धडधड करी छाती जीव नाही थाऱ्याला

धडधड करी छाती जीव नाही थाऱ्याला

हृदयविकाराच्या तक्रारींपैकी धाप लागणे आणि छातीत दुखणे या तक्रारी जितक्‍या महत्त्वाच्या आहेत तेवढे महत्त्व धडधडण्याला दिले जात नाही. हृदयाच्या स्पंदनाची गती संथ होवो अगर जलद. हृदयाच्या ठोक्‍यांची अस्वास्थ्यजनक जाणीव म्हणजे धडधड होणे. असा प्रकार धावतांना किंवा व्यायाम करताना होऊ शकतो. त्याच प्रमाणे भीती अथवा कोणत्याही उत्तेजक भावनेने होईल. त्याच प्रमाणे तंबाखूतील निकोटीन, चहा- कॉफीतील कॅफेन किंवा मद्यातील इथाईल अल्कोहोल या रेणूंमुळे धडधड होऊ शकते. ज्या व्यक्तींचे मन सहज चिंतामग्न होते अशांना धडधड चटकन होते. अर्थात कधी कधी हृदयविकारांतदेखील धडधड होऊ शकते. बऱ्याच वेळा धडधड होण्यामागे मानसिक अस्वास्थ्य हे कारण असते. हृदयाच्या निरामय स्थितीतदेखील हृदयाच्या स्पंदनाची जाणीव झाली तर धडधडते. एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या ‘उत्तेजित’ झाली की होणाऱ्या संवेदनेचा अर्थ चुकीचा लावला जातो. अशी मानसिक- उत्तेजित व्यक्ती चढावर चढली किंवा अशा व्यक्तीने वजन उचलले तर आपल्या हृदयाच्या स्पंदनाची जाणीव होऊ लागते. असे वारंवार होऊ लागल्यास ‘‘मला हृदयविकार तर झालेला नाही ना?’’ ही शंका येते व बळावते. काही दशकांपूर्वी वैद्यकशास्त्रात ‘न्यूरो- सर्क्‍युलेटरी- ॲस्थिनिया’ ही संज्ञा वापरली जात होती. अशा रुग्णांना छातीत धडधड जाणवत असे. डावीकडे छातीत चमक मारल्याप्रमाणे तीव्र कळा येत असते, श्‍वसन जलद होई व हात पाय थंड पडत असत. ‘‘आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे’’ या कल्पनेने रुग्ण भयचकित होई. या भयामुळे नाडीची गती जलद होई आणि रक्तदाबही वाढत असे. वैद्यक शास्त्रातील प्रगतीमुळे हळूहळू लक्षात येऊ लागले, की अशा रुग्णांना कोणत्याही प्रकारचा हृदयाचा विकार नसतो. परंतु, अनैच्छिक मज्जासंस्थेत निर्माण झालेल्या उद्दिपनामुळे रुग्णाला त्रास होतो. असे घडण्यामागे रुग्णाच्या ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिममध्ये चटकन उद्दिपित होण्याची सवय जडलेली असते. कोणताही हृदयविकार नसतो. या स्थितीला आता ‘‘अँझायटी स्टेट’’, ‘‘पॅनिक रिॲक्‍शन’’ किंवा ‘‘फोबिक ॲटॅक’’ म्हणतात. अशी स्थिती युद्धावर जाणाऱ्या सैनिकांत वारंवार आढळून येत असे. युद्धावर तर जीवन- मृत्युशी संबंध जवळचाच होता. तसा आणि तितका तीव्र नसला तरी आपल्या समस्येची खूप भीती वाटली तरी तशीच भावना रुग्णात येते. छातीत धडधड होणे, छातीत कळा येणे, पायातील शक्ती कमी होत चालल्याची भावना येणे, धाप लागणे, लांब (दीर्घ) श्‍वास मधून मधून घ्यावा लागणे, घाम सुटणे, हाताच्या बोटांना कंप सुटणे, ‘‘चक्कर येणे’’, घाबरल्यासारखे वाटणे, घसा कोरडा पडणे, डोके दुखणे आणि भान हरपल्याची भावना येणे अशा तक्रारी या अतिरेकी चिंतेतून निर्माण झालेल्या ‘‘फोबिक रिॲक्‍शन’’ मध्ये रुग्णाला येतात. वारंवार मनात भीतीची भावना उद्‌भवू देण्याने आपल्या मज्जासंस्थेली ऑटोनॉमिक (सिंपथॅटिक आणि पॅरॉसिंपथॅटिक) मज्जासंस्था संवेदनाक्षम बनते व आलेली समस्या हे मोठे (जिवावर बेतलेले) संकटच आहे असे मज्जासंस्था मानू लागते. भीतीमुळे शरीरात ॲड्रिनॅलिन या संप्रेरकाचा (हॉर्मोनिया) स्त्राव स्त्रवला जातो, त्याचा परिणाम नाडीची गती वाढणे इत्यादी ‘‘युद्ध अथवा पलायन’’ या प्रतिसादातील शारीरिक बदलात होते. धडधड जाणवते आणि ही धडधड हृदयविकाराची तर नसेल ना या कल्पनेने पुन्हा ॲड्रिनॅलिनचा स्त्राव वाढतो. या दृष्टचक्रात रुग्ण सापडतो. बीटा ब्लॉकर प्रकारची व चिंता शमवण्याची औषधे उपयोगी पडतात. त्यांच्या जोडीला धीर देणे, हृदयविकार नसल्याचे पुरावे सादर करणे आणि समुपदेशनाने हे आजार बरे करता येतात.

