प्रश्नोत्तरे

FamilyDoctor_Questions
FamilyDoctor_Questions

माझे वय 43 वर्षे आहे व मला दोन मुली आहेत. माझ्या लहान मुलीसाठी केसांच्या समस्येवर आपण चांगला उपचार सांगितला व त्याचा तिला खूप फायदा झाला. माझी समस्या अशी आहे, की मला सायनसचा त्रास आहे. वातावरणात थोडाही बदल झाला, की लगेच सर्दी होते. यामुळे घोरण्याचाही त्रास होतो. मी यामुळे फार त्रस्त झाले आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावे. 
..... महाजन 

उत्तर - श्वास नीट व पुरेसा मिळणे हे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे होय. त्या दृष्टीने वारंवार सर्दी व सायनसचा त्रास होणार नाही, यासाठी उपचार करायला हवेत. काही दिवस रोज सकाळ- संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधाबरोबर घेण्याचा तसेच "ब्रॉंकोसॅन सिरप" घेण्याचा फायदा होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा गरम पाण्यात गवती चहा, ओवा, तुळशी, पुदिना यातील मिळतील ती द्रव्ये टाकून त्याचा वाफारा घेण्याचा उपयोग होईल. सायनसच्या ठिकाणी म्हणजे कपाळ, गालशिलांवर लवंग, सुंठ, दालचिनी, चंदन उगाळून तयार केलेला लेप लावण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात "नस्यसॅन घृता'चे दोन-तीन थेंब नियमितपणे टाकण्यानेही क्रमाक्रमाने श्वासाचे आरोग्य सुधारण्यास, तसेच घोरण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. 

माझा नातू सव्वा वर्षांचा आहे. त्याच्या पायाला खाज येऊन रक्‍त येते. त्याची त्वचा फार कोरडी आहे. काय लावावे? कृपया मार्गदर्शन करावे. आपले बालामृत देतो आहोत. .... राधिका पुरंदरे 
उत्तर - रक्‍त निघेपर्यंत खाज येणे, त्वचा कोरडी असणे हे रक्‍तदोषाचे, त्वचारोगाचे एक लक्षण असू शकते. तेव्हा एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम होय. बरोबरीने त्याला सकाळ, संध्याकाळ "संतुलन पित्तशांती'ची एक-एक गोळी देण्याचा फायदा होईल. अनंतमुळाचे पाव चमचा चूर्ण चार-पाच तासासाठी भिजत घालून नंतर गाळून घेतलेले पाणी पाजण्याचाही उपयोग होईल. आहारात घरी बनविलेले साजूक तूप किमान दोन-तीन चमचे असणे चांगले. तसेच अंडी, मासे, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगे, ब्रेड तसेच बेकरीतील इतर उत्पादने वर्ज्य करणे हे सुद्धा चांगले. पायाला खाज येते, तेव्हा त्यावर घरचे साजूक तूप किंवा कोकम तेल किंवा "संतुलन रोझ ब्युटी तेल' लावणेही हितावह ठरेल. 

माझी मुलगी पाच वर्षांची आहे, तिला दर पंचवीस-तीस दिवसांनी ताप येतो. डॉक्‍टरांची औषधे घेतली, की बरे वाटते. डॉक्‍टरांच्या सांगण्यावरून नुकत्याच रक्‍त व लघवीच्या तपासण्या करून घेतल्या; पण त्यात काही दोष नाही. वारंवार आजारपण येऊ नये, यासाठी तिला काय औषध आणि आहार द्यावा हे कृपया सांगावे. ... मयूरी 
उत्तर - रोगप्रतिकारशक्‍ती कमी असणे, अंगात कडकी असणे, पोटात जंत असणे अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. यादृष्टीने एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम होय. बरोबरीने प्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी मुलीला च्यवनप्राश, मधाबरोबर सितोपलादी चूर्ण, धात्री रसायन देण्यास सुरवात करता येईल. चांगल्या प्रतीचे आणि खात्रीचे गुळवेल सत्त्व उपलब्ध झाले, तर तेही काही दिवस कोरफडीच्या गराबरोबर देण्याचा उपयोग होईल; तसेच "समसॅन गोळ्या' देण्याचाही गुण येईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याचा, जेवणानंतर परिपाठादी काढा घेण्याचा उपयोग होईल. आहार ताजा व घरी बनविलेला, साधा असणे चांगले. तयार खाद्यपदार्थ तसेच दही, शीतपेये, वांगे, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर वगैरे गोष्टी टाळणे श्रेयस्कर. 

च्यवनप्राश घेण्याअगोदर व नंतर किती वेळाने दूध आणि पाणी प्यावे? काळा गूळ, तसेच काळा खजूर खावा का? ..... आनंद करंदीकर 
उत्तर - च्यवनप्राश हे एक रसायन आहे व रसायन हे "अनन्न' काळी म्हणजे पोट रिकामे असताना खाणे सर्वांत गुणकारी असते. या दृष्टीने सकाळी उठल्यावर मुखशुद्धी झाली, की च्यवनप्राश घेता येतो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने दूध, पाणी वगैरे घ्यायला हरकत नसते. साधा गूळ, खजुरापेक्षा काळा गूळ व काळा खजूर हा अधिक उष्ण असतो. त्यामुळे शरद, ग्रीष्म ऋतू वगळता; तसेच पित्ताचा त्रास होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांखेरीज इतरांना, पुरेसे साजूक तूप मिसळून गूळ व काळा खजूर खाता येईल. रक्‍तात लोहतत्त्वाची मात्रा कमी असल्यास काळा गूळ, काळा खजूर खाणे अधिक हितावह असते. गूळ कोणताही असो, तो रासायनिक प्रक्रिया न करता बनविलेला असणे अधिक महत्त्वाचे होय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com