#FamilyDoctor जागतिक प्रथमोपचार दिवस

World-First-Aid-Day
World-First-Aid-Day

तज्ज्ञ वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाचे उपचार म्हणजे प्रथमोपचार आणि याचे ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अग्नीची इवलीशी ठिणगी बघता बघता अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते, तसेच रोगही प्रथमस्वरूपी क्षुल्लक वाटला तरी, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. यासाठीच शक्‍य तितक्‍या लवकर प्राथमिक उपचार सुरू झाले पाहिजेत. आयुर्वेदाने असे प्रथमोपचार सांगितलेले आहेत.

‘सोनाराने कान टोचावे’ हे जसे आपण म्हणतो, तसे उपचार वैद्यानेच करायचे असतात. आपल्याच नाही तर फार जवळच्या व्यक्‍तीला स्वतः वैद्यानेही औषधे देऊ नये, असा पायंडा असतो. हे सर्व जरी खरे असले, तरी मुळात स्वयंउपचार व प्रथमोपचार यात मोठा फरक असतो. तज्ज्ञ वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाचे उपचार म्हणजे प्रथमोपचार. आणि याचे ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. प्रथमोपचाराचे महत्त्व अधोरेखित व्हावे, यासाठी जागतिक स्तरावर दर वर्षी सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिवस’ साजरा करण्यात येतो. आपणही या निमित्ताने आयुर्वेदिक दृष्टिकोनातून करता येण्यासारखे काही महत्त्वाचे प्रथमोपचार पाहणार आहोत. 

आयुर्वेदात ‘क्रियाकालं न हापयेत्‌’ म्हणजे उपचार करण्याची वेळ व्यर्थ दवडू नये, असे सांगितलेले आहे. अग्नीची इवलीशी ठिणगी बघता बघता अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते, तसेच रोगही प्रथमस्वरूपी क्षुल्लक वाटला, तरी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. 

प्रथमोपचारांचे हेतू
प्रथमोपचाराचे मुख्य हेतू असे -

  मुख्य व नेमके वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तातडीने उपचारांची सुरुवात करता येणे.
  त्रासाची तीव्रता शक्‍य तितकी कमी करता येणे.
  झालेल्या इजा किंवा दुखापतीमुळे शरीराचे अजून नुकसान होण्यास प्रतिबंध करता येणे. उदा. रक्‍तस्राव जितक्‍या लवकर कमी करता येईल किंवा थांबवता येईल तेवढे ते पुढे समस्या उत्पन्न न होण्यास सहायक ठरेल.
प्रथमोपचार संच प्रत्येक घरात असावाच, हा संच कसा वापरावा, याची माहिती आधीपासून करून ठेवलेली असावी, मात्र संचाव्यतिरिक्‍त सुद्धा घरात असणाऱ्या गोष्टींच्या मदतीने, तसेच काही सर्वपरिचित व सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या साहाय्याने प्रथमोपचार करता येतात. 

तर काय कराल?
पोटदुखी - गॅसेस होऊन, पोटाला जडपणा येऊन पोट दुखत असल्यास आले-लिंबाचा रस व मध हे मिश्रण थोडे थोडे चाटण्याने बरे वाटते. लिंबाचा रस एक चमचा, मध एक चमचा व आल्याचा रस अर्धा चमचा, असे मिश्रण करता येते. बरोबरीने पोटाला थोडे तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीने किंवा ओव्याच्या पुरचुंडीने शेकण्याने लवकर गुण येतो. 

मात्र, वेदना फार तीव्र असल्या, बऱ्याच दिवसांपासून असल्या, व्यक्‍तीला शौचाद्वारे रक्‍त पडत असले, श्वास घ्यायला त्रास होत असला, तर मात्र त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. 

कुत्रा चावणे - दंशस्थानातून रक्‍त येत असल्यास चिमूटभर हळद दाबून ठेवणे. छोटासा ओरखडा असल्यास जंतुघ्न द्रवाने ती जागा धुवून घेऊन व जंतुविरहित बॅंडेजच्या मदतीने झाकून ठेवावी. चावलेला कुत्रा पाळीव असला, तर त्याच्या मालकाकडे कुत्र्याला रेबीजचा डोस दिला आहे की नाही, याची चौकशी करावी. मात्र, रस्त्यावरचा कुत्रा चावला असल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.

