प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझे बाळ चार महिन्यांचे आहे. गरोदरपणात मी डॉ. श्री बालाजी तांबे यांचे ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तक वाचले होते आणि त्याचा मला खूप उपयोग झालेला आहे. मी बाळाला जन्मापासून बाळगुटी, बालामृत व सोने मधातून देते आहे. बालामृतामुळे त्याची कांती सतेज झाली आहे. तरी अजून काही औषध किंवा रसायन देण्याची गरज आहे का?
...प्राची शिंदे

उत्तर -
‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील मार्गदर्शनाचा उपयोग झाल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद. पहिल्या सहा वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूचा झपाट्याने विकास होत असतो. या दृष्टीने बालामृत, मध व सोने हे  उत्तम असतातच. बरोबरीने ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ देणेही उत्तम होय. चार महिन्यांच्या बाळाला बाळगुटीमध्ये दोन-तीन थेंब या प्रमाणात हे घृत मिसळून देता येईल. क्रमाक्रमाने हे प्रमाण थोडे वाढवत वर्षाच्या बाळाला एकअष्टमांश चमच्यापर्यंत, तीन वर्षांपर्यंत पाव चमचा व त्यानंतर अर्धा चमचा या प्रमाणात देता येईल. सहा महिन्यांनंतर अन्नप्राशन संस्कार करून इतर खाणे सुरू झाले की, अर्धा-अर्धा चमचा ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचाही उपयोग होईल. या व्यतिरिक्‍त रोज अभ्यंग, धुरी, डोळ्यात ‘सॅन अंजन काजळ (काळे)’ घालणे, विशेष उटण्याने अंघोळ घालणे  हे सर्व बाळाच्या एकंदर विकासासाठी, प्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी उत्तम होय.

*********************************************************

माझे वय २१ वर्षे आहे. काही दिवसांपासून माझे डोक्‍यावरचे केस अचानकपणे मोठ्या प्रमाणावर गळत आहेत. तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे. माझे वजनसुद्धा उंचीच्या मानाने कमी आहे
... भालचंद्र

उत्तर -
एकाएकी केस गळण्यामागे सहसा चिंता हे मुख्य कारण असते. मात्र या व्यतिरिक्‍त शरीरात उष्णता वाढणे, हाडांना आवश्‍यक ते पोषण न मिळणे हीसुद्धा केस सगळ्यामागची कारणे असतात. डोके शांत होण्यासाठी तसेच उष्णता कमी होण्यासाठी पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. हाडांना तसेच केसांना पोषण मिळण्यासाठी ‘हेअरसॅन गोळ्या’ घेण्याचा तसेच केसांच्या मुळाशी ‘संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल‘ लावण्याचा उपयोग होईल. केस रंगवण्यासाठी, धुण्यासाठी किंवा विशिष्ट केशरचनेसाठी रासायनिक द्रव्यांचा वापर केला जाणार नाही याकडे लक्ष ठेवणे, विशेषत- केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले मिश्रण किंवा ‘संतुलन सुकेशा‘ हा हेअर वॉश वापरणे श्रेयस्कर. उष्णता कमी होण्यासाठी ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’, प्रवाळपंचामृत घेणे चांगले. उष्णता कमी झाली, हाडांपर्यंत पोषण मिळाले की वजन वाढण्यास मदत मिळेल. बरोबरीने नियमित अभ्यंग करणे चांगले. आहारात दूध, खारीक, खसखस, डिंकाचा लाडू, पंचामृत, साजूक तूप वगैरे पौष्टिक वस्तूंचा समावेश करणे उत्तम होय.

*********************************************************

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाचा आमचे संपूर्ण कुटुंब उपयोग करून घेते. माझे वय ३७ वर्षे असून प्रत्येक महिन्यात मासिक पाळीच्या आधी किंवा पाळी सुरू असताना माझे डोके खूप दुखते व कणकण येते. वेदनाशामक गोळी घेतली तरच डोकेदुखी थांबते. कृपया यावर उपाय सुचवावा. एरवीसुद्धा डोके दुखते, पण पाळीच्या आधी नक्कीच दुखते. 
... क्ष

