ज्ञानेंद्रियांचे आरोग्य 

balaji-tambe
balaji-tambe

धूम्रपान करणाऱ्या व्यक्‍ती नाकाच्या आत असलेल्या अस्तरांशी, एकूणच श्‍वसनसंस्थेशी खेळ करत असतात. 

2) सतत इअरफोन लावण्याने कानात उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे कानातील जल, वायू, आकाशतत्त्वामध्ये बिघाड होऊ शकतो. 

ज्यांच्या आधाराने ज्ञान होते ती ज्ञानेंद्रिये होत. सजीवतेचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे जाणीव. त्वचेला स्पर्शाची जाणीव, जिभेला चवीची जाणीव, नाकाला गंधाची जाणीव, कानाला आवाजाची जाणीव आणि डोळ्यांना दिसण्याची जाणीव ही जोपर्यंत अबाधित असते तोपर्यंत जिवंतपणी खात्री असते. किंबहुना शंभर वर्षांचे दीर्घायुष्य जगताना शेवटपर्यंत सर्व इंद्रिये कार्यक्षम राहणे अपेक्षित असते, हे वेदांतील मंत्रांमधून स्पष्ट होते.
 
पश्‍येम शरदः शतम्‌, 
जीवेम शरदः शतम्‌, 
श्रुणुयाम शरदः शतं, 
प्रबवाम शरदः शतम्‌ । 
...यजुर्वेद 

आम्ही शंभर वर्षांपर्यंत दर्शन करण्यास समर्थ राहोत, नाकाने प्राण ग्रहण करण्यास समर्थ राहोत, कानांनी ऐकण्यास सशक्‍त राहोत, बोलण्यास सशक्‍त राहोत. 
यजुर्वेदात इंद्रियाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे, 
पुरुषस्य विषयज्ञानार्थं कर्मांर्थं वा साधनभूतः शारीरभावविशेषः । 
....सुश्रुत शारीरस्थान 

व्यक्‍तीला विषयाचे ज्ञान होण्याकरिता किंवा कर्म करण्याकरिता साधन म्हणून काम करणारा शरीरभाव म्हणजे इंद्रिय होय. 

इंद्रिये सूक्ष्म असतात. मृत्यूनंतर म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेल्या स्थूल शरीराचा नाश झाल्यानंतरसुद्धा जी सूक्ष्म तत्त्वे शिल्लक राहतात, त्यात इंद्रियांचा समावेश होतो. सामान्य भाषेत जरी डोळे, नाक, कान वगैरेंना इंद्रिय म्हणून संबोधले जात असले तरी वास्तविक हे सर्व इंद्रिये ज्यांच्या आधाराने राहतात ते अवयव होत. या अवयवाच्या आत असणारे इंद्रिय हे खरे आयुर्वेदाला अभिप्रेत असणारे इंद्रिय असते. डोळ्यांनी वस्तू पाहिली असे आपण म्हणतो तेव्हा डोळा या अवयवातील चक्षुरेंद्रियाने वस्तूचे ज्ञान करून दिलेले असते. डोळ्याचे आरोग्य व्यवस्थित असले पण आतल्या चक्षुरेंद्रियाने स्वतःचे काम केले नाही तरी डोळ्यांना वस्तू दिसणार नाही. म्हणून ज्ञान व्यवस्थित होण्यासाठी, कर्म व्यवस्थित घडण्यासाठी इंद्रियांचे आणि इंद्रिय ज्याच्या आधाराने राहते त्या अवयवाचे आरोग्य नीट टिकणे आवश्‍यक असते. 

इंद्रियांचा आणि पाच महाभूतांचा जवळचा संबंध असतो. 
इन्द्रियाणि अपि पाञ्चभौतिकानि अस्मत्‌ दर्शने, तानि च प्रतिक्षणं क्षीयमाणानि।।..चरक चिकित्सास्थान चक्रपाणी टीका इंद्रिये सूक्ष्म असली तरी पाच महाभूतांपासून बनलेली असतात आणि त्यांचा प्रत्येक क्षणी क्षय होत असतो. मात्र हा क्षय कमीत कमी व्हावा यासाठी प्रयत्न करता येतात. यादृष्टीने पाचही महाभूतांचा अंश असणाऱ्या संतुलित अन्नाचे आणि रसायनांचे सेवन करणे उत्तम सांगितलेले आहे. 
अन्नमिष्टं ह्युपेहितमिष्टैर्गन्धादिभिः पृथक्‌ । देहे प्रीणाति गन्धादीन्‌ घ्राणादीनीन्द्रियाणि च ।। 
...चरक चिकित्सास्थान 

