टॉनिक-व्हिटॅमिन्स 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

"टॉनिक' हा शब्द जरी आधुनिक भाषेतील असला, तरी ही संकल्पना मुळात आयुर्वेदशास्त्रातीलच आहे. शरीराचे पोषण करून शरीरशक्‍ती वाढविणारे, शरीराला नवचैतन्य देणारे, तेजस्वी कांतीचा लाभ करून देणारे "रसायन' हे "आयुर्वेदिक टॉनिक'च आहे. आधुनिक टॉनिकपेक्षा आयुर्वेदातल्या रसायनांची व्याप्ती खूपच मोठी आहे. प्रकृतीनुरूप आहार घेतला, धातूंना पोषक द्रव्यांचा त्यात अंतर्भाव केला, एखादे रसायन औषध घेतले आणि पचन व्यवस्थित होते आहे याकडे लक्ष ठेवले, तर वेगळी व्हिटॅमिन्स, मिनरल्स न घेतासुद्धा आरोग्य उत्तम राहू शकते. 

"टॉनिक' हा शब्द जरी आधुनिक भाषेतील असला, तरी ही संकल्पना मुळात आयुर्वेदशास्त्रातीलच आहे. शरीराचे पोषण करून शरीरशक्‍ती वाढविणारे, शरीराला नवचैतन्य देणारे, तेजस्वी कांतीचा लाभ करून देणारे "रसायन' हे "आयुर्वेदिक टॉनिक'च आहे. आधुनिक टॉनिकपेक्षा आयुर्वेदातल्या रसायनांची व्याप्ती खूपच मोठी आहे. शास्त्राप्रमाणे तयार केलेल्या, प्रकृतीप्रमाणे व वयाप्रमाणे योजलेल्या रसायनांनी केवळ एखादा-दुसरा नाही तर सर्वांगीण आरोग्याचा, संपन्न आयुष्याचाही लाभ होऊ शकतो. रसायन हे रोगप्रतिकारशक्‍ती वाढवते, जीवनशक्‍ती देते, शरीराबरोबरच मनालाही स्फूर्ती देते, बुद्धी-स्मृती-प्रज्ञा प्रदान करते. आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने, तसेच रोग झाला असता त्यातून बरे होण्यासाठीही अशा आयुर्वेदिक टॉनिक्‍सचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो. ज्यांना मोठी जबाबदारी पार पाडायची आहे, योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचे आहेत, स्वतःची कार्यक्षमता सिद्ध करायची आहे, मानसिक ताण पेलून आपले काम योग्य प्रकारे करायचे आहे अशा सर्वांना काही ना काही रसायनरूपी टॉनिकची आवश्‍यकता असते. आजकालच्या स्पर्धात्मक युगात तसेच प्रदूषण, अनियमित जीवनपद्धती, ताण-तणावाला तोंड देत जगणाऱ्या प्रत्येकाला टॉनिकची गरज आहे. 

अशक्‍तपणा वाटणे म्हणजे शक्‍ती कमी होणे, परंतु कोणत्या अवयवाची, कोणत्या कार्यसाठी लागणारी, म्हणजेच कोणत्या शरीरधातूची शक्‍ती कमी झाली हे पाहून अशक्‍तपणावर इलाज करावा लागेल व आयुर्वेदिक शक्‍तिद्रव्यांचा (टॉनिकची) उपयोग करता येईल. या आयुर्वेदाने एकूण सात धातू सांगितले आहे. या प्रत्येक धातूचे स्वतःचे असे विशेष स्वरूप आहे, कार्य आहे, प्रत्येकावर शरीरधारणाची स्वतंत्र जबाबदारी आहे. प्रत्येक धातू जितका सकस, ताकदवान, वीर्यवान होईल तेवढे शरीर अधिकाधिक संपन्न होईल, शरीरक्रिया सहजतेने आणि संपन्नतेने पार पडतील. 

