#FamilyDoctor जागतिक प्रथमोपचार दिवस

खरचटण्याने, कापण्याने छोटी जखम झाली, तर त्यावर मध-तुपाचा इलाज करावा.
खरचटण्याने, कापण्याने छोटी जखम झाली, तर त्यावर मध-तुपाचा इलाज करावा.

प्राथमिक उपचारांची माहिती आणि ज्या व्यक्‍तीला उपचारांची गरज आहे त्या व्यक्‍तीबद्दल असलेली ओढ व प्रेम या दोन्ही गोष्टी प्राथमिक उपचारातच मोडतात. गाडीत प्राथमिक उपचारांची पेटी ठेवावी, असा कायदा असला, तरी त्या पेटीत कोणत्या गोष्टी आहेत व कोणती वस्तू कोणत्या वेळी वापरायची, याची माहिती नसल्यास त्या पेटीचा काहीच उपयोग होत नाही. आयुर्वेदात सांगितलेले काही प्रथमोपचार हे पूर्ण उपचार असू शकतात. कारण असे घरगुती छोटे उपचार केल्यावर रोगच पूर्णपणे बरा झाला, तर त्याला मुख्य उपचारच म्हणायला हवा.

प्रथमोपचार होणे अत्यंत गरजेचे असते. योग्य प्राथमिक उपचार मिळाल्यास जीवसुद्धा वाचवता येतो. घरात, व्यवहारात कापणे, लागणे, खरचटणे, मुरगाळणे, ऐन वेळेला पोट दुखणे, रात्री एकदम उलट्या व्हायला लागणे, अशा अनेक प्रसंगांत प्राथमिक उपचार काय करावेत, याची माहिती असावी लागते. एखाद्याने पाण्यात बुडत असलेल्या व्यक्‍तीला बाहेर काढल्यावर त्याच्या पोटात व फुफ्फुसात गेलेले पाणी बाहेर काढण्याची क्रिया किंवा त्याचे श्वसन व्यवस्थित चालू होण्यासाठी करावी लागणारी क्रिया माहिती हवी, अन्यथा बाहेर काढूनही ती व्यक्‍ती मृत होऊ शकते. त्यामुळे प्राथमिक उपचारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

‘चाची ४२०’ नावाचा एक चित्रपट होता. त्यामध्ये एक मुलगी फटाक्‍याने भाजते. प्रत्येक जण आरडाओरडा करू लागतो. मुलीचे आजोबा ब्लॅंकेट वगैरे आणायला सुचवतात. अशी सर्वांची पळापळ चालू असते. त्याच वेळी तेथे काम मागण्यासाठी स्त्रीच्या वेषात आलेले मुलीचे वडील ताबडतोब त्या मुलीला उचलतात व तेथेच असलेल्या पोहण्याच्या तलावात टाकतात. मुलीला पाण्यात कुणी ढकलले, त्याला काही अक्कल आहे का वगैरे आरडाओरडा सुरू होतो. तेवढ्यात डॉक्‍टर येतात व म्हणतात, या मुलीला पाण्यात टाकल्यामुळेच ही मुलगी आज वाचलेली आहे. तेव्हा प्राथमिक उपचारांची माहिती आणि ज्या व्यक्‍तीला उपचारांची गरज आहे त्या व्यक्‍तीबद्दल असलेली ओढ व प्रेम या दोन्ही गोष्टी प्राथमिक उपचारातच मोडतात. 

मदत करून त्याचे श्रेय उपटावे, या हेतूने आपण कुणाला मदत करायला गेलो व स्वतःला माहिती नसलेल्या विषयात काही ढवळाढवळ करण्याचाच प्रयत्न केला, तर मात्र नंतर त्रास झाल्याशिवाय राहात नाही. अगदी बारीक सारीक गोष्टीतसुद्धा योग्य माहिती असणे महत्त्वाचे असते. कापल्यावर रक्‍त पुसून घ्यावे का नाही, कापलेल्या ठिकाणी पाणी लावावे का नाही, डेटॉल लावावे का हळद लावावी, हळद लावल्यावर रक्‍त थांबते, असे पुस्तकात वाचलेले असते.

