घरच्या घरी बनवा चविष्ट लोणचं; पाहा रेसिपी

आजीच्या पारंपारीक पद्धतीने आंब्याचे लोणचे कसे तयार करायचे ते पाहूया
Housewife to make pickles in rural areas
Housewife to make pickles in rural areasसकाळ

मे महिना संपला की माझी आजी लोणचं करायच्या तयारीला लागायची... का तर जून महिन्यात कैरी चांगली भरलेली असते अन ती झाडावर थंडी झालेली असते. अशा आंब्याचं लोणचं घातलं तर ते वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक टिकतं, असं ती सांगते. चला तर मग बघूया आजीच्या पारंपारीक पद्धतीने आंब्याचे लोणचे कसे तयार करायचे...

लोणचे करायला लागणारे साहित्य :

  • एक डझन मध्यम आकाराच्या कैर्‍या

  • एक पाव जाडे मिठ

  • मोहरीची डाळ(१०० ग्रॅम)

  • लाल तिखट ८ चमचे

  • हळद ४ चमचे

  • मेथी २ चमचे

  • १० ग्रॅम हिंग

  • एक पाव गोड तेल

कृती

सुरुवातीला आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. नंतर मग आंब्याच्या आपल्याला आवडतात त्या आकाराच्या फोडी करुन घ्या. त्या फोडींना थोडी हळद व थोडे मिठ चोळुन ४-५ तास कडकडीत उन्हात वाळवुन घ्या. (दुपारी फोडी वाळवत टाकुन संध्याकाळी लोणच घातल तरी चालेल)

नंतर मग जाडे मिठ पाट्यावर किंवा मिक्सरवर जाडसर वाटुन घ्या. नंतर ते मिठ लोखंडाच्या तव्यावर किंवा कढईत चांगले भाजून घ्या आणि काढून घ्या. त्यानंतर कढईत २-३ चमचे तेल घेउन त्यावर मेथी टाकुन ती थोडा वेळ परतवुन घ्या.

मेथी काढुन थंड करत ठेवा व त्याच कढईत मेथी परतवुन राहिलेल्या तेलात हिंग, हळद व लाल तिखट मिडीयम गॅसवर ४-५ मिनिटे परतवा. नंतर मेथी थंड झाली की ती वाटून घ्या.

आता सुकलेल्या आंब्याच्या फोडींवर वाटलेली मेथी, मिठ, हिंग, हळद, लाल तिखट घालुन सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. आता उरलेले सगळे तेल गरम करा. फोडणी देण्याइतपत गरम झाले की गॅस बंद करा आणि १० मिनीटांनी त्यात मोहरीची डाळ परतवा. (लगेच टाकु नका नाहीतर मोहरीची डाळ करपेल)

आता मोहरीची डाळ टाकलेले तेल पुर्ण गार झाले की ते आंब्यांच्या फोडींच्या मिश्रणात ओता व पुन्हा एकजीव करुन काचेच्या बरणीत दाबुन दाबुन भरून ठेवा. बरणीत तेल फोडींच्या वर आले पाहीजे. जर नसेल आले तर अजुन गरजेपुरत तेल गरम करा व थंड करुन बरणीत ओता.

काही मुख्य टिप

१) जर फोडी तेलात चांगल्या बुडाल्या नाहीत तर काही दिवसांत त्यांना बुरशी येते.

२) लोणच्याच्या बरणीचे झाकण घट्ट बंद करा आणि ८-१० दिवसांनी लोणचे पुन्हा एकदा मोठ्या पळीच्या साहाय्याने एकजीव करुन घालचे वर करुन ठेवा.

३) लोणचे वापरण्यासाठी काढताना सारखी सारखी मोठी बरणी उघडू नका. महिनाभर पुरेल इकतं लोणचं एका लहान बरणीत काढून ठेवुन मग ते वापरायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com