प्रिय आणि प्रकृतीला अनुकूल असा गंध, चव, रूप वगैरे असणारे अन्न सेवन केले असता ते शरीराबरोबरच प्राणालाही बल देते आणि घ्राणादी इंद्रियांना पुष्ट करते. 
प्रभावर्णस्वरौदार्य देहेन्द्रियबलं परम्‌ ।....चरक चिकित्सास्थान 

उत्तम प्रतीच्या सेवनाने प्रभा वाढते, वर्ण तेजस्वी होतो, स्वर सुधारतो, देह व इंद्रियांना बल मिळते. उत्तम प्रतीच्या आवळ्यांपासून व ग्रंथात सांगितलेल्या पद्धतीचा पूर्ण अवलंब करून बनवलेला च्यवनप्राश सेवन करण्याने इंद्रियांचे बल वाढते, असा उल्लेख सापडतो. इतरही सर्व रसायनांचे गुण सांगताना इंद्रियांना शक्‍ती मिळते आणि ती आपापली कार्ये समर्थपणे करू लागतात असे म्हटले आहे. 

ज्याप्रमाणे आरशावर धूळ जमली की त्यात आपण आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही, तसेच इंद्रिये मलीन झाली तर तीसुद्धा स्वतःची कार्ये तत्परतेने करू शकत नाहीत. इंद्रिये आळसावू नयेत, त्यांची शक्‍ती मंद होऊ नये म्हणून इंद्रिये राहतात ती अधिष्ठाने शुद्ध राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. शरीरही वेळोवेळी शुद्ध करावे लागते. म्हणूनच इंद्रिये आपापल्या कामात तत्पर राहावीत यासाठी पंचकर्माचे मोठे योगदान असते. पंचकर्माचे उपयोग पाहिले तर ही गोष्ट सहज लक्षात येते. 

इन्द्रियाणि मनो बुद्धिः वर्णश्‍चास्य प्रसीदति । 
सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, वर्ण पंचकर्मामुळे प्रसन्न होतात, कार्यतत्पर होतात. 
पंचकर्मापैकी विरेचन या उपचाराचे गुण सांगतानाही इंद्रियांचा मुख्य उल्लेख केलेला आहे. 

बुद्धेः प्रसादं बलमिन्द्रियाणां धातुः स्थिरत्वं बलमग्नि दीप्तिः । 
बुद्धी निर्मल होते, इंद्रिये प्रसन्न व बलवान होतात, धातू स्थिर होतात, शरीरबल वाढते, अग्नी प्रदीप्त होतो. 

इंद्रियांच्या कार्यामध्ये वाताचा सहभाग महत्त्वाचा असतो. 
सर्वेन्द्रियाणां उद्योजकः, सर्वेन्द्रियार्थानाम्‌ अभिवोढा वायुः । 
सर्व इंद्रियांना प्रेरणा देणारा, इंद्रियांना आपापले काम करण्यास प्रवृत्त करणारा तो वायू असतो. वाताच्या पाच प्रकारांपैकी मुख्यत्वे प्राणावर इंद्रियांची जबाबदारी असते. म्हणूनच प्राणायाम, दीर्घश्‍वसन, अनुलोम-विलोम, ॐकार गूंजन वगैरेंच्या साहाय्याने प्राणादी पंचवायूंचे संतुलन करता येते. बरोबरीने इंद्रियांची कार्यक्षमता वाढण्यासही मदत मिळते. 

"इंद्रियवध' म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या कार्याचा नाश होणे. वातदोष कुपित झाला तर काय काय होते हे सांगताना त्यात इंद्रियवधाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच इंद्रियांची कार्यक्षमता टिकण्यासाठी, वातदोष संतुलित राहणे गरजेचे असते. त्यादृष्टीने आहारात दूध-तूप-पंचामृतासारख्या वातशामक आणि इंद्रियपोषक गोष्टींचा समावेश करणे चांगले असते. शास्त्रोक्‍त पद्धतीने बस्ती-उपचार, हलके विरेचन, वेळोवेळी अभ्यंग मसाज, बाष्पस्वेदन हेही उपचार वातसंतुलनासाठी, पर्यायाने इंद्रियांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. 

