गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

ज्याप्रमाणे चांगली जोपासना केलेल्या शेतात ऋतुमानानुसार आलेला पाऊस उत्तम धान्य तयार करू शकतो, त्याप्रमाणे या गुणांनी युक्‍त आचार्य उत्तम शिष्याला, तसेच उत्तम वैद्याला गुणसंपन्न बनवू शकतात. उत्तम शास्त्र, सर्वगुणसंपन्न आचार्य किंवा गुरू आणि सुयोग्य शिष्य या तिन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतात, तेव्हा "एवं विद्या प्रकाशते मित्रयशोधर्मार्थकामांश्‍च प्राप्नोति‘ म्हणजे विद्येचे तेज वाढते, मित्र जोडले जातात, यश मिळते आणि धर्म, अर्थ, काम या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होते.

आयुर्वेदशास्त्र हे प्राचीन भारतीय, वेदाचे एक उपांग असे एक शास्त्र असल्याने ते "गुरुकुल‘ पद्धतीने म्हणजे गुरू किंवा आचार्यांच्या आश्रमात राहून शिकायचे शास्त्र आहे. चरक, सुश्रुत या प्राचीन संहितांमध्ये या विषयाचे विस्तृत वर्णन केलेले आढळते. सुश्रुत संहितेत तर पहिल्या स्थानातील दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायाना अनुक्रमे "शिष्योपनयनीय‘ आणि "अध्ययन संप्रदानीय‘ अशी शीर्षके दिलेली आहेत. शास्त्राभ्यास कसा करावा, शिष्य कसा असावा, आचार्य कसे असावेत अशा अनेक गोष्टींची माहिती यात दिलेली आढळते. आजही यातील तत्त्वे जर समजून त्यानुसार आचरण ठेवले, तर आदर्श गुरू-शिष्य नाते जोपासता येऊ शकेल. 


कोणतेही शास्त्र पूर्णपणे आकलन करून घ्यायचे असेल, "शास्त्रसंपन्न‘ बनायचे असले तर त्यासाठी तीन गोष्टी अनुकूल असाव्या लागतात,
तत्रोपाय अननुव्याख्यास्यामः, अध्ययनम्‌, अध्यापनं, तद्विद्यसंभाषा च इति उपायाः ।
....चरक विमानस्थान 


अध्ययन - अभ्यास करण्याची पद्धत
अध्यापन - शिष्याची निवड, शिष्याने पाळावयाचे नियम, शिष्याचे आचरण
तद्विद्यसंभाषा - गुरू-शिष्य किंवा शिष्याशिष्यांमध्ये होणारा संवाद या तिन्ही गोष्टी जेवढ्या अचूक व उत्तम असतील तेवढे ज्ञान उत्तम प्रकारे होऊ शकेल आणि आचार्य किंवा गुरू- शिष्याला घडवू शकतील. 


गुरुकुल पद्धतीत सर्वप्रथम "शास्त्र‘ निवडावे लागते, जे शास्त्र यशस्वी तसेच बुद्धिमान व्यक्‍तींकडून अभ्यासलेले असते, ज्याची व्याप्ती मोठी असते, जे आप्तांकडून (म्हणजे निःस्वार्थी, कल्याणकारक स्वभाव व आचरण असणाऱ्या व्यक्‍तींकडून) प्रशंसित असते, ज्या शास्त्राची समर्पक माहिती उपलब्ध असते, ज्या शास्त्रात अनेक उदाहरणे देऊन विषय नीट समजावलेला असतो, जे शास्त्र सर्व प्रकारच्या बुद्धीच्या (उत्तम, मध्यम व अल्प) शिष्यांसाठी लाभप्रद असते, जे पदवीप्रणीत (म्हणजे ज्ञानी, निःस्वार्थी, सर्वांच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या व्यक्‍तींकडून स्वीकारलेले) असते, असे शास्त्र अभ्यास करण्यास उत्तम समजले जाते. या सर्व निकषांवर उत्तम शास्त्र निवडले तरी ते कोणाकडून, कोठून शिकावे याचीसुद्धा निवड जाणीवपूर्वक करणे आवश्‍यक असते. प्राचीन काळ असो किंवा सांप्रत काळ असो, चांगल्यात चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. गुरुकुल पद्धतीमध्ये मुख्य गुरू किंवा आचार्य सहसा असत, त्यामुळे शास्त्रपरीक्षेनंतर चरकसंहितेमध्ये "आचार्यपरीक्षा‘ कोणत्या निकषांवर करायची हे पुढीलप्रमाणे सांगितले आहे. 


पदवदातश्रुत - शास्त्रातील मर्मांना उत्तम प्रकारे जाणणारे व शास्त्राचे निर्मळ ज्ञान असणारे असे असावेत.
परिदृष्टकर्माणम्‌ - उपचारातील प्रत्यक्ष करावयाच्या क्रिया ज्यांनी अनेक वेळा केलेल्या आहेत असे असावेत.
दक्ष - सर्व बारीक सारीक गोष्टीकडे त्यांचे लक्ष असावे.
दक्षिण - सर्व कार्यांत ते कुशल असावेत.
शुचिम्‌ - आचरणात शुद्ध, पवित्र असावेत.
जितहस्तम्‌ - हाताला यश असावे, इतकी कुशलता असावी की यश मिळावेच.
उपकरणवन्तम्‌ - सर्व साधने, उपकरणे त्यांच्याजवळ असावीत.
सर्वइन्द्रियोपपन्नम्‌ - सर्व इंद्रिये उत्तम प्रकारे कार्यरत असावीत.
प्रकृतिज्ञम्‌ - कोणत्याही गोष्टीतील मूळ समजण्याची क्षमता असावी.
प्रतिपत्तिज्ञम्‌ - स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असावी.
अनुपस्कृतविद्यमन्‌ - अविकृत विद्या असणारे असावेत.
असूयकम्‌ - असूयाविरहित असावेत.
अकोपनम्‌ - क्रोधविरहित असावेत (अकारण रागावणारे नसावेत)
क्‍लेशक्षमम्‌ - क्‍लेश किंवा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता असावी.
शिष्यवत्सल - शिष्यांवर प्रेम असावे. 


