प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 14 जुलै 2017

मी   दर शुक्रवारी ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमाने वाचते. माझे वय ३२ वर्षे आहे. डॉक्‍टरांनी पीसीओडीचा त्रास असल्याचे सांगितले आहे. माझी मासिक पाळी अनियमित आहे. आतापर्यंत बाळासाठी खूप उपचार केले, हॉर्मोन्सची इंजेक्‍शन्स घेऊनही गर्भधारणा झालेली नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे.
... संगीता 

मी   दर शुक्रवारी ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमाने वाचते. माझे वय ३२ वर्षे आहे. डॉक्‍टरांनी पीसीओडीचा त्रास असल्याचे सांगितले आहे. माझी मासिक पाळी अनियमित आहे. आतापर्यंत बाळासाठी खूप उपचार केले, हॉर्मोन्सची इंजेक्‍शन्स घेऊनही गर्भधारणा झालेली नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे.
... संगीता 

निसर्गतः आणि नियमित पाळी येणे हा स्त्रीसंतुलनाचा आरसा असतो. गर्भधारणा होण्यासाठी, तसेच गर्भाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी स्त्रीसंतुलन महत्त्वाचे असते. यासाठी औषधोपचार, पथ्यकर आहार, योगासने, मानसिक सकारात्मकता, शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी असे सर्व बाजूंनी उपचार करणे गरजेचे असते. अशा केसेसमध्ये उत्तरबस्ती या उपचाराचाही उत्तम गुण येताना दिसतो. बरोबरीने ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू, कुमारी आसव, ‘संतुलन फेमिनाईन बॅलन्स’ आसव, ‘संतुलन अशोकादी घृत’, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. ‘स्त्रीसंतुलन’ हे स्वास्थ्यसंगीत रोज ऐकणेही श्रेयस्कर. 

पित्ताशयातील खडे पुन्हा पुन्हा तयार होऊ नयेत यासाठी काही उपचार करता येतात का? माझ्या पित्ताशयातील खडे औषधांनी बरे झाले, पण पुन्हा त्रास होऊ नये यासाठी मार्गदर्शन करावे.
... साळी 

पित्ताशयात खडे होऊ नयेत, तसेच खडे असले तरी पित्ताशय काढून टाकण्याची गरज पडू नये, यासाठी शरीरात पित्तदोष वाढणार नाही यादृष्टीने प्रयत्न करायचे असतात. यादृष्टीने कामदुधा, प्रवाळपंचामृत गोळ्या घेणे, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे उत्तम. आहारात फार तिखट, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, कृत्रिम रंग टाकलेले खाद्यपदार्थ, प्रिझर्वेटिव्हज्‌युक्‍त पदार्थ खाणे टाळणेसुद्धा आवश्‍यक. शरीरात पित्तदोष साठून न राहता त्याचा वेळेवर निचरा होऊन जावा यासाठी शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन करून घेणे, तसेच दर पंधरा दिवसांनी एरंडेल किंवा तत्सम मृदू विरेचन घेऊन पोट साफ होऊ देणे हे सुद्धा चांगले. 

माझे वय ४४ वर्षे आहे, मला पोट फुगण्याचा व त्यामुळे छातीवर दडपण येण्याचा त्रास आहे, सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत, रक्‍तदाबही योग्य आहे. मी या त्रासाने फार त्रस्त आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
... राजश्री बोऱ्हाडे

तपासण्या, रक्‍तदाब वगैरे व्यवस्थित आहे हे चांगले आहे. तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांकडून नाडीपरीक्षण करून नेमके निदान करून घेणे चांगले. बरोबरीने जेवणानंतर पुनर्नवासव, ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेणे चांगले. जेवणापूर्वी अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण आले-लिंबाच्या रसाबरोबर घेण्याचा, जेवताना तसेच जेवणानंतर उकळून घेतलेले गरम पाणी पिण्याचा उपयोग होईल; एरवीसुद्धा अगोदर उकळून घेतलेले पाणी पिणे चांगले. रोज वीस मिनिटे चालायला जाणे आणि सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे हे सुद्धा श्रेयस्कर होय.

माझ्या दोन्ही मुलींना, वय वर्षे २५ व २६, चारचाकी गाडीत किंवा बसमध्ये प्रवास करताना मळमळते व उलट्या होतात. यावर काय उपाय करावा?
... सुदाम शिंदे 

या प्रकारची गाडी लागण्याची प्रवृत्ती आटोक्‍यात ठेवता येऊ शकते. यासाठी उपाशी पोटी प्रवास करणे, तसेच जेवल्या जेवल्या लगेच प्रवास करणे टाळणे चांगले असते. विशेषतः चहा, दूध, उसाचा रस यांसारखे द्रवपदार्थ पिऊन लगेच गाडीत बसणे टाळणे इष्ट. गाडी लागण्याचा त्रास असणाऱ्यांसाठी साळीच्या लाह्या उत्तम असतात. प्रवासात कायम लाह्या जवळ ठेवण्याचा आणि मळमळ होते आहे असे जाणवल्यास लगेच थोड्या थोड्या कोरड्या लाह्या चावून खाण्याचा उपयोग होताना दिसतो. घरी बनविलेली आवळ्याची सुपारी चघळण्यानेही उलटीची प्रवृत्ती कमी होऊ शकते. गाडी लागू नये यासाठी मनगटाच्याखाली दोन बोटे जे मर्मस्थान असते, त्यावर दाब देण्याचाही उपयोग होतो. यासाठी विशेष बेल्टसुद्धा उपलब्ध असतात, त्यांचाही वापर करता येतो.