दूषित पाण्यापासून संरक्षण

Contaminated-Water
Contaminated-Water

दिवसभर प्यावयास लागणारे पाणी रोज सकाळी किमान पंधरा-वीस मिनिटे उकळता येते. उकळताना त्यात शेवटी शेवटी चंदन, अनंतमूळ वगैरे सुगंधी व पाण्यातील विषद्रव्यांचा नाश करणारी द्रव्ये किंवा तयार ‘जलसंतुलन’ मिश्रण टाकण्याने पाणी लागतेही छान आणि पचायला सोपेही होते. असे उकळलेले पाणी जरा निवले, की स्वच्छ सुती कापडाच्या साह्याने गाळून घेऊन स्वच्छ भांड्यात, मडक्‍यात साठवता येते. प्यायचे पाणी प्लॅस्टिकमध्ये मुळीच साठवू नये. पाण्यावर योग्य ते संस्कार केले, तर ते शुद्ध तर होईलच, पण पावसाळ्यासारख्या अवघड ऋतूत औषधाप्रमाणे योजता येईल.

पाण्याला पर्यायी शब्द आहे जीवन. अन्न उगवण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत, तहान भागवण्यापासून ते घर बांधण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी पाणी आवश्‍यक असते. पाणी शरीराच्या आत स्वीकारले जाते, तसेच बाह्य शुद्धीसाठीसुद्धा अनिवार्य असते. म्हणूनच पाणी प्यायचे असो वा बाहेरून वापरायचे असो, ते शुद्ध असणे आवश्‍यक असते. पाणी वहनशील असल्याने त्यात अशुद्धी मिसळण्याची, जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता अधिक असते. मात्र, यातून अनारोग्याला मोठे आमंत्रण मिळू शकते. पाणी दूषित झाले, तर एका वेळेला अनेकांचे आरोग्य बिघडते, साथीचे रोग बळावतात. विशेषतः पावसाळ्यात अशा प्रकारचा अनुभव हमखास येतो. म्हणून किमान पावसाळ्यात तरी पाणी शुद्ध करून घेणे, पाणी साठवताना, हाताळताना त्यात कोणताही संसर्ग होणार नाही, यासाठी दक्ष राहणे गरजेचे होय.

पाण्याची शुद्धता
आयुर्वेदाचे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा खरे तर आज आहे तसे पाणी प्रदूषणग्रस्त नव्हते. रासायनिक खते, विघटन न होऊ शकणारी कृत्रिम उत्पादने अशा गोष्टी वापरात नव्हत्या. तरीही प्यायचे पाणी, शरीरशुद्धीसाठी वापरायचे पाणी शुद्ध करून घेण्याची पद्धत होती. यावरून पाण्याची शुद्धता किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येऊ शकेल. 

अशुद्ध जलस्य शुद्धीकरणम्‌, अग्निक्वथनं, सूर्यातपप्रतापनं, तप्तायःपिण्डसिकतालोष्ट्राणां वा निर्वापणं नाम निक्षेपणं प्रसादनं च कर्तव्यं, नागचम्पकोत्पलपाटलापुष्प प्रभृतिभिश्‍चाधिवासनमिति।...सुश्रुत सूत्रस्थान
१. अग्नीच्या साह्याने उकळणे.
२. उन्हात तापविणे.
३. तापलेला लोखंडाचा गोळा, तापलेली वाळू किंवा तापविलेले मातीचे ढेकूळ पाण्यात बुडवणे.
४. पाण्याचे प्रसादन करणे म्हणजे नागचाफा, कमळ, पाटला वगैरे सुगंधी पुष्पांच्या साह्याने किंवा सुगंधी द्रव्यांच्या साह्याने पाणी सुगंधित करणे.
यातील पाणी उकळणे आणि सुगंधी द्रव्यांच्या योगे सुगंधित करणे हे दोन उपाय आजही आपण योजू शकतो. दिवसभर प्यावयास लागणारे पाणी रोज सकाळी किमान पंधरा-वीस मिनिटे उकळता येते. उकळताना त्यात शेवटी शेवटी चंदन, अनंतमूळ वगैरे सुगंधी व पाण्यातील विषद्रव्यांचा नाश करणारी द्रव्ये किंवा तयार ‘जलसंतुलन’ मिश्रण टाकण्याने पाणी लागतेही छान आणि पचायला सोपेही होते. असे उकळलेले पाणी जरा निवले, की स्वच्छ सुती कापडाच्या साह्याने गाळून घेऊन स्वच्छ भांड्यात, मडक्‍यात साठवता येते. प्यायचे पाणी प्लॅस्टिकमध्ये मुळीच साठवू नये. तांब्याच्या वा चांदीच्या भांड्यात पाणी साठवणे चांगले, पण ही भांडी आतून रोजच्या रोज स्वच्छ घासायला हवीत. संपूर्ण वर्षभर असे पाणी पिता येते, किमान पावसाळ्यात तरी नक्कीच प्यावे. 