रसधातू हा पहिला धातू सर्व अवयवांना तृप्ती देण्याचे काम करतो. झाडाच्या मुळाला व्यवस्थित पाणी मिळाले, की जसे संपूर्ण झाड बहरते, झळाळते तसेच रसधातूची ताकद वाढली की सर्व शरीर रसरशीत होते. रसधातू अशक्‍त झाला तर त्वचा कोरडी पडते, घशाला कोरड पडते, श्रम सहन होत नाहीत, आवाज सहन होईनासा होतो. अशा वेळी दूध, सर्व प्रकारच्या फळांचा रस, ताजी द्राक्षे, शहाळ्याचे पाणी, लाह्यांचे पाणी या गोष्टी तसेच कोरफड, सारिवा, कमळ, अभ्रकभस्म वगैरे औषधे रसधातूसाठी टॉनिकरूप असतात. 
रक्‍तधातू हा दुसरा धातू, जो साक्षात प्राणाचे स्थान असून, त्वचेच्या आरोग्यासाठी निरोगी असावा लागतो. अशक्‍त रक्‍तधातूमुळे त्वचा फिकट निस्तेज होते, छातीत धडधडते, चक्कर येते, भूक लागत नाही, यावर सुके अंजीर, खजूर व तूप, काळ्या मनुका, सफरचंद, केशर वगैरे गोष्टी तसेच केशर, आमलकी, गुडूची, मंडूर भस्म वगैरे द्रव्ये रक्‍तधातूसाठी टॉनिकस्वरूप असतात. 

मांसधातू हा सर्व हालचालींसाठी व शरीरबांध्यासाठी आवश्‍यक धातू असतो व तो अशक्‍त झाला तर वजन उतरते, गाल बसतात, हाडे दिसायला लागतात, गळून जायला होते. लोणी, खजूर-तूप, खारीक-दूध, काजू, गोडांबी, तसेच अश्वगंधा, शतावरी, गोक्षुर, बला अशा वनस्पती या धातूसाठी टॉनिकप्रमाणे असतात. वजन वाढविण्यासाठी कपभर दुधात चमचाभर खारकेची पूड, खडीसाखर व अर्धा कप पाणी टाकावे व पाणी उडून जाईपर्यंत उकळून नंतर प्यावे. याने अंग धरते, स्टॅमिना वाढतो. 

मेदधातू शरीराला उचित प्रमाणात स्निग्धता देण्याचे तसेच शरीरबांधा प्रमाणबद्ध ठेवण्याचे काम करत असतो. हा धातू अशक्‍त झाला तर अंग कोरडे होते, स्निग्धता कमी झाल्याने सांधे दुखू लागतात, फारसे परिश्रम न करताही थकायला होते, डोळे निस्तेज होतात. दूध, खवा, पनीर, लोणी वगैरे गोष्टी मेदधातूसाठी टॉनिकप्रमाणे काम करतात तर कांचनार, खदिर, किराततिक्‍त वगैरे वनस्पती मेदधातू प्रमाणात ठेवण्यास मदत करतात. 
अस्थीधातू शरीराचा साचा तयार करत असून, उंची व एकंदर शरीराची ठेवण अस्थींवर अवलंबून असते. हा धातू अशक्‍त झाला तर हाडे ठिसूळ होतात, दुखतात, दातांची झीज होते, नखे तुटतात, केस गळतात. खारीक, बाभूळ तसेच धावड्याचा डिंक, नाचणीसत्त्व, दूध वगैरे द्रव्ये तसेच अर्जुन, गुग्गुळ, प्रवाळभस्म, मोतीभस्म वगैरे गोष्टी अस्थीधातूला टॉनिकप्रमाणे असतात. 
मज्जाधातूमुळे मेंदू, मेरुदंड व संपूर्ण शरीरातील संवेदना ग्रहण करणाऱ्या चेतातंतूंचे कार्य घडत असते. व त्याच्या अशक्‍ततेमुळे हाडे-सांधे दुखतात, तुटतात, शुक्रक्षय होतो, दौर्बल्य प्रतीत होते. अक्रोड, तीळ, पंचामृत, भिजवलेले बदाम, जर्दाळू, तूप, चांदीचा वर्ख व रौप्य भस्म या गोष्टी मज्जाधातूसाठी टॉनिक आहेत. 