हृदयविकार नसतानादेखील निरामय स्थितीत धडधडणे शक्‍य आहे. जेव्हा हृदयाचे स्पंदन जलद गतीने अथवा अधिक ताकदीने होते तेव्हा अशा स्पंदनाची जाणीव होते. वास्तवात जेव्हा हृदयविकार असतो, तेव्हा बहुतेक वेळा ही संवेदनक्षमता कमी झालेली असते. कदाचित हा सवयीमुळे झालेला परिणाम असू शकेल. अशा सवयीमुळे काही प्रमाणात हृदयाच्या ठोक्‍यांची गती वाढली किंवा त्यातील नियमितपणा कमी झाला तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना जाणिवेत पोचू शकत नसाव्यात. एट्रियल फिब्रिलेशन या विकारात हृदयाच्या स्पंदनाचे ठोके अनियमित पडणे हाच नियम झालेला असतो. तथापि, रुग्णाला आपल्या हृदयाचे ठोके अनियमितपणे पडत आहेत असे क्वचितच जाणवते. उलट पक्षी उपचारानंतर (अथवा आपोआप) जर हृदयाचे ठोके नियमाने व्यवस्थित पडू लागले तर रुग्ण ‘धडधड होते’ अशी तक्रार करतो! वाढलेल्या हृदयविकारात रुग्णाला धाप लागत असते आणि रुग्ण बिछान्यात आडवे पडू शकत नाही. रुग्णाला उठून बसावे लागते. तरीही रुग्ण ‘‘मला धडधडत आहे’’ अशी तक्रार क्वचितच करतो/ करते! कोणतीही तक्रार न करणाऱ्या रुग्णात नाडीचा एखादा ठोका चुकणे व नंतरचा ठोका जास्त जोरात पडणे हे दोष आढळतात. रुग्णाला जाणीव झालीच तर अशा जादा ठोक्‍यानंतर दीर्घ काळानंतर येणाऱ्या मोठ्या ठोक्‍याच्या जाणीवेमुळे येते. उलटपक्षी, महारोहिणीच्या सुरवातीच्या झडपेच्या आजारात प्रत्येक ठोका जास्त शक्तिमान असतो; परंतु रुग्णाला त्याची अजिबात जाणीव येत नाही!