पाणी दिसायला स्वच्छ, पारदर्शक दिसले, तरी त्यात दोष असू शकतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत घरात तुरटी, निर्मळीचे बीज असावे. चूळ भरण्यासाठी वापरायच्या पाण्यात तुरटी फिरवून घेतलेली असावी किंवा निर्मळीच्या बिया भिजवून पाणी स्वच्छ केलेले असावे. प्यायचे पाणी साठवायचा पिंप, कळशी वगैरे साधने आतून नियमितपणे स्वच्छ केली जावीत. स्नानासाठी वापरायच्या बादल्या आतून धुवून घेणे, घरातील पाण्याची टाकी व्यवस्थित साफ करणे, हेसुद्धा गरजेचे. 

अग्निरक्षणासाठी उपाय
या सर्व उपायांनी पाण्यातून संसर्ग होऊ नये यासाठी दक्ष राहता येते. बरोबरीने शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहावी, यासाठीही प्रयत्न करता येतात. पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्‍ती आणि शिथिल झालेले धातू प्रतिकारशक्‍ती कमी होण्यास कारणीभूत ठरतात. यासाठी पावसाळ्यात अग्निरक्षण करणे आणि धातूंची शक्‍ती कमी होणार नाही, अशी काळजी घेणे. या दोन गोष्टी गरजेच्या असतात. अग्निरक्षणासाठी पुढील उपाय करता येतात.

जेवणात पुदिना, लिंबू, आले, ओले खोबरे यापासून बनवलेली चविष्ट चटणी असणे चांगले. जेवणाच्या अगोदर आल्याचा छोटासा तुकडा सैंधव मिठासह चोखून खावा.

पावसाळ्यात बऱ्याचदा पोटात गुडगुडणे, जेवणानंतर पोट जड होणे, शौचाला बांधून न होणे वगैरे तक्रारी ऐकायला मिळतात. अशा वेळी अर्ध्या लिंबावर चिमूटभर हिंग, चिमूटभर ओवा, चिमूटभर हळद व दोन-तीन चिमूट काळे मीठ टाकून बोटाने दाबावे. ही लिंबाची फाक पळीत ठेवून मंद आच द्यावी. काही वेळाने खदखदू लागले की काढून घ्यावे. जेवणाच्या मध्यात असे हे लिंबू चोखून खाल्ल्यास किंवा याचा रस घेतल्यास अग्नीची ताकद वाढते व वरील सर्व तक्रारी हळूहळू नाहीशा होतात.

जेवायची इच्छा होत नसल्यास, थोडेही जेवले तरी पोट जड होत असल्यास, तसेच मलप्रवृत्ती चिकट होत असल्यास जेवणाच्या सुरुवातीला घासभर भातासह पाव चमचा ‘हिंग्वाष्टक चूर्ण’ किंवा ‘लवणभास्कर चूर्ण’ व दोन थेंब तूप मिसळून खावे व नंतर हलके जेवण जेवावे. 

पोट दुखून आव होणे, जुलाब होणे या तक्रारींवर सुंठ हे फार चांगले औषध आहे. सुंठ पाण्यात उगाळून तयार केलेल्या दोन चमचे गंधात चमचाभर तूप व चमचाभर गूळ टाकून एकत्र करून मंद आचेवर शिजवावे, खदखदू लागल्यावर थोडे थोडे चाटावे. यामुळे आव पडायची थांबते.

लोणी काढून तयार केलेल्या ताकामध्ये दोन चिमूट जिरे व चवीपुरते सैंधव मीठ टाकून घेतल्यास जुलाब कमी व्हायला मदत होते. बरोबरीने वायू धरणे, पोटात दुखणे वगैरे तक्रारीही कमी होतात. 

धातूंची शक्‍ती कायम राहण्यासाठी या दिवसांत अतिश्रम, अति जागरण, प्रवास, अतिव्यायाम वगैरे गोष्टी टाळणे श्रेयस्कर असते. घरच्या घरी अभ्यंग करणे, स्नानाच्या वेळी सुगंधी व वातशामक वनस्पतींपासून बनविलेले उटणे लावणे, यामुळे धातूंची शिथिलता काही अंशी कमी होते, शिवाय वातदोषही कमी होतो. 

अशा प्रकारे पाण्यावर योग्य ते संस्कार केले, तर ते शुद्ध तर होईलच, पण पावसाळ्यासारख्या अवघड ऋतूत औषधाप्रमाणे योजता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com