सर्व धातूंमधील शेवटचा शुक्रधातू, जो पुनरुत्पादनास, झीज भरून काढण्यास समर्थ असतो, हा धातू अशक्‍त झाला तर निस्तेजता, म्लानता येते, सर्व अंग ढिले पडते, श्रम न करताही थकवा जाणवतो, पुनरुत्पादन शक्‍ती राहत नाही, मैथुनाची इच्छा होत नाही, जीवनातला जणू रसच नाहीसा होतो. त्यासाठी दूध, तूप, पंचामृत, तसेच शतावरी, अश्वगंधा, विदारीकंद, गोक्षुर, कपिकच्छू, सुवर्ण वर्ख, सुवर्ण भस्म वगैरे गोष्टी शुक्रधातूवर टॉनिकप्रमाणे कार्य करतात. 

टॉनिक व्हिटॅमिन्समुळे अपेक्षित असणारे फायदे खऱ्या अर्थाने मिळवायचे असतील, तर त्यासाठी ही धातूपोषक द्रव्ये आहारात अंतर्भूत करणे, दुधातून शतावरी कल्प घेणे, सकाळी पंचामृत घेणे, भिजवलेले बदाम घेणे, जेवणात आयुर्वेदिक तूप पुरेशा प्रमाणात घेणे, प्रकृतीला अनुरूप असणारे च्यवनप्राश, अमृतप्राश, ब्राह्मरसायन, धात्री रसायन यांसारखे एखाद दुसरे रसायन चमचाभर घेणे, याबरोबरच हिवाळ्यात डिंकाचे लाडू, अधून मधून जर्दाळू, अक्रोड, मधल्या वेळेस फळांचा रस किंवा खजूर-तूप, मूठभर मनुका खाणे अशी योजना केल्यास सगळ्या धातूंचे आरोग्य टिकायला मदत होईल आणि टॉनिक, व्हिटॅमिन्स, मिनरल्सचे प्रयोजनही पूर्ण होईल. 

संतुलित आहाराचे महत्त्व आपण सर्वजण जाणून आहोत. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा की नुसते प्रमाण किंवा पथ्यापथ्य किंवा बाकीचे नियम पाळले की आहार संतुलित होत नाही तर जे पदार्थ आपण खातो त्यांच्यात सकसता आहे का, वीर्य आहे का, शरीराचे खऱ्या अर्थाने पोषण करायची ताकद आहे का हे पाहणेही गरजेचे असते. आणि या गोष्टीचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की कारणे काहीही असोत, कितीही असोत, एकंदर अन्नपदार्थांमधली "सकसता' झपाट्याने कमी होतो आहे. त्यामुळे आहाराला "संतुलित'बनवायचे असेल, तर त्यात आयुर्वेदिक टॉनिकला अंतर्भूत करावेच लागेल. 

आयुर्वेदशास्त्राने अनेक प्रकारची टॉनिक्‍स सांगितलेली आहेत. च्यवनप्राश, अमृतप्राश, ब्राह्मरसायन, धात्री रसायन यांसारखी रसायने सर्वांगीण फायदा देण्यात सर्वश्रेष्ठ असतात. याशिवाय अनेक साधी-साधी आयुर्वेदिक टॉनिक्‍स सांगता येतील. 

