काळजी जिवाला!

Worried
Worried

चिंता वाटणे ही समाजात अनेकांना जाणवणारी भावना आहे. शारीरिक रोग नाही याची खात्री प्रथम करून घ्यावी लागते. परंतु होणारे त्रास चिंतेमुळे आहेत हे अनुभवी डॉक्‍टरर्स सहज ओळखू शकतात. एखाद्या त्रासाचे कारण कळत नसल्यास हा त्रास सुप्त मनातील चिंतेमुळे होत आहे हेदेखील उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी पाहणे आवश्‍यक असते.

या जगात प्रत्येक व्यक्तीला कशाना कशाची तरी, केव्हा ना केव्हातरी काळजी वाटण्याचा अनुभव आलेला असतो, येत असतो. खरोखरीच्या किंवा काल्पनिक संकटाची जाणीव झाली की आपले मन अस्वस्थ होते. संकटाला तोंड देण्याचे दोन प्रमुख मार्ग असतात. संकटाचे स्वरूप आपल्या क्षमतेच्या तुलनेत कमी प्रतीचे आहे, असा आपला अंदाज असला तर त्या संकटाला तोंड देण्यास आपण सज्ज होतो. याला to be ready to fight असे म्हटले जाते. उलट पक्षी संकट बिकट स्वरुपाचे आहे असा आपला अंदाज झाला तर ते कसे टाळता येईल याची मन तयारी करू लागते. याला to prepare for flight असे म्हटले जाते. हा युद्ध अथवा पलायनाचा प्रतिसाद देण्याचा निर्णय ज्याचा त्याने ज्या त्या वेळेत घ्यावयाचा असतो. हा निर्णय घेऊन तशी कार्यवाही सुरू केली, की काळजीची भावना पुसली जाते. याचा अर्थ काळजी वाटणे ही भावना निर्णय न घेण्याचा एक भाग असतो. काळजी आणि भीती या दोन वेगवेगळ्या भावना आहेत.

भीतीमध्ये धोक्‍याची सूचना तर येतेच, शिवाय भीतीनंतर शक्ती जाते. व्यक्ती ‘गलितगात्र’ होते. भीती म्हणजे आपण काहीतरी ‘गमावणार’ आहोत अशा स्वरुपाची भाव\ना मनात खोलवर भासते. हे ‘काहीतरी’ म्हणजे धन असेल, मान-सन्मान असेल. सामाजिक प्रतिष्ठा असेल, प्रकृती किंवा आपले प्राण जाण्याची (मृत्युची) अथवा वेदना होण्याची जाणीव असू शकते.

भीतीमध्ये विरोध अथवा युद्ध करण्याची भावना नसते. काहीतरी गमावण्याची भावना मनात दृढ झालेली असते. दैनंदिन जीवनात काळजीमुळे शारीरिक आणि मानसिक कृती करण्याची क्षमता वाढते.

काळजीमुळे व्यक्तिंना आपला जीव जपण्याची क्षमता वाढवता येते व संभाव्य संकटाला टाळण्याची कृती यशस्वीरित्या पार पाडण्याचे मार्ग सुचू शकतात. आजार टाळणे, वेदना टाळणे, मदत मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे, शिक्षा टाळण्यासाठी मार्ग शोधण्याच्या वृत्तीला उत्तेजन मिळते. (चांगले डॉक्‍टर किंवा वकील शोधणे) आपल्या परिसरातील व आवडणाऱ्या गोष्टी टाळण्याचा मार्ग शोधणे इत्यादीकडे आपले लक्ष केंद्रित होते. 

योग्य मार्ग निवडण्याची क्षमता उत्तेजित करणे हे ज्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर ठरते. लहानपणापासून आपल्या मनावर झालेले संस्कार येथे महत्त्वाचा भाग घेतात. सुस्थितील सुसंस्कारित मन संकटाला तोंड देण्याचा मार्ग लवकर शोधते. येथे ज्ञान आणि अनुभव यांचा मोठा भाग असतो. पूर्वीचा अनुभव आणि सद्यपरिस्थितीची पारख यातून कोणता मार्ग घ्यावा किंवा कोणाची मदत घ्यावी याचे मार्गदर्शन आपले आपल्यालाच सुचू शकते. उदारहणार्थ प्रेमभंगाचे संकट निर्माण होण्याची शक्‍यता झाल्यास अनुभव व ज्ञानाने समृद्ध मन योग्य व्यक्तीचा सल्ला घेईल आणि समस्येची निरंगाठ कशी सुटेल याचे उत्तर काढण्याचा प्रयत्न करेल. समस्येचे उन्नयन (sublimation) करून अभ्यास मनापासून करून आपली प्रतिमा उज्वल करेल व संबंधित व्यक्तीला आपण अधिकाधिक हवेसे कसे वाटू याचा विचार आणि आचार चोखाळेल. उलटपक्षी पोरकट मनाची व्यक्ती संकटाने किंवा संकटाच्या कल्पनेने हतलब होते. झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस घेते किंवा काय करावे हे त्या व्यक्तीला सुचेनासे होते. विचार आणि आचार गोंधळतात. 

