प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

एक महिन्यापासून माझा एक कान गच्च झाला आहे. तसेच कधी कधी कानातून पाणी येते. डॉक्‍टरांनी कानाच्या पडद्याला छिद्र असल्याचे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या तर पूर्ण अंगावर सूज येते. कृपया मार्गदर्शन करावे...... लता

उत्तर - कानाचा गच्चपणा कमी होण्यासाठी काही दिवस दररोज वाफारा घेणे चांगले. पाण्यात चार-पाच तुळशीची पाने, थोडा गवती चहा, ओवा, आले यापैकी मिळतील ती द्रव्ये टाकून आलेली वाफ घेता येईल. सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घेणे, ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेणे याचाही उपयोग होईल. तसेच कानाला ‘संतुलन प्युरिफायर धुपा’ची किंवा वावडिंग, ओवा, धूप, गुग्गुळ यांची धुरी देण्याचाही उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने गंधकरसायन, सूक्ष्म त्रिफळा घेण्याचाही फायदा होईल.

---------------------------------------------------------------------

मी  ज्येष्ठ नागरिक असून मला दिवसा व रात्री वारंवार लघवीला जावे लागते. यूरॉलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार लघवीच्या जागेचे तोंड संकुचित झाले आहे व शस्त्रकर्माची आवश्‍यकता आहे. परंतु माझी शस्त्रकर्म करण्याची इच्छा नाही. आपल्या ‘प्रश्नोत्तर’ सदरातील मार्गदर्शनानुसार मी फेमिसॅन तेल, पुनर्नवासव, प्रशांत चूर्ण व साजूक तूप घेण्यास सुरवात केली आहे. हे बरोबर आहे का? कृपया मार्गदर्शन करावे..... शोभा
उत्तर - 
आपण घेता आहात ते सर्व बरोबर आहे. आहाराबरोबर, विशेषतः जेवणाच्या आधी दोन-दोन चमचे घरी बनविलेले साजूक तूप घेणे चांगले. या उपायांच्या बरोबरीने आयुर्वेदोक्‍त अवगाह स्नेह किंवा कटिस्नान घेण्याचाही अशा केसेसमध्ये चांगला उपयोग होताना दिसतो. पुनर्नवा, गोक्षुर, अनंतमूळ वगैरे मूत्रवहसंस्थेवर काम करणाऱ्या द्रव्यांचा काढा किंवा वैद्यांच्या सल्ल्याने तयार संतुलन किडनी बाथ मिश्रणाचा काढा करून तो बसायच्या टबमध्ये भरून त्यात बसून शेक घेणे हे सुद्धा उपयोगी पडेल. वाल, चवळी, पावटा, राजमा, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, गवार, वांगे, आंबट दही यासारख्या गोष्टी आहारातून वर्ज्य करणे चांगले.

---------------------------------------------------------------------
मी  २७ वर्षांची युवती असून गेल्या तीन वर्षांपासून माझी पाळी अनियमित झाली आहे, वजनही वाढले आहे. डॉक्‍टरांची औषधे घेतली तर त्या महिन्यामध्ये पाळी येते, नंतर पुन्हा उशिरा येते. वजन कमी करण्यासाठी मी दिवसभर फक्‍त फळे खाते व रात्री जेवते. पण असे करूनही माझे वजन फक्‍त दोन किलो कमी झाले आहे. कृपया उपाय सुचवावा.
.... राधिका बैसाने

उत्तर - वजन वाढण्याचे मुख्य कारण अनियमित पाळी, पर्यायाने स्त्री-असंतुलन हे आहे. त्यामुळे यावर नुसते डाएट करून चालणार नाही. त्यातून दुपारी व्यवस्थित जेवण न करता फक्‍त रात्री जेवण्याने तर वजनही कमी होणार नाही, उलट शरीरात वात-पित्त असंतुलन होण्याची आणि शरीरशक्‍ती कमी होण्याची शक्‍यता वाढेल. स्त्री-संतुलनासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी, कुमारी आसव, ‘फेमिनाईन बॅलन्स आसव’, चंद्रप्रभा गोळी तसेच शतावरी कल्प घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेण्याचाही उपयोग होईल. नियमित चालायला जाणे, सूर्यनमस्कार करणे, रात्री झोपण्यापूर्वी अभ्यंग करणे हे सुद्धा चांगले. या उपायांचा फायदा होईलच, पण तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप नेमकी औषधे सुरू करणे आणि लवकरात लवकर स्त्रीसंतुलन प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर होय. उत्तरबस्ती, उत्तरधूप करणेही फायदेशीर होईल.

---------------------------------------------------------------------

मी  सुवर्णसिद्ध जल तयार करण्यासाठी पाच ग्रॅम सोने खरेदी केले आहे, ते किती लिटर पाण्यात उकळावे याची माहिती द्यावी.  .... शेगोकार

उत्तर - घरातील सर्वांना पिण्यासाठी आवश्‍यक असेल तेवढ्या अथवा म्हणजे साधारण वीस लिटर पाण्यात सोने टाकून पाणी उकळण्यास ठेवता येईल. एकदा उकळी फुटली, की पंधरा ते वीस मिनिटे उकळत ठेवून थोडे गार झाले, की सोने काढून घेऊन पाणी जाडसर सुती कापडातून गाळून घेता येईल. आवश्‍यकतेनुसार पिण्यासाठी वापरता येईल. घरात एक-दोनच व्यक्‍ती असल्या तर यापेक्षा कमी पाणी घेतले तरी चालेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com