उन्हाळी फळे 

balaji-tambe
balaji-tambe

माणसाला ऊब हवी असते, अग्नी हवा असतो. अग्नी हा सर्व दैवी शक्‍तींचा पूर्वज-अग्रज. तो कमी असूनही चालत नाही व अधिक होऊनही चालत नाही. शरीरात अग्नी नीट नसला तर पचन नीट होणार नाही, तसेच चुलीतील अग्नी नीट नसला तर अन्न नीट शिजणार नाही. बऱ्याच वेळा नुसती उष्णता वाढवून चालत नाही, त्याबरोबर ज्वाळाही आवश्‍यक असतात, अन्यथा पोळी, भाकरी फुलत नाही. उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात. एकूणच उन्हाळा त्रासदायक वाटला तरी उन्हाळा नसला तर जमीन भाजली न गेल्यामुळे ती उपजाऊ होणार नाही, पाण्याची वाफ झाली नाही तर पावसाळा येणार नाही. शुद्ध करणे हे अग्नीचे काम असल्याने अग्नी नसल्यास संपूर्ण शुद्धी होणार नाही. तेव्हा उन्हाळ्याचेही आपण स्वागत करायला पाहिजे. तसे पाहता काही प्रदेशात उन्हाळा खूप तीव्र असतो व काही ठिकाणी उन्हाळ्याचे मान कमी असते. पण एकंदरीत दिवसेंदिवस सध्या उन्हाळा वाढत असल्याचे दिसते. उन्हाळ्याचा कालावधीही वाढताना दिसतो आहे. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढताना दिसते आहे. एकूणच अनेक ठिकाणी ऊब मिळण्यापेक्षा अंग भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याचा अनुभव येताना दिसतो आहे. 

अशा या उन्हाळ्याला सुसह्य करण्यासाठी आवश्‍यकता भासते ती फळांच्या रसाची व थंड पेयांची. चैत्र महिन्यातील गौरीच्या हळदीकुंकवाला टरबूज, खरबूज नागमोडी कापून तयार केलेली सुंदर कमळे ठेवून आरास केली जाते. याने गौरीची आरास होऊन शोभा वाढण्याबरोबरच दुसऱ्या दिवशी हे फळ खायला मिळणार यातच घरातील मुलाबाळांना आनंद असतो. 

उन्हाळ्यात कोठल्या ना कोठल्या प्रकाराने शरीरात भरपूर पाणी जायची आवश्‍यकता असते. सध्या सर्व फळे संपूर्ण वर्षभर मिळत असली तरी उन्हाळ्यात आवर्जून खायची फळे म्हणजे खरबूज, कलिंगड, झाडावर पिकलेली द्राक्षेसुद्धा उत्तम असतात. मोसंबी खरे तर उन्हाळ्यात हवीत, पण ती उन्हाळ्यात दुर्लभ व्हायला लागतात व मिळाली तरी त्यांच्यात रस कमी असतो. उन्हाळ्यात आलेला थकवा भरून काढण्यासाठी फळे व फळांचे रस खूप उपयोगी ठरतात. 

उन्हाळ्यात कलिंगडे भरपूर खावीत, कलिंगडातील बिया मात्र नक्की काढाव्यात. कलिंगडाच्या बिया वाळवून सोलून, मीठ टाकून परतून खाता येतात. असे म्हणतात, की कलिंगडांची गोडी व गराचा लालभडकपणा वाढविण्यासाठी त्याला साखरेच्या पाकाची व लाल रंगाची इंजेक्‍शने दिलेली असतात. त्यामुळे घरी आणलेले कलिंगड अति गोड लाल वाटल्यास त्यात इंजेक्‍शन दिलेले आहे असा संशय घेऊन त्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यास कार्यवाही होऊ शकते. असे प्रकार थांबविण्यासाठी सर्वांनीच मदत करणे आवश्‍यक आहे, जेणेकरून यातून होणाऱ्या रोगांना प्रतिबंध घालता येईल. सध्या खूप पदार्थात भेसळ होत असताना दिसते, पण अशा तऱ्हेची फळांमध्ये होणारी भेसळ सर्वांच्या मदतीने थांबविणे आवश्‍यक आहे. कलिंगड खाणे शुक्रवृद्धीच्या मात्र आड येते. 