उत्तर -
पाळीच्या आधी किंवा पाळीदरम्यान पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी वगैरे काही ना काही त्रास होणे ही समस्या अनेक स्त्रियांमध्ये आढळते. असा त्रास होणे हे सामान्य लक्षण आहे असे समजून त्यावर उपचारही घेतले जात नाहीत. मात्र स्त्रीसंतुलनासाठी प्रयत्न केले की हा त्रास पूर्णत- बरा होऊ शकतो. या दृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू नियमित वापरण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. नियमित शतावरी कल्प घेण्याने, ‘अशोक-ॲलो सॅन’ गोळ्या तसेच धात्री रसायन घेण्याने सुद्धा पाळीच्या आदी किंवा पाळीदरम्यान होणारे त्रास कमी होतात असा अनुभव आहे. पादाभ्यंग करण्याने डोकेदुखी, कणकण वगैरे तक्रारी कमी होतील. रोज सकाळी लाह्यांचे पाणी, भिजविलेल्या आठ-दहा काळ्या मनुका, अंजीर घेण्याने रसधातूला ताकद मिळाली व अतिरिक्‍त उष्णता कमी झाली की या प्रकारच्या तक्रारी कमी होतील. तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली एकदा उत्तरबस्ती हा स्त्री संतुलनासाठीचा उत्तम उपचार करून घेणे सर्वांत चांगले.

*********************************************************

माझ्या मुलाचे वय सहा वर्षे आहे, त्याला तीन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास आहे. तो जेवण व्यवस्थित करतो, शाकाहार तसेच मांसाहार घेतो. त्याला शौचाला रोज होते, पण ठराविक वेळेला होत नाही. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी करून पाहिली, त्यात आतड्यांना थोडी सूज आल्याचे समजले. मात्र त्यांनी दिलेल्या औषधांनी तात्पुरता फरक पडला. सध्या त्याचे पोट रोजच दुखते. प्रवासादरम्यान उलट्या होतात. कृपया मार्गदर्शन करावे. 
... हेमांगी नाईक

उत्तर - पोट दुखणे, शौचाला अनियमित वेळी होणे, आतड्यांवर सूज असणे ही सर्व लक्षणे असताना मांसाहार टाळणे चांगले होय. कारण पचनाशी संबंधित कोणत्याही विकारावर पचण्यास सोप्यात सोपा आहार घेणे ही उपचारांची पहिली पायरी असते. मुलाला रोज सकाळ-संध्याकाळ मूठभर साळीच्या लाह्या, प्रवाळपंचामृत, कामदुधा या गोळ्या देण्याचा उपयोग होईल. काही दिवस गव्हाऐवजी तांदूळ व ज्वारीवर अधिक भर देण्याचाही उपयोग होईल. पोट दुखते तेव्हा तसेच एरवीसुद्धा दिवसातून दोनदा पोटावर ‘संतुलन रोझ ब्यूटी तेल’ हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होईल. पंधरा दिवसांतून एकदा चमचाभर एरंडेल तेल किंवा पाव चमचा कपिला चूर्ण व पाव चमचा गूळ हे मिश्रण घेऊन सकाळी पोट साफ होऊ देण्याचाही चांगला उपयोग होईल. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही वय लहान आहे त्या दृष्टीने समूळ उपचार होण्यासाठी एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय.

*********************************************************

मी  चाळीस वर्षांची आहे. जेवणानंतर किंवा काहीही खाल्ले तर मला पोट फुगल्यासारखे होते. शौचाला जाऊन आल्यावर फार थकल्यासारखे वाटते. पोट व्यवस्थित साफ होत नाही. उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायले तरी तहान शमत नाही. खजूर, गूळ असे काहीही खाल्ले तरी डोके दुखते. अविपत्तिकर चूर्ण घेते आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
... कुमुद

उत्तर - एकंदर सर्व लक्षणांचा विचार करता शरीरात उष्णता तर वाढलेली आहे, पण अग्नी मंदावलेला आहे असे दिसते. अग्नीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी जेवणापूर्वी सैंधव मीठ व जिऱ्याची पूड टाकून आल्या-लिंबाचा रस घेता येईल. जेवणानंतर ताज्या गोड ताकात अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण घेणे, ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेणे, जेवताना साध्या पाण्याऐवजी अगोदर उकळलेले कोमट पाणी पिणे हे उपाय योजता येतील. रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याने उष्णता कमी होण्यास तसेच पोट साफ होण्यासही मदत मिळेल. पाणी पिऊनही तहान शमत नाही यामागे तसेच गूळ, खजूर यांसारख्या उष्ण गोष्टी खाण्याने डोके दुखते यामागे सुद्धा शरीरात उष्णता अधिक असणे हेच कारण आहे. वरील उपायांनी तसेच ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा या गोळ्या घेण्याने उष्णता कमी झाली की हे त्रासही आपोआप दूर होतील. ढोबळी मिरची, वांगे, गवार, कच्चा टोमॅटो, दही, काजू, पिस्ता वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणे इष्ट.

*********************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com