राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा

जलतत्त्व हे स्नेहाचे प्रतीक असते, व्यवहारात आपण मायेच्या डोहात डुंबणे, स्नेहाचा ओलावा वगैरे शब्दप्रयोग करतो. आयुर्वेदातही दोन गोष्टींना एकत्र राहण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी जलतत्त्व कारणीभूत असते, असे सांगितले जाते. थोडक्‍यात नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नातेसंबंधातला ओलावा, स्नेहभाव टिकवला जातो. निसर्गातील जलतत्त्व, पर्यायाने शरीरातील जलतत्त्व संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. ऐन पावसाळ्यात, श्रावण महिन्याच्या मध्यात नारळी पैर्णिमा येते. या दिवशी बहीण-भावाला राखी बांधते, तसेच जलतत्त्वाची पूजाही केली जाते. समुद्रकिनाऱ्यावर राहणारे लोक समुद्राला नारळ अर्पून पावसाळ्यामुळे रौद्र रूप धारण केलेल्या समुद्राला शांत होण्यासाठी प्रार्थना करतात, तर इतर लोक जलतत्त्वाचे प्रतीक म्हणून विहीर, तळे, जलाशयाची पूजा करतात. 


जलतत्त्व हे स्नेहाचे प्रतीक असते, व्यवहारात आपण मायेच्या डोहात डुंबणे, स्नेहाचा ओलावा वगैरे शब्दप्रयोग करतो. आयुर्वेदातही दोन गोष्टींना एकत्र राहण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी जलतत्त्व कारणीभूत असते, असे सांगितले जाते. 


थोडक्‍यात नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नातेसंबंधातला ओलावा, स्नेहभाव टिकवला जातो. निसर्गातील जलतत्त्व, पर्यायाने शरीरातील जलतत्त्व संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. 


या दिवशी समुद्राला किंवा पाण्याला नारळ अर्पण करायची प्रथा आहे, तसेच जेवणात नारळीभात समाविष्ट करण्याचीही प्रथा आहे. यातल्या घटकद्रव्यांचे गुणधर्म विचारात घेतले तर वर्षा ऋतूत येणाऱ्या या सणासाठी हे पक्वान्न कसे समर्पक आहे, हे लक्षात येईल. 


नावाप्रमाणेच नारळीभातातील मुख्य घटक असतो नारळ. नारळीभातात ओला नारळ वापरला जातो. मुळात नारळाचे वृक्ष आनूप देशात म्हणजे भरपूर पाणी असलेल्या प्रदेशात येतात. 


आनूपदेशोद्भवोऽयम्‌ ।...चरक कल्पस्थान 
नारळाचे गुण याप्रमाणे सांगितले आहेत. 
बल्यं मांसदं वृष्यं बृंहणं बस्तिशोधनं तृष्णाशोषघ्नं च ।...चरक सूत्रस्थान 


नारळ ताकद वाढवतो, विशेषतः मांसधातूचे पोषण करतो, शुक्रधातूची ताकद वाढवतो, रसधातूपोषक असल्याने तहान शमवतो. शरीराचे पोषण करतो, लघवी साफ होण्यास मदत करतो, वात-पित्तदोषांचे शमन करतो, स्निग्ध असल्याने शरीराचे उचित स्नेहन करतो. 


वर्षा ऋतू हा वातप्रकोपाचा काळ असतो. पावसाळ्यात सर्वांच्याच शरीरातला वातदोष स्वाभाविक रीत्या वाढलेला असतो, बरोबरीने शरीरशक्‍तीही कमी झालेली असते. या दोन्ही गोष्टी संतुलित करण्यासाठी नारळासारखे दुसरे फळ नाही. 


भात पचायला हलका तरीही भुकेचे समाधान करणारा, पोट भरल्याची जाणीव करून देणारा असतो. पावसाळ्यात शरीरातील अग्नी मंद झालेला असतो, फारशी भूक लागत नाही, अशा वेळेला नारळीभातासारखे पक्वान्न आदर्श होय, ज्यामुळे काहीतरी गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते, गोड चवीमुळे शरीरशक्‍ती कायम राहण्यास मदत मिळते, पण पचनावर ताण मात्र येत नाही.

  
नारळी भातात आवर्जून टाकायचे असते "केशर‘. केशर सुगंधी तर असतेच पण पावसाळ्यात मंद होऊ पाहणाऱ्या अग्नीला दीप्त ठेवण्याचेही काम करते. पावसाळ्यातल्या थंड वाऱ्यामुळे गारठलेल्या शरीराला ऊबदार ठेवण्याचे काम करते, पावसाळ्यातल्या दमट हवेमुळे होऊ शकणारे सर्दी, खोकला, ताप यासारखे त्रास टाळण्यासाठी केशर हे एक अप्रतिम द्रव्य आहे. 