असे जे आचार्य, ते ज्ञानदानास समर्थ असतात. ज्याप्रमाणे चांगली जोपासना केलेल्या शेतात ऋतुमानानुसार आलेला पाऊस उत्तम धान्य तयार करू शकतो, त्याप्रमाणे या गुणांनी युक्‍त आचार्य उत्तम शिष्याला, तसेच उत्तम वैद्याला गुणसंपन्न बनवू शकतात. 


शास्त्राध्ययनापूर्वी आचार्यांची जशी परीक्षा करायला सांगितली आहे, तशीच शिष्यपरीक्षासुद्धा करायला सांगितली आहे. शास्त्राभ्यास सुरू करण्यापूर्वी (सध्याच्या भाषेत प्रवेश घेण्यापूर्वी) आचार्यांनी शिष्याची परीक्षा पुढील निकषांच्या आधारे करावी. 


प्रशान्त - शिष्य शांत प्रकृतीचा असावा.
आर्यप्रकृतिम्‌ - स्वभावाने, मनाने चांगला असावा.
अक्षुद्रकर्माणाम्‌ - क्षुल्लक, क्षुद्र कामात न रमणारा असावा.
ऋजु चक्षु-मुख-नासावंशम्‌ - नजर, मुख, नाक सरळ असणारा असावा (डोळे, नाक, तोंडाची वेडीवाकडी हालचाल करणारा नसावा).
तनुरक्‍तविशदजिह्वम्‌ - पातळ, लालसर व स्वच्छ जीभ (स्पष्ट उच्चार) असणारा असावा.
अविकृतदन्तौष्ठम्‌ अमिन्मिनम्‌ - दात, ओठ यात विकृती नसणारा, तसेच नाकातल्या नाकात किंवा अस्पष्ट, अडखळत न बोलणारा असावा.
धृतिमन्तम्‌ - धीर, संयमवृत्ती उत्तम असणारा असावा.
अनहङ्‌कृतम्‌ -  अहंकाररहित असावा.
विनम्‌ - उत्तम आकलनशक्‍ती असणारा असावा.
वितर्कस्मृतिसंपन्नम्‌ - तर्कशक्‍ती व स्मरणशक्‍ती उत्तम असणारा असावा.
उदारसत्वम्‌ - मनाने उदारवृत्तीचा असावा.
विद्यवृत्तम्‌ - वैद्यांच्या आचारविचारांशी परिचित असावा.
तत्त्वाभिनिवेशिनम्‌ - कोणत्याही विषयातील मूळ तत्त्व जाणून घ्यायची प्रबळ इच्छा असणारा असावा.
अव्यापन्नेन्द्रियम्‌ - सर्व इंद्रियांनी युक्‍त असावा.
निभृतं अनुद्धतमर्थतत्त्वभावकम्‌ - विश्वास ठेवण्याजोगा कोणत्याही गोष्टीतील मूळ, शुद्ध तत्त्व समजून घेण्याचा भाव असणारा असावा.
अकोपनम्‌ अव्यसनिनम्‌ - कोपिष्ट स्वभाव नसावा, व्यसनाधीन नसावा.
शीलशौचआचार - उत्तम शीलसंपन्न, स्वच्छताप्रिय, चांगले आचरण असणारा असावा.
अनुरागदाक्ष्यप्रादक्षिण्योपपन्नम्‌ - शिकण्यामध्ये रस असावा, दक्षता असावी तसेच प्रत्यक्ष क्रिया करण्यासाठी तत्परता असावी.
अर्थविज्ञाने कर्मदर्शने चानन्यकार्यम्‌ - शास्त्राचा अर्थ समजून घेताना किंवा प्रत्यक्ष कर्म पाहताना अन्य कोणत्याही कामात लक्ष न देणारा असावा.
अलुब्धम्‌ अनलसम्‌ - स्वभाव लोभी किंवा आळशी नसावा.
सर्वभूतहितैषिणम्‌ - सर्व प्राणिमात्रांच्या हिताची इच्छा असावी. 

 
आचार्यसर्वानुशिष्टिप्रतिकरम्‌ अनुरक्‍तं च - आचार्यांच्या प्रत्येक आज्ञेचे आणि उपदेशाचे पालन करणारा आणि त्यांच्याविषयी मनात आदर, प्रेम ठेवणारा असा शिष्य शास्त्राध्ययनासाठी अनुकूल समजला जातो. 


अशा प्रकारे उत्तम शास्त्र, सर्वगुणसंपन्न आचार्य किंवा गुरू आणि सुयोग्य शिष्य या तिन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा "एवं विद्या प्रकाशते मित्रयशोधर्मार्थकामांश्‍च प्राप्नोति‘ म्हणजे विद्येचे तेज वाढते, मित्र जोडले जातात, यश मिळते आणि धर्म, अर्थ, काम या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होते.
ही सर्व माहिती आयुर्वेदाच्या अनुषंगाने दिलेली असली, तरी इतर शिक्षक, आचार्य, गुरू व शिष्य यांनाही लागू होऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com