गणराज माझा नाचत आला...! 

गणराज माझा नाचत आला...! 

कोल्हापूर - "बाप्पा, तुम्ही या हो; खूप खूप राहायला, पुढच्या वर्षी यायचंच तर जायचे कशाला?' अशी साद घालत, पाऊसफुलांच्या वर्षावातच आज विघ्नहर्त्या गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. सकाळी सातपासूनच कुंभार गल्ल्यांत मूर्ती नेण्यासाठी सहकुटुंब गर्दी झाली. दुपारी दोनपर्यंत घरगुती मूर्ती नेण्यावर भर राहिला. त्यानंतर सार्वजनिक मंडळांचे ताफे दाखल झाले. ढोल-ताशा, धनगरी ढोल, बेंजो, ब्रास बॅंड, नाशिक ढोलबाजा, हलगी-घुमकं अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात कुंभार गल्ल्यांपासून जल्लोषी मिरवणुकीच्या वातावरणाने भक्तिरसाचा सुगंध दरवळला. 

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गणेश आगमन सोहळ्यातील जल्लोष कायम राहिला. पारंपरिक वाद्यांचा कडकडाट, नयनरम्य आतषबाजी आणि लेसर शोची झळाळी यांमुळे या सोहळ्याची उंची आणखीन वाढली. सकाळी अकराच्या सुमारास नवीन राजवाड्यावरील गणरायाचे लवाजम्यासह आगमन झाले. 

गणरायाच्या आगमनाची तयारी तशी आठवड्यापासूनच घराघरात सुरू झालेली. आजचा दिवस उजाडला, तोच रेडिओ आणि व्हीसीडी प्लेअरवरच्या भक्तिगीतांच्या सुरावटीत. दारोदारी सडा टाकून रांगोळी सजली आणि गणेशमूर्ती आणण्याची लगबग सर्वत्र सुरू झाली. घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी आघाडा-दुर्वांच्या जुड्या करून ठेवल्या आणि मग साऱ्यांचीच पावलं कुंभार गल्लीकडे वळू लागली. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत तर कुंभार गल्ल्यांत अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हती अशी स्थिती होती. घराघरांत गणरायाचे आगमन होताच त्याची विधिवत प्रतिष्ठापना झाली. दोन-तीन दिवसांपासून सजलेल्या सजावटीला मग आणखीनच झळाळी आली. सायंकाळी दाटून आलेल्या ढगांच्या साक्षीने गल्लीतल्या मंडळाच्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आणि साऱ्या गल्ल्या मंडळाचा गणपती आणण्यासाठी एकवटल्या. सायंकाळी सातनंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आणि जल्लोषी मिरवणुकांना प्रारंभ झाला. रात्री गणपती बाप्पा मंडळात विराजमान झाले आणि मंडपाला जणू मंदिराचेच स्वरूप आले. विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर सामूहिक आरतीने उत्सवातील पहिला दिवस संपन्न झाला. 

मंगळवारी येणार गौराई 
"पाऊस पडू दे, गंगा भरू दे - भादव्यात मी येईन गं' असा गेला महिनाभर माहेराला निरोप पाठवणारी गौराई मंगळवारी (ता. 29) येणार आहे. बुधवारी (ता. 30) शंकरोबाचे आगमन होणार असून, या पार्श्‍वभूमीवर गौरी आणि शंकरोबाच्या मुखवट्यांची बाजारपेठ सजली आहे. यंदा स्टॅंड आणि तयार मूर्तींबरोबरच हात, पाय असे सुटे भागही बाजारपेठेत विक्रीस आहेत. 

दीड दिवसांच्या बाप्पांचे आज विसर्जन 
दीड दिवसांच्या बाप्पांचे उद्या (ता. 26) विसर्जन होणार आहे. पंचगंगा घाट संवर्धन समिती आणि महापालिकेसह विविध संस्था व संघटनांच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक विसर्जन कुंड उभारले असून, त्यात चारधामहून आणलेले पाणी मिसळले आहे. विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

पावसाचे आगमन 
सकाळपासूनच दाटून आलेल्या ढगांनी उत्सवावर पावसाचे सावट निर्माण झाले. मात्र, त्याची तमा न बाळगता गणेश आगमन सोहळा सजला. दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांची काही काळ तारांबळ उडाली. सायंकाळी सातनंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आणि जल्लोषाला उधाण आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com