढण्यासाठी मलमार्ग हाच जवळचा व सोपा मार्ग असतो. शरीरात उष्णता वाढू नये यासाठी अधूनमधून घरच्या घरी साधे विरेचन घेणेही श्रेयस्कर असते. 
बस्तिर्वातहराणाम्‌ - वातदोषाचे शमन करण्यासाठी बस्ती हा श्रेष्ठ उपचार असतो. वातदोषाचे मुख्य स्थान मोठे आतडे असल्याने व बस्ती उपचारामध्ये औषध गुदमार्गामार्फत आतड्यापर्यंत पोचत असल्याने बस्तीद्वारा मुख्यत्वे वातदोषावर उपचार करता येतात. तिन्ही दोषांमध्ये वात मुख्य असल्याने बस्ती गुदामार्फत पोचत असली तरी काम मात्र संपूर्ण शरीरावर करू शकते. 

निषिक्‍तो हि यथा द्रुमःस्यात्‌ नीलच्छदः कोमलपल्लवाग्रः ।काले महान्‌ पुष्पफलप्रदश्‍च तथा नरः स्याद्‌ अनुवासनेन ।।
...चरक सिद्धस्थान
मुळाला योग्य ते पोषण, खत, पाणी वगैरे मिळाले तर ज्याप्रमाणे संपूर्ण वृक्ष पल्लवित होतो, त्याला क्रमाने फुले, फळे येतात त्याप्रमाणे संस्कारित तेलाच्या बस्तीमुळे संपूर्ण शरीराचे पोषण होते, शरीराचे बल, वीर्य वाढण्यास मदत मिळते व अपत्यप्राप्तीचे सामर्थ्य येते.

स्वेदो मार्दवकराणाम्‌ - शरीरामध्ये मृदुता, मऊपणा येण्यासाठी स्वेदन हा उत्तम उपचार असतो. शरीरात कुठेही काठिण्य आले तर पर्यायाने तो भाग आखडतो, त्या ठिकाणी हालचालीवर निर्बंध येतात, वेदना होऊ शकतात. हे सर्व वातदोषामुळे होत असते. स्वेदन म्हणजे शेकण्याने वातदोष कमी झाला की हे काठिण्य दूर होऊन पुन्हा मृदुता प्रस्थापित होऊ शकते. स्वेदनपेटीच्या साह्याने सर्वांगावर बाष्पाच्या मदतीने शेकणे, विशेष वातशामक द्रव्यांनी शेकणे वगैरे स्वेदनाचे अनेक प्रकार असतात व ते शरीरातील कडकपणा दूर करण्यासही उत्तम असतात. 

व्यायामः स्थैर्यकरणाम्‌ - शरीराला दृढ बनविण्यासाठी व्यायाम उत्तम असतो. योग्य व्यायामाचे फायदे आयुर्वेदात  समजावलेले आहेत. 

लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः ।
विभक्‍तघनगात्रत्वं व्यायामाद्‌ उपजायते ।।
.....अष्टांगहृदय सूत्रस्थान
शरीर व मनाला हलकेपणा येतो, मन ताजेतवाने होते, शरीरशक्‍ती वाढते, एकंदर स्टॅमिना वाढतो, अग्नी प्रदीप्त होतो त्यामुळे पचनशक्‍ती सुधारते, शरीर रेखीव, पिळदार व घट्ट होते, शरीरबांधा व शरीरयष्टी व्यवस्थित राखायला मदत मिळते.
अग्र्यसंग्रहातील पुढील माहिती आपण पुढच्या वेळी पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com