गांधीलमाशी किंवा तत्सम कीटक चावणे - माशी दंशस्थानी चिकटून राहिली असल्यास सर्वप्रथम तिला दूर करावी. दंशस्थानी बर्फ लावावा. माशी चावलेल्या ठिकाणी सूज येणे स्वाभाविक असल्याने त्या ठिकाणी दागिना असल्यास तो काढून ठेवावा, अन्यथा नंतर दागिना काढणे अवघड जाते. दंशस्थानी लिंबाचा रस लावण्याने किंवा तुळशीच्या कुंडीतील काळी माती लावल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते. 

एखादी तीव्र प्रतिक्रिया आढळल्यास उदा. श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ 

लागला, उलटी झाली, चक्कर येत असली तर मात्र वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे. 

साप किंवा इतर कोणताही विषारी प्राणी चावणे : अशा वेळी अर्धा ते एक कप आयुर्वेदिक तूप पाजता येते. पंचकर्मासाठी म्हणून तयार केलेले सिद्ध तूप मिळाले, तर ते अधिक उपयुक्‍त असते. तूप दिल्यानंतर सुवर्णभस्म, समीरपन्नग, सुवर्णसूतशेखर यांचे मिश्रण योग्य मात्रेत दिल्यास वा शुद्ध सोने मधासह योग्य प्रमाणात चाटवल्यास विषाचा प्रभाव नाहीसा होतो (या प्रयोगाचा गुण येतो हा प्रत्यक्ष अनुभवही आहे). मात्र, प्रथमोपचार म्हणून हा प्रयोग केला, तरी नंतर रोग्याला दवाखान्यात नक्की न्यावे.  

मार लागल्याने जागा काळी-निळी होणे : लवकरात लवकर बर्फ लावावा. नंतरही तीव्र वेदना कमी होईपर्यंत थोड्या थोड्या वेळाने बर्फ लावावा. इजा झालेल्या भागाला शक्‍यतो विश्रांती द्यावी. रक्‍तचंदन, आंबेहळद, तुरटी, कोंबडनखी, हळकुंड यांच्यापासून बनविलेला लेप लावण्याने वेदना कमी होण्यास, काळा-निळा रंग कमी होण्यास मदत मिळते. 

इजेच्या मानाने अधिक प्रमाणात जागा काळी-निळी झाली असेल, व्यक्‍ती इतर काही कारणासाठी रक्‍त पातळ होण्यासाठी काही औषध घेत असली किंवा इजा न होताच अंगावर कुठेही काळे-निळे होत असल्यास मात्र वैद्यकीय सल्ला अवश्‍य घ्यावा.

भाजणे - ज्या गोष्टीमुळे भाजले ती गोष्ट त्या व्यक्‍तीपासून दूर करावी. भाजलेल्या जागेवर थंड पाण्याची धार धरावी. त्या जागेच्या आसपास दागिने, पट्टा वगैरे घातलेले असल्यास ते लगेच काढावे. भाजलेल्या ठिकाणी तूप-मधाचे मिश्रण लावल्यास दाह व वेदना लगेच कमी होतात व सहसा फोड येण्यास प्रतिबंध होतो. मात्र, फोड आलाच, तर तो फोडणे टाळायला हवे. 
भाजण्यामुळे जखम झाली असेल, दुखणे कमी होण्याऐवजी हळूहळू वाढत असेल, तर मात्र लगेचच वैद्यकीय सल्ला घ्यावा. शरीराचा बराचसा भाग भाजला असल्यासही त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. 

कापणे - रक्‍त थांबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक होय. हळद ही जंतुघ्न, तसेच रक्‍त गोठविण्यास मदत करणारी असल्याने स्वच्छ हळद (मिसळणाच्या डब्यातील नव्हे) जंतुविरहित गॉजच्या मदतीने दाबून ठेवावी. जखम अस्वच्छ वस्तूमुळे झाली असल्यास ती जागा जंतुघ्न 

द्रवाच्या साहाय्याने धुवून घ्यावी. लोखंड किंवा तत्सम धातूमुळे कापले असल्यास धनुर्वाताचे इंजेक्‍शन घ्यावे.  जखम खोल असेल, तर सहा तासांच्या आत वैद्यकीय तज्ज्ञाकडून टाके घालून घेणे आवश्‍यक होय. रक्‍त थांबत नाही असे वाटल्यास किंवा जखम वेडीवाकडी असल्याने स्वच्छ करता येत नाही असे वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

जुलाब - जुलाब होत असल्यास शरीरातील पाणी कमी होत नाही ना, याकडे लक्ष ठेवणे सर्वांत महत्त्वाचे असते. शरीरातील पाणी कमी होऊ नये, या दृष्टीने मीठ व साखर पाण्यात घालून घोट घोट घेत राहावे. हे पाणी उकळून घेतलेले अधिक चांगले असते. याशिवाय कोरड्या साळीच्या लाह्या खाणे, भूक लागल्यास मऊ खिचडी खाणे चांगले. 