विषयाचे ज्ञान इंद्रियांकडून होत असले तरी त्याला कार्य करण्यासाठी आपल्या अधिष्ठानरूपी अवयवाचीही तेवढीच आवश्‍यकता असते. म्हणजे चक्षुरेंद्रियाकरवी पाहण्याचे काम होण्यासाठी डोळा या अवयवाचे आरोग्य व्यवस्थित असायला हवे, रसनेंद्रियाकडून रसग्रहण होण्यासाठी जिभेची संवेदना कार्यक्षम राहायला हवी वगैरे. म्हणूनच कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक या इंद्रिय-अधिष्ठानांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निरोगी अधिष्ठानाच्या बरोबरीने इंद्रियेही अधिक तत्परतेने, अधिक अचूकतेने काम करू शकतात. 

कान व श्रवणेंद्रिय - आकाश व वायुतत्त्वाशी निगडित असल्याने आणि वातदोषाचे स्थान असल्याने कानाला व श्रवणेंद्रियाला आवश्‍यक तेवढी स्निग्धता मिळणे आवश्‍यक असते. त्यादृष्टीने कानात नियमितपणे "श्रुती तेला'सारखे श्रवणशक्‍तिपोषक, श्रवणशक्‍तिवर्धक तेल घालणे, अधून मधून कर्णपूरण हा उपचार करून घेणे उत्तम असते. सध्याच्या ध्वनिप्रदूषणापासून रक्षण होण्यासाठी, मोबाईल, हेडफोन्सच्या अतिवापरामुळे कानांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तर हे उपाय आवर्जून करायला हवेत असे होय. 

त्वचा व स्पर्शनेंद्रिय - हेसुद्धा वातदोषाचे स्थान असल्याने नियमित अभ्यंग करणे, त्वचेतील रुक्षपणा वाढू नये म्हणून रासायनिक द्रव्यांनी युक्‍त साबण-प्रसाधने न वापरता "सॅन मसाज पावडर'सारखे नैसर्गिक द्रव्यांनी बनविलेले उटणे, "संतुलन अभ्यंग तेला'सारखे तेल लावणे, शक्‍य असेल तेव्हा त्वचेला शुद्ध करणाऱ्या, त्वचेचे व स्पर्शनेंद्रियांचे पोषण करणाऱ्या द्रव्यांच्या काढ्याची बस्ती घेणे यासारखे उपाय करता येतात. 

डोळे आणि चक्षुरेंद्रिय - डोळे हे तेज महाभूताशी संबंधित असतात व कफदोष वाढला तर डोळे खराब होऊ शकतात. तेज महाभूत संतुलित राहावे (उष्णता अति प्रमाणात वाढू नये) आणि कफदोष साठून डोळ्यांचे रोग होऊ नये यासाठी आयुर्वेदाने अंजन सुचवले आहे. "सॅन अंजन'सारखे आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले शुद्ध, नैसर्गिक अंजन डोळ्यात घालणे, डोळ्यांवर अधून मधून गुलाबपाण्याच्या किंवा गाळून घेतलेल्या दुधाच्या घड्या ठेवणे, डोळा या अवयवाची आणि आतील स्पर्शनेंद्रियाची कार्यक्षमता वाढविणाऱ्या द्रव्यांचा संस्कार करून तयार केलेल्या तेलाची किंवा तुपाची नेत्रबस्ती घेणे हे उपाय करता येतात. 

जीभ व रसनेंद्रिय - यावर जल महाभूताचा प्रभाव असतो, त्यामुळे जिभेचे अति उष्ण, अति तीक्ष्ण द्रव्यांपासून (उदा. तंबाखू, सुपारी, पान, अतिशय तिखट गोष्टी वगैरे) रक्षण करणे आवश्‍यक होय. सुमुख तेलमिश्रित पाणी तोंडात धरून ठेवणे, दात-हिरड्या तसेच जीभ स्वच्छ करण्यासाठी रासायनिक द्रव्यांनी युक्‍त उत्पादनांऐवजी योगदंतीसारख्या नैसर्गिक द्रव्यांनी युक्‍त उत्पादनांचा वापर करणे हे जीभ व रसनेंद्रियांसाठी हितावह होय. 

नाक व घ्राणेंद्रिय - यावर पृथ्वी महाभूताचा प्रभाव असतो. नाकात "नस्यसॅन घृता'सारखे औषधी तूप घालणे चांगले असते. यामुळे नाक, भोवतालच्या सायनस पोकळ्या शुद्ध व मोकळ्या राहण्यास मदत मिळते. नाकात टाकलेले औषध मेंदूपर्यंत पोचत असल्याने व स्पर्शनेंद्रिय वगळता इतर चारही इंद्रियांचे मूळ मेंदूत असल्याने चारही इंद्रियांसाठी पोषक असते. 

डोळे, कान, जीभ आणि नाक या सर्व अवयवांचे आणि आतील इंद्रियांचे आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून नियमित नस्य करणे उत्तम असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com