आयुर्वेदाने अशी अनेक द्रव्ये सांगितलेली आहेत ज्यांचा आहारात तसेच औषधात वापर केला जातो. चरक संहितेत याबाबत म्हटले आहे - 
यत्किञ्चिन्मधुरं स्निग्धं जीवनं बृंहणं गुरु । हर्षणं मनश्‍चैव तत्सर्वं वृष्यमुच्यते ।।....चरक संहिता 

स्निग्ध, जीवनशक्‍ती वाढविणाऱ्या, पुष्टीकर, गुरू आणि मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी वृष्य असून, थोड्याशा जरी खाल्ल्या तरी ताकद वाढवतात 
टॉनिक, व्हिटॅमिन्स, मिनरल्स ही सुद्धा मुळात कुठल्यातरी नैसर्गिक द्रव्यांपासून वेगळी करून तयार केलेली असू शकतात किंवा रासायनिकही असू शकतात. परंतु असे वेगळे करून बनवलेले व्हिटॅमिन शरीर स्वीकार करेलच असे नाही. आयुर्वेदाने प्रत्येक द्रव्याचा विशिष्ट विपाक सांगितला, त्यानंतर त्याचा प्रभाव समजावला. म्हणजे कोणतेही द्रव्य शरीरात गेल्यानंतर त्यांचे पचन होऊन शरीर त्याचा स्वीकार कशा प्रकारे करते यावर त्या द्रव्याचे कार्य होते. आणि शरीराकडून स्वीकार होण्यासाठी ते द्रव्य नैसर्गिक व परिपूर्ण, संपूर्ण असावे लागते. सातत्याने फार दिवस व्हिटॅमिन्स, मिनरल्स घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते, कडकी मुरू शकते. प्रत्यक्षात अनेकदा व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, सिरप किंवा कॅप्सूल, दीर्घ काळपर्यंत घेणाऱ्या व्यक्‍तींमध्ये हळूहळू उष्णता वाढताना दिसते. ऍसिडिटी होणे किंवा वारंवार मूळव्याधीचा त्रास होणे, असे त्रास कळत नकळत जाणवतात. हे त्रास अशा गोळ्या बंद केल्याने कमीही होतात. तेव्हा दीर्घकाळपर्यंत बाहेरून व्हिटॅमिन्स घेत राहण्यापेक्षा शरीराला आवश्‍यक तत्त्वे नैसर्गिक आहारातूनच मिळू शकल्यास निश्‍चितच अधिक चांगले. कधी आवश्‍यकता असलीच तर व्हिटॅमिन्सच्या गोळ्याही मर्यादित प्रमाणात घ्यायला हरकत नाही, पण त्या सातत्याने न घेणेच चांगले. 
प्रकृतीनुरूप आहार घेतला, धातूंना पोषक द्रव्यांचा त्यात अंतर्भाव केला, एखादे रसायन औषध घेतले आणि पचन व्यवस्थित होते आहे याकडे लक्ष ठेवले तर वेगळी व्हिटॅमिन्स, मिनरल्स न घेतासुद्धा आरोग्य उत्तम राहू शकते. 

रोज घ्या पंचामृत! 
रोज सकाळी ताजे बनवलेले पंचामृत घेणे हेही शुक्रधातूसाठी एक उत्तम आयुर्वेदिक टॉनिक आहे. दोन चमचे तूप, एक चमचा मध, एक चमचा दही, एक चमचा साखर व चार-पाच चमचे दूध एकत्र करून सकाळी नाश्‍त्याच्या अगोदर घ्यावे. घरातल्या प्रत्येक सदस्यास या प्रमाणानुसार तयार केलेले पंचामृत घेता येते. साध्या साखरेऐवजी शतावरी, केशर, सुवर्ण वर्ख असलेली अमृतशतकरा टाकून बनवलेले पंचामृत खरोखरच अमृतोपम ठरू शकते. यामुळे हृदय, मेंदूसारख्या अतिमहत्त्वाच्या (व्हायटल) अवयवांना ताकद मिळते; बुद्धी-मेधा, प्रज्ञा वाढते; त्वचा उजळते; डोळे, नाक, कान वगैरे सर्व इंद्रियांची कार्यक्षमता वाढते; उत्साह वाढतो; वीर्यशक्‍ती, शुक्रशक्‍ती वाढते; गर्भधारणेस मदत होते; रोगप्रतिकारशक्‍ती वाढते. म्हणूनच लहान मुले, नवदांपत्ये, तरुण, वृद्ध अशा सर्वांनीच पंचामृत घेणे चांगले असते.