मानवी मन चिंतेला हाताळण्यासाठी काही मार्ग शोधते. हा शोध जाणीवपूर्वक केलेला नसतो. चिंतेने हतलब होणे टाळण्याकरता आपले मन हे विविध मार्ग शोधतेच. या मार्गांना ‘‘प्रतिकाराची कार्यकारणी कृती (defence mechanisms) म्हणतात. चिंतेला तोंड देण्याकरता मानसिक आणि शारीरिक शक्ती लागते. चिंतेपासून ‘पळून जाण्याकरता’देखील शक्ती लागते. नुकसान सहन करावे लागते. आपल्याला परीक्षेची काळजी वाटून परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला तरी वर्ष वाया जाणारच. डिफेन्स मॅकॅनिझम्समुळे या युद्ध अथवा पलायन दोन्हीतून सुटका होते. अनुवंशिकता आणि बालपणी झालेले संस्कार या दोन्ही घटनांच्या परिणामामुळे कोणते डिफेन्स मेकॅनिझम केव्हा वापरावयाचे हे त्या व्यक्तीचे मन ठरवते. 

वैद्यकीय वाड्‌मयात अशा वेगवेगळ्या तीस प्रकारच्या प्रतिकाराच्या कृती वर्णलेल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची कृती म्हणजे आपली वाढत्या वय व ज्ञानाबरोबर झालेली समृद्धी बाजूला सारून लहान मुलासारखे अज्ञानी, संवेदनाक्षम, आत्मकेंद्रित (स्वार्थ जाणणारे, स्वार्थ जपणारे) आकांड-तांडव करणारे मन प्रकट होऊ लागते. कोणत्याही गोष्टीचे महत्त्व लक्षात येत नाही. संस्कार बाजूला सारले जातात. याला बालकवृत्ती प्रकटणे (regression) म्हटले जाते. दुसरी एक क्रिया म्हणजे नाकारणे (denial) एखादी घटना घडलीच नाही असे मानणे, तसे बोलणे व वागणे. चूक झालेली असली तरी तेच बरोबर आहे. (ratronalization) असा विचार व्यक्ती करू लागते. अर्थातच चिंतेमुळे विविध प्रकारचे मानसिक त्रास होऊ शकतात. तणावाचे स्वरूप गंभीर असल्यास परिपक्व मनावरदेखील दुष्परिणाम होऊ शकतात. उदारहरणार्थ एखाद्या गंभीर अपघातातून जावे लागले, घटस्फोट घेण्याची पाळी आली किंवा स्वतःलाच मोठ्या आजाराला तोंड द्यावे लागले, तर समृद्ध परिपक्व मनावरदेखील परिणाम होणे शक्‍य आहे. परंतु, असा अतिरेकी ताण आला तर प्रथम चिंता जाणवते. नंतर नैराश्‍यच येते. भावनांचे प्रतिसाद परिस्थितीच्या मानाने अतिरेकी होऊ लागतात. अशा वेळी औषधांच्या वापराऐवजी रुग्णांशी आणि नातेवाइकांशी संवाद साधणे आणि रुग्णाच्या प्रतिसादाबद्दल समजावून सांगणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. 
काळजीमुळे शरीतात दिसणारे परिणाम सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टिमच्या अतिरेकी कार्यामुळे होतात. रुग्णाच्या तक्रारी जरी प्रत्येक रुग्णात वेगवेगळ्या असल्या तरी शारीरिक तपासणीत सर्वात जवळजवळ सारखेच दोष आढळतात. तक्रारी पुढील प्रमाणे असू शकतात. भयगंड (फोबिया), मंत्रचळेपणाचा अतिरेक (ऑबसेसिव्ह कम्पल्सरी डिस्‌ऑर्डर), पराकोटीचा अन्नद्वेष (ॲनोरोक्‍सिया नर्व्होझा) आणि उगाचच आपण आजारी आहोत (कोणताही आजार नसताना) (हायपोकॉड्रियासिस) अशा तक्रारी रुग्ण करतात. तपासताना नाडीची गती जलद असते (मिनिटाला १०० किंवा जास्त), तोंड कोरडे पडलेले असते, तळहात गार पडलेले असतात, रुग्ण स्वस्थ्य राहू शकत नाही. काही रुग्णांना शारीरिक आजार (उदाहरणार्थ पक्षाघात, शरीराचा एखादा भाग बधिर होणे इ.) झाल्याची लक्षणे (सोमॅटायजेशन) दिसू लागतात. डोकेदुखी, ‘चक्कर’ आल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, धडधडणे, कंप येणे, थकवा जाणवणे अशा तक्रारी चिंताग्रस्त व्यक्ती करतात.

चिंता वाटणे ही समाजात अनेकांना जाणवणारी भावना आहे. शारीरिक रोग नाही याची खात्री प्रथम करून घ्यावी लागते. परंतु, होणारे त्रास चिंतेमुळे आहेत हे अनुभवी डॉक्‍टरर्स सहज ओळखू शकतात. एखाद्या त्रासाचे कारण कळत नसल्यास हा त्रास सुप्त मनातील चिंतेमुळे होत आहे हेदेखील उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी पाहणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com