प्रश्नोत्तरे

FamilyDoctor
FamilyDoctor

माझे वय 65 वर्षे आहे. माझ्या दोन्ही पायांवर गुडघ्याच्या खाली व्हेरिकोज व्हेन्स दिसतात. तेथील त्वचेचा रंग काळा-निळा झालेला आहे, तसेच पायांवर नसांचे जाळे झालेले आहे. सध्या काही त्रास होत नाही, परंतु भविष्यात काही अडचणी येऊ नयेत यासाठी आत्तापासून काय काळजी घ्यायला हवी, हे सुचवावे. .... कुलकर्णी 
उत्तर - व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्‍त वाहून नेणाऱ्या निळ्या रंगाच्या शिरा शिथिल होणे. सध्या त्रास होत नसला तरी शिरांमधील लवचिकता, स्थितिस्थापकत्व पुनर्स्थापित करण्यासाठी, शिथिलता कमी होण्यासाठी प्रयत्न नक्की करता येतात. पायांना हलक्‍या हाताने खालून वर या दिशेने अभ्यंग करणे, हा यावरचा उत्तम उपाय असतो. विशेषतः वातशामक आणि रसायन गुणाच्या औषधांनी संस्कारित केलेले "संतुलन अभ्यंग सिद्ध तेला'सारखे तेल यासाठी वापरणे उत्तम परिणामदायक असते. आठवड्यातून दोनदा अगोदर तेल लावून नंतर मीठ मिसळलेल्या कोमट पाण्यात पाय दहा-पंधरा मिनिटांसाठी बुडवून ठेवणे हेसुद्धा चांगले. बरोबरीने सुवर्णमाक्षिक भस्म, "सॅन रोझ' रसायन, योगराज गुग्गुळ, "संतुलन वातबल गोळ्या' घेणेही चांगले. 

माझे वय 66 वर्षे आहे. माझ्या पाठीत व कंबरेत फार दुखते, तसेच दोन्ही पायांच्या पोटऱ्यांमध्येही फार दुखते. पायांना कधी कधी मुंग्या येतात. डॉक्‍टरांची औषधे चालू असतात तोपर्यंत बरे वाटते; पण औषधे संपली की पुन्हा त्रास सुरू होतो. रक्‍त व लघवीच्या सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत. माझे वजनही बेताचे म्हणजे 50-52 किलोच्या आसपास असते. कृपया मार्गदर्शन करावे. ..... प्रमिला चव्हाण 
उत्तर - ही सर्व लक्षणे शरीरात वातदोष वाढल्याची निदर्शक आहेत. यावर केवळ तात्पुरते बरे वाटणारी औषधे घेण्याऐवजी मुळातील वाढलेला वातदोष कमी करणारे उपचार घ्यायला हवेत. नियमित अभ्यंग हा वातावरचा उत्तम उपाय असतो. तेव्हा पाठीला खालून वर या दिशेने "संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल' आणि बाकी संपूर्ण शरीराला, विशेषतः पायांना "संतुलन अभ्यंग सिद्ध तेल' लावण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून एक-दोन वेळा कंबर- पाठीला अगोदर तेल लावून वरून शेक करण्याचाही फायदा होईल. यासाठी निर्गुडी, शेवगा, सागरगोटा, एरंड यातील मिळतील त्या वनस्पतींची पाने वाफवून वापरता येतील. "संतुलन वातबल गोळ्या', तसेच तूप- साखरेसह "संतुलन प्रशांत चूर्ण' घेण्याचाही उपयोग होईल. हे उपचार करण्याचा फायदा होईलच, बरोबरीने वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वातशामक तेलाच्या बस्ती घेण्याचाही उपयोग होईल. कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगे, गवार, वाटाणा, चवळी, चणे, वाल वगैरे वातूळ गोष्टी आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर. 

मला सात-आठ महिन्यांपूर्वी पाठ व पोटावर नागीण उठली होती. त्या वेळी औषधे, मलम वगैरे उपचार करून मी बरी झाले. आता त्वचेवर जखम किंवा डाग वगैरे काहीही नाही; पण नागीण उठलेल्या ठिकाणी अजूनही दुखते आहे. यावर काही उपाय सुचवावा. ... अनुपमा गणपत्ये 
उत्तर - नागीण हा एक असा विकार आहे, की त्याचा शरीरावर, विशेषतः रक्‍तावर झालेला दुष्परिणाम पूर्णतः बरा होण्यासाठी दीर्घकाळ उपचार करण्याची आवश्‍यकता असते. रक्‍तातील विषार नष्ट होण्यासाठी पंचतिक्‍त घृत घेण्याचा फायदा होईल, "मंजिष्ठासॅन गोळ्या', "संतुलन पित्तशांती गोळ्या' घेण्याचाही उपयोग होईल. ज्या ठिकाणी नागीण उठली होती, तेथे शतधौतघृत किंवा "संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल' दिवसातून दोन वेळा लावण्याचाही उपयोग होईल. चंदन, रक्‍तचंदन, अनंतमूळ, ज्येष्ठमध यापैकी मिळतील ती द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप दुखणाऱ्या जागी लावण्यानेही बरे वाटेल. आंबवलेले पदार्थ, दही, टोमॅटो, वांगे, ढोबळी मिरची, अननस, फार तिखट पदार्थ, अंडी या गोष्टी आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर होय. 

माझे वय 45 वर्षे आहे. माझ्या पोटात व पाठीला डाव्या बाजूला नेहमी दुखते. तोंड सतत आलेले असते. जिभेवर आंबटपणा जाणवतो. रात्र झाली की अंगाला खाज सुटणे, पित्त उठणे, छातीत धडधडणे, बेचैन वाटणे असे त्रास जाणवतात. पोटही नीट साफ होत नाही. पोटा-पाठीला दुखते म्हणून डॉक्‍टरांनी सोनोग्राफी, एंडोस्कोपी वगैरे बऱ्याच तपासण्या करून घेतल्या; पण पित्ताशिवाय दुसरा काही दोष नसल्याचे सांगितले. कृपया यावर औषधोपचार सुचवावा. .... संगीता शेरला 
उत्तर - पचन सुधारणे आणि वाढलेले पित्त कमी करणे, शरीराबाहेर काढून टाकणे यासाठी मदत करणारे उपचार घेणे आवश्‍यक आहे. यासाठी जेवणाच्या तसेच झोपण्याच्या वेळा नियमित असणे आवश्‍यक. सकाळी तसेच संध्याकाळी नाश्‍त्यासाठी साळीच्या लाह्या-दूध घेणे. जेवणातही तांदूळ, मुगाची डाळ, ज्वारी यावर भर देणे. काही दिवस तेलाऐवजी घरी बनविलेल्या साजूक तुपात स्वयंपाक करणे चांगले. "संतुलन पित्तशांती गोळ्या', "सॅनकूल', गुलकंद घेण्याचा, तसेच नियमित पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून एकदा दोन-अडीच चमचे एरंडेल घेऊन पोट साफ करून घेण्याचाही फायदा होईल. पोटावर "संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल' जिरवण्याने दुखणे कमी होण्यास मदत मिळेल, तसेच "संतुलन सुमुख तेला'चा गंडूष करण्याने तोंड येण्याची प्रवृत्ती बंद होण्यासही मदत मिळेल. आहार व आचरणातील या बदलांचा, तसेच औषधोपचारांचा फायदा होईलच, तरीही एकदा वैद्यांच्या सल्ल्याने शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन व बस्ती करून घेणे सर्वोत्तम होय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com