अशा प्रकारे राखीपौर्णिमेच्या निमित्ताने नारळीभात खाऊन आपण शरीरातला स्नेह तर राखी बांधून परस्परातला स्नेह वृद्धिंगत करत असतो. 
राखीचे स्वरूप आधुनिक काळात झपाट्याने बदलत आहे. राखीपौर्णिमेच्या काही दिवस आधी बाजारात गेल्यास नजर ठरणार नाही अशा असंख्य प्रकारच्या मॉडर्न राख्या बघायला मिळतात. गंमत म्हणून राखीत नावीन्य आणि आधुनिकता आणली तरी मुळातल्या रेशमी बंधनाची प्रतीक असणारी राखी रेशमी धाग्याचीच बनवलेली असावी. कैक वेळा मोबाईल किंवा तत्सम मोठ्या आकाराच्या राखीला आधार देण्यासाठी नायलॉनचा धागा वापरला जातो त्यावर रंग देण्यासाठी रासायनिक रंग वापरले जातात. अशामुळे त्वचेवर पुरळ, खाज वगैरेही त्रास होऊ शकतात त्यामुळे बांधायचा धागा मऊ, रेशमी व नैसर्गिक द्रव्यांनी रंगवलेला असावा. 


छोट्या मुलांना राखी बांधायची असल्यास छोटे छोटे मणी, टिकल्या, चकचक, अनैसर्गिक रंग वगैरे लावलेली राखी बांधू नये, कारण लहान मुलांची राखी तोंडात घालायची प्रवृत्ती असते. अशा मुलांना नुसता रेशमाचा धागा अथवा लहानसा गोंडा असलेली राखी बांधावी. राखी बांधताना फार आवळून बांधू नये, विशेषतः बहीण व भाऊ लहान असताना आई-वडिलांनी लक्ष ठेवावे. 


एक गोष्ट नक्की की, कोणाकडे निव्वळ तलवार वा रिव्हॉल्व्हर आहे म्हणून त्या व्यक्‍तीद्वारा संरक्षण होईलच असे नाही, कारण तलवार वा रिव्हॉल्व्हर धरणाऱ्याच्या मानसिकतेवर, मनावर व त्याच्या मेंदूवर रक्षण करायचे की नाही हे अवलंबून असते. मनगट व दंड ही ताकदीची स्थाने समजली जातात. मनगटातला जोर आणि दंडातली बळकटी ही रक्षणकर्त्याच्या अंगी असायलाच हवीत. म्हणूनच आपल्या रक्षणाची आठवण करून देण्यासाठी बहीण-भावाच्या मनगटावर आपल्या स्नेहाचा रेशीमधागा बांधत असावी. आणि तरीही भावावरची माया व प्रेम हेच खरे काम करतात. परिणाम जरी शारीरिक पातळीवर दिसला तरी मानसिक व आत्मिक पातळीवर एकमेकावर प्रेम असणे आवश्‍यक आहे. 


म्हणून राखी पौर्णिमा ही खरी "आरोग्यबंधन पौर्णिमा‘ आहे. एक गोष्ट निश्‍चित की एखाद्या माणसाचे आरोग्यच जर चांगले नसले तर ते कुटुंबाचे आरोग्य कसे सांभाळणार? आपण समाजात अनेक व्यक्‍ती व्यसनाधीन झालेल्या पाहतो. पण ही मंडळी व्यसनाधीन का होतात, याचा विचार करता असे दिसते की घरात नातेसंबंध ठीक नसलेले व नातेसंबंधात ताण असलेले लोक व्यसनाधीन होतात किंवा वाममार्गाला लागतात. तेव्हा आरोग्य टिकवायला हवी असणारी मनःशांती किंवा मनाची ताकद मिळते कुटुंबातूनच. कुटुंबातील घट्टपणा नातेसंबंधावरच अवलंबून असल्याने आपल्याला तो राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मिळू शकतो. 


सध्या फॅशन म्हणून अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर राख्या बाजारात मिळतात. एखादीला भाऊ नसला तरी सुंदर राखी आणून कुणाला तरी बांधण्याचा मोह होतो. परदेशात राहणारे भारतीय तर हा कार्यक्रम अवश्‍य करतात. काही ठिकाणी भावाला राखी बांधायला बहिणी अधिक उत्सुक असतात असेही दिसते. अशा अनेक कारणांमुळे राखीबंधनाचे महत्त्व पुन्हा येत आहे. 


धाग्याचे पावित्र्य, त्यामागे असलेले विचार हे सर्व लक्षात घेऊन जर हा सण साजरा केला तरच पूर्ण फायदा होईल. राखीबंधनाचा सण साजरा केल्यावर पुढे वर्षभर कौटुंबिक नाती सांभाळून सर्व नात्यांना योग्य तो मान व संरक्षण (संरक्षण म्हणजे मानसिक व विचारांचे संरक्षण सुद्धा, प्रत्येक वेळी संरक्षण फक्‍त शत्रूपासूनच नसते) दिले जाईल तेव्हाच राखीबंधनाचे सार्थक होईल. 

डॉ. श्री बालाजी तांबे 
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com