वाजत गाजत आले बाप्पा

वाजत गाजत आले बाप्पा

पिंपरी - शहरात शुक्रवारी (ता. २५) ‘गणपती बाप्पा मोरया.., मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्‍या बाप्पांचे आगमन झाले. गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. रिमझिम पाऊस सुरू असतानाही हातात छत्री घेऊन गणेशभक्तांची गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग सुरू होती. घरोघरी लक्षवेधी सजावट केलेल्या आकर्षक मखरांमध्ये बाप्पा विराजमान झाले. 

सकाळपासून गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धांदल सुरू होती. गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधण्यासाठी गणेश मंडळांनी आधीपासूनच तयारी करून ठेवली होती. चिंचवडगाव येथील मानाचा गणपती नवतरुण मंडळाच्या गणेशाची मिरवणुकीद्वारे प्रतिष्ठापना झाली. ‘शिवतांडव’, ‘आरंभ’ यांच्यासह अन्य एका ढोल-ताशा पथकाने मिरवणुकीत सहभाग घेतला. मंडळाच्या माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना केली. मंडळाचे अध्यक्ष अनुराग चिंचवडे, योगेश चिंचवडे व पदाधिकारी उपस्थित होते. 

चिंचवडगाव येथील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या गणरायाची कीर्तनकार संतोष महाराज काळजे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. ताशा आणि तुतारीच्या गजरात परिसरातून मिरवणूक निघाली. स्वीकृत सदस्य भाऊसाहेब भोईर, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, शासकीय लेखापरीक्षक विजय भोईटे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, चंद्रकांत देव, गणेशोत्सव प्रमुख विपुल नेवाळे उपस्थित होते.  चिंचवड येथील एसकेएफ गणेशोत्सव मंडळातर्फे ढोल-ताशांच्या गजरात अध्यक्ष हेमंत गाडे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र भोईर, सरचिटणीस देवेंद्र घोडके, मुकेश चव्हाण यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना झाली. 

पिंपरी येथील अमरदीप तरुण मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या हस्ते झाली. नवमहाराष्ट्र विद्यालयापासून मंडळाच्या मंडपापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. ढोल-ताशा पथकात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक मधुकर बाबर यांच्या हस्ते झाली. मिरवणूक न काढता साधेपणाने प्रतिष्ठापना केली. थेरगाव येथील सम्राट मित्र मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना संदीप दिघे यांच्या हस्ते झाली. खासदार श्रीरंग बारणे, मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक नीलेश बारणे, नीलेश पिंगळे उपस्थित होते. पिंपरी येथील शिवराजे प्रतिष्ठानच्या गणरायाची फळ विक्रेत्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. शगुन चौकातून पिंपरी भाजी मंडईपर्यंत मिरवणूक निघाली.  

दीड दिवसाच्या विसर्जनासाठी तयारी पूर्ण
दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून, शहरातील विविध घाटांची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी प्रकाश व्यवस्था आणि प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले जात आहेत. घाटांवर अग्निशमन दलाचे ६० कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. 

शहरात २६ विसर्जन घाट असून ‘क’, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी सहा घाट आहेत. तर ‘अ’मध्ये चार घाट, ‘ब’मध्ये पाच घाट आणि इतर उर्वरित घाट ‘ग’, ‘ई’मध्ये आहेत. या सर्व घाटांची पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत साफसफाई करण्यात आली आहे. तसेच निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

रिव्हर रोड, मोशी, वाल्हेकरवाडी येथे साधारणतः दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. मात्र, त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अग्निशमन दलामार्फत पाचव्या, सातव्या, नवव्या ते बाराव्या दिवसांपर्यंत विसर्जन घाटांवर एकूण ६० अग्निशामन कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. याखेरीज जीवरक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. तसेच निर्माल्य दान आणि मूर्तीदानासाठी सुमारे ३० ते ४० स्वयंसेवी संस्था, संघटनांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. प्रमुख घाटांवर सहा बोटींची व्यवस्था केली जाणार असून ठिकठिकाणी स्थानिक मासेमाऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.     
भोसरी येथील तलावात गणपती विसर्जनास परवानगी नाही. तेथील विहीरही बुजविण्यात आली आहे. त्यामुळे भोसरीकर ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी आळंदीला जाणे पसंत करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com