उलट्या व जुलाब एकत्र होत असले, अगदी पाण्यासारखे जुलाब होत असले, तर मात्र वैद्यकीय सल्ला तातडीने घ्यायला हवा.

ताप - तापामध्ये सहसा भूक लागत नाही, अशा वेळी लंघन करणे उत्तम असते; मात्र ताप एकाएकी वाढला, तर कपाळावर मिठाच्या थंड पाण्याच्या किंवा कांद्याच्या रसाच्या घड्या ठेवता येतात, पोटात उष्णता, आग जाणवत असल्यास नाभीवर काशाची वाटी ठेवून त्यात थंड पाणी भरून वारंवार बदलत राहणेही चांगले. तापामुळे हातापायाच्या तळव्यांची आग होत असल्यास त्यावर शतधौतघृत लावता येते. लहान मुलांमध्ये ताप वाढला, तर फीट येण्याची शक्‍यता असल्याने वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे श्रेयस्कर होय. ताप कमी करणारी औषधे घेऊनही ताप पुन्हा पुन्हा येत असेल, ठराविक तासांनंतर, एका दिवसा आड, दोन दिवसांआड असा अमुक एका पद्धतीने येत असेल, तरी वैद्यकीय सल्ला घ्यायलाच हवा. 

नाकातून रक्‍त येणे - नाकातून रक्‍त येत असल्यास नाकात दूर्वांचा रस घालणे व टाळूवर आवळकाठीच्या चूर्णाचा लेप करणे चांगले; मात्र डोक्‍यावर किंवा चेहऱ्यावर पडल्यामुळे नाकातून रक्‍त येत असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यायलाच हवा. दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ रक्‍त येत असेल किंवा व्यक्‍ती रक्‍त पातळ होण्यासाठी औषधे घेत असले, तरी वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.

कधी कधी त्रास पटकन लक्षात आला आणि नेमका प्रथमोपचार करता आला, तर पूर्ण बरे वाटू शकते; मात्र जर त्रासाची वा रोगाची तीव्रता जास्त असली, तर प्रथमोपचाराचे स्वरूप मर्यादित राखून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

हे करून पाहा
याखेरीज आयुर्वेदातील ताबडतोब लागू पडणारे व तज्ज्ञांकडे जाण्यापूर्वी करून पाहण्याजोगे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.

जळजळ होत असल्यास साळीच्या लाह्यांचे पाणी पिण्याचा उपयोग होतो. थंड पाण्यात किंवा जमल्यास ज्येष्ठमधाचा काढा टाकलेल्या थंड पाण्यात कटिस्नान (बसता येईल अशा टबमध्ये पाण्यात कंबरेपर्यंत बसणे) घेणेही चांगले. 

मूळव्याधीमुळे गुदावाटे रक्‍त पडत असल्यास नागकेशर व खडीसाखर घरच्या ताज्या लोण्यात मिसळून खाण्याचा लगेच उपयोग होतो. 

वारंवार उचकी लागत असल्यास अख्खी वेलची तव्यावर जाळून तयार केलेली राख मधासह चाटून खाण्याचा फायदा होतो. 

उलट्या होत असल्यास कोरड्या साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होतो. उलटीचा वेग वारंवार येत असल्यास मयूरपिच्छामषी (म्हणजे मोराचे पीस जाळून तयार केलेली राख) व सितोपलादि चूर्ण मधात मिसळून वारंवार चाटणे प्रभावी असते. 

अंगावर एकाएकी पित्ताच्या गांधी उठल्यास दुधात हळद उगाळून लेप लावण्याने किंवा आमसुलाचे पाणी लावण्याने त्वरित आराम होतो. 

डोळ्यांची आग, खाज, लाली वगैरे त्रास होत असल्यास किंवा डोळे येतील असे वाटत असल्यास त्रिफळ्याच्या काढ्याने दर दोन तासांनी डोळे धुण्याने बरे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com