पण, किती व कुठली हळद लावायची (फोडणीच्या मिसळण्याच्या डब्यातील हळद वापरू नये), नुसतीच हळद लावायची की त्यावर कापूस ठेवून पट्टी बांधायची, कुणी म्हणते की पट्टी बांधल्यामुळे जखम चिडली, तर कुणी म्हणते की जखम उघडी टाकल्याने त्यात इन्फेक्‍शन झाले, तेव्हा कुठल्या प्रकारची जखम आहे, कशामुळे झालेली आहे व कुठल्या जखमेवर काय उपचार करायला हवेत, हे सगळे माहीत असल्यासच योग्य उपचार करणे शक्‍य होते. गाडीत प्राथमिक उपचारांची पेटी ठेवावी, असा कायदा असला तरी त्या पेटीत कोणत्या गोष्टी आहेत व कोणती वस्तू कोणत्या वेळी वापरायची, याची माहिती नसल्यास त्या पेटीचा काहीच उपयोग होत नाही. कधी कधी तर असेही दिसते, की पेटीतल्या औषधांची माहिती तर आहे, पण त्यातील औषधे गेल्या दोन-चार प्रवासात वापरल्याने पेटी तर मोकळीच आहे. काही प्रसंग आल्यास अगदी आत्मविश्वासाने म्हणावे, की ‘मी प्राथमिक उपचारांचा कोर्स केलेला आहे, मी बरोबर मदत करतो’ व पेटी काढल्यावर लक्षात येते की हवे ते औषध बाटलीत नाही किंवा औषध असले, तर पट्टीच नाही. अशा तऱ्हेने प्राथमिक उपचार करायचा असला, तर काही काळजी आधीही घ्यावी लागते. जोपर्यंत हृदयात प्रेम नाही तोपर्यंत या गोष्टी नीट होत नाहीत. 

आयुर्वेदात तर ‘प्रथमोपचार’ या संज्ञेत अनेक रोगांवरचे इलाज असतात. घराच्या आजूबाजूच्या बागेतून जमविलेल्या वनस्पती चुरून वा कुटून जखमेवर लावणे, त्याचे पोटीस बांधणे, कुठल्या तरी वनस्पतीचा रस काढून किंवा काढा करून पाजणे, वनस्पती उशीखाली घेऊन झोपणे, असे अनेक प्रकारचे उपचार सांगितले आहेत. हे नुसतेच प्रथमोपचार नसून पूर्ण उपचारही असू शकतात. कारण असे घरगुती छोटे उपचार केल्यावर रोगच पूर्णपणे बरा झाला, तर त्याला मुख्य उपचारच म्हणायला हवा. 

लहान मुले असलेल्या घरात पडणे, खरचटणे, कापणे, हात मुरगळणे, असे प्रकार घडतच असतात. यावर खरे पाहता घरगुती तातडीचा प्रथमोपचार हाच खरा इलाज असतो. ऊठसूट डॉक्‍टरांकडे धाव घ्यायची गरजच नसते. अशा तऱ्हेच्या सर्व पद्धती आयुर्वेदात विकसित केलेल्या सापडतात. तूप-मध, कोरफडीचा गर लावणे, असे साधे उपचार करता येतात.

प्रथमोपचार सेट नेहमी घरात ठेवावा. ‘स्टिच इन टाईम सेव्हज्‌ नाईन‘ असे म्हटलेले आहे. वेळच्या वेळी केलेला छोटा व योग्य उपचार एखाद्या मोठ्या रोगापासून किंवा एखाद्या शस्त्रक्रियेपासून वाचवू शकतो, त्याचप्रमाणे तो दीर्घकाळपर्यंत चालणाऱ्या रोगाला किंवा दीर्घकाळाच्या रोगामुळे होणाऱ्या खर्चापासूनही वाचवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com