एखादा ठोका चुकणे, एखादा जोरात पडणे याची जाणीव रुग्णाला अस्वस्थ करू शकते. ‘‘आपल्या छातीत अकस्मात हृदयाचे स्पंदन थांबले’’ अशी रुग्ण तक्रार करतात. अशा वेळी ‘‘डोके हलके झाले’’ किंवा ‘‘छातीच्या मध्यभागी दुखले’’ अशीही तक्रार येणे शक्‍य असते. अशा तक्रारी व्यक्ती शांत अवस्थेत, झोप लागता लागता येण्याचा संभव अधिक असतो. याचे कारण अशा वेळी शरीरातून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना आता कमी कमी होत चालल्या असतात आणि हृदयाची गतीही संथावत असते. जेव्हा हृदयाच्या स्पंदनाची गती संथ होते. तेव्हा डायस्टॉलची वेळ वाढते आणि या डायस्टॉलच्या काळात प्रिमॅच्युअर बीट्‌स निर्माण होण्याची शक्‍यता जास्त असते. शारीरिक हालचाल करताना, व्यायाम करताना, पळतांना नाडीची गती जलद होते. अशा वेळी डायस्टॉलची वेळ कमी असते. अशा वेळी असे प्रिमॅच्युअर बीट्‌स निर्माण होण्याची शक्‍यता खूपच कमी असते. हे जरी खरे असले तरी ‘धडधड होते’’ अशी तक्रार करणाऱ्या प्रत्येक रुग्णाची शारीरिक तपासणी आवश्‍यक आहे आणि आवश्‍यकता पडल्यास कॉर्डियोग्रॅम, स्ट्रेस टेस्ट किंवा इतर तपासण्याही करणे जरुरीचे असते. 

कमी जास्त श्रम केल्यानंतर हृदयाच्या स्पंदनाची (आणि म्हणून नाडीची) गती वाढते. श्रम थांबवून विश्रांती घेण्यात सुरवात केल्यापासून, उत्तम तंदुरुस्त व्यक्तींची नाडीची गती १२० सेकंदात (दोन मिनिटांत) पूर्ववत होते. नाडीची गती श्रांत स्थितीत पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ जलद राहिली तर त्या व्यक्तीच्या हृदयात किंवा रुधिराभिसरणात काहीतरी दोष आहे असे अनुमान काढता येते. जिना चढून वर आल्यावर आपली आपण अशी तपासणी सहज करू शकतो. 

हृदयाच्या काही विकारांत नाडीची (आणि हृदयाच्या स्पंदनाची) गती जलद होते. सुदैवाने असे रुग्ण धडधड होत असल्याची तक्रार क्वचितच करतात. अनेक कारणांमुळे (झडपांचे आजार, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या करोनरी रक्तवाहिन्या अरुंद होणे, हृदयाच्या स्नायूची दुर्बलता होणे, प्राथमिक आणि मुख्य विकार फुफ्फुसात असणे इत्यादी) हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन पुरेशा क्षमतेने होत नाही. परिणामी शरीराच्या अवयवांना आणि पेशींना रक्ताचा (प्राणवायूचा व अन्नघटकांचा) पुरवठा कमी पडतो. या स्थितीला हृदयाची (कार्याची) अयशस्वी स्थिती (heart failure) म्हणतात. या स्थितीत नाडीची गती वाढते. तथापि, धडधडण्याचा त्रास क्वचितच होतो. 

छातीत धडधडणे ही तक्रार बऱ्याच वेळा गंभीर आजाराची निदर्शक नसली तरी कधी कधी जीवाला धोका असणाऱ्या विकाराचे लक्षणही असू शकते. शारीरिक तपासणी आणि किमान इलेक्‍ट्रोकार्डिऑग्रॅम काढणे हे धडधड होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आवश्‍यक आहे. अनेकांना या नंतर जास्त महाग तपासण्या करण्याची गरज पडेलही. परंतु, सरसकट सर्वांना जास्त तपासण्यांची गरज नसते. रुग्णाच्या तोंडून त्याच्या तक्रारीचे यथायोग्य वर्णन काळजीपूर्वक ऐकणे हेच फार महत्त्वाचे असते. शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आता धडधड होणे या तक्रारीचे निर्मूलन प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत नक्की होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com