खरबूज हे फळ सर्वांगाने उत्तम, मूत्रल, कोष्ठशुद्धी करणारे, शीत वीर्याचे, शुक्रवर्धक असल्याने उन्हाळ्यात अवश्‍य खावे. पिकलेले खरबूज अत्यंत गोड असते, पण खरबुजावर थोडी पिठी साखर घालूनही खाता येते, उन्हाळ्यात अंजीर खाणेही चांगले समजले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रसही तृप्ती करणारा असतो. उसाच्या रसात शक्‍यतो फक्‍त आले लिंबू टाकावे, साखर टाकू नये. तसेच उसाचा रस बर्फाशिवाय पिण्याचा प्रयत्न करावा. बाहेरच्या उसाच्या रसात घातलेला बर्फ कुठल्या पाण्याचा बनविलेला असेल हे सांगता येणे अवघड असते. त्यामुळे बाहेरचा बर्फ टाकणे टाळावे. मोसंबीचा रस पितानाही अशीच काळजी घ्यावी. मोसंबी घरी आणून त्यांचा रस काढून घेणे बाराही महिने चांगले असते, विशेषतः उष्ण प्रकृतीच्या व्यक्‍तींना मोसंबीचा रस खूप चांगला असतो, उन्हाळ्यात तर मोसंबीचा रस निश्‍चितच उपयोगी पडतो. 

शहाळे हे उन्हाळ्यावरचे अप्रतिम औषध आहे. कैरी हे उन्हाळ्यातीलच एक फळ आहे. कैरीचे पन्हेसुद्धा अत्यंत उपयोगी पेय आहे. उकडलेल्या कैरीचा गर, साखर, गूळ, केशर थंड पाण्यात टाकून तयार केलेले पन्हे उन्हाळ्यात घेणे चांगले. 

उन्हाळ्यात सेवन करण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे चंदनाचे वा गुलाबाचे सरबत. गुलाबाचा वा चंदनाचा अर्क, साखर एकत्र करून बनविलेल्या सिरपमध्ये ऐन वेळी नुसते पाणी घालून सरबत करता येते. याशिवाय उन्हाळ्यात आइस्क्रीमसुद्धा खाता येते. आइस्क्रीम खाण्याने पोटात दूधही जाऊ शकते, पण ते आइस्क्रीम दुधापासून बनविलेले असायला हवे. आइस्क्रीममध्ये टिपकागदापासून ते इतर अनेक वस्तूंची भेसळ अलीकडे होते. उन्हाळ्यात चांगले व थोडे दूध अवश्‍य घ्यावे. आयुर्वेदशास्त्रानुसार, दूध व फळे सेवन करण्याच्या वेळात सुमारे दोन तासांचे अंतर ठेवावे, दूध व फळे एकत्र करून कधीच खाऊ नये. उन्हाळ्यात दूध घ्यावे हे खरे, पण ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास जुलाब होऊ शकतात. उन्हाळ्यात दूध चालते व फळेही चालतात, परंतु दूध व फळे एकत्र करून सेवन केल्यास फुप्फुसाचे वा त्वचेचे विकार होतात हे नक्की. त्यामुळे गुलाब, काजू, बदाम वगैरे टाकून तयार केलेला मिल्कशेक घ्यायला हरकत नाही, पण फळे टाकलेला मिल्कशेक, त्यातल्या त्यात सीताफळ मिल्कशेक, चिकू मिल्कशेक, आंबा मिल्कशेक, मिक्‍स फ्रूट मिल्क शेक वगैरे न घेणेच चांगले. 
एकूण काय तर उन्हाळ्यात या सर्व फळांची नुसती आठवण काढून चालत नाही तर उन्हाळ्यात फळे खाणे, फळांचा रस पिणे आवश्‍यक असते. यामुळे उन्हाळा सुसह्य होतो व याचा उपयोग नंतर सर्व वर्षभर आरोग्य टिकविण्यासाठी होतो. 

आंबा खावा तुपासंगे 
पिकलेला आंबा तर भर उन्हाळ्यातच मिळतो, पण आंबा आहे उष्ण गुणाचा. त्यामुळे लहान मुलांनी आंबे खाल्ल्यावर त्यांना नको त्या ठिकाणी गळवे आलेली दिसतात. आंब्याचा त्रास टाळण्यासाठी आंबा पाण्यात भिजत घालून व तूप टाकून खावा. बऱ्याच लोकांना आंबा मानवतो, त्यामुळे शरीर पुष्ट होते, वजन वाढते, शरीरातील वीर्यधातू वाढतो. आंबा पचायला हवा असेल व आंब्याचा दोष न लागता त्यातील अमृततत्त्व मिळवायचे असेल, तर आंब्याचा रस तूप टाकून खावा. तांबडा भोपळा बारा महिने खाण्यासारखा असतो. तांबडा भोपळा सेवन केल्यास मूत्रवृद्धी होते, शरीरातील क्षार बाहेर पडायला मदत होते. 

डॉ. श्री बालाजी तांबे 
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com