‘ज्ञानप्रबोधिनी’चा विधायक गणेशोत्सव उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पिंपरी - गणेशोत्सव...स्वातंत्र्यपूर्व काळात संघटन व समाजजागृतीच्या हेतूने टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव! महाराष्ट्रात विशेषतः पुण्यामध्ये या उत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आहे. पण या उत्सवाचे सध्याचे स्वरूप सर्वांनाच व्यथित करते. पूर्वीइतकाच तो अर्थपूर्ण, संस्कारक्षम झाला तर? याच उदात्त हेतूने ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राने आदर्श उत्सवाचा नमुना समाजासमोर ठेवण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्याअंतर्गत समाजाला स्वावलंबन, स्वदेशी वस्तू, त्याचे पावित्र्य आणि त्यातील संस्कार जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे.

पिंपरी - गणेशोत्सव...स्वातंत्र्यपूर्व काळात संघटन व समाजजागृतीच्या हेतूने टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव! महाराष्ट्रात विशेषतः पुण्यामध्ये या उत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आहे. पण या उत्सवाचे सध्याचे स्वरूप सर्वांनाच व्यथित करते. पूर्वीइतकाच तो अर्थपूर्ण, संस्कारक्षम झाला तर? याच उदात्त हेतूने ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राने आदर्श उत्सवाचा नमुना समाजासमोर ठेवण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्याअंतर्गत समाजाला स्वावलंबन, स्वदेशी वस्तू, त्याचे पावित्र्य आणि त्यातील संस्कार जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. विचार आणि कृतीची सांगड घालून त्याला विधायक वळण देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. संस्कार शिबिरांपासून उत्सवपूरक साधनसामग्री बनविण्याच्या कार्यशाळाही घेतल्या. 

शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण शिबिरात दोनशे विद्यार्थ्यांनी मूर्ती बनविल्या. त्यातील पाच ते सहा विद्यार्थ्यांनी त्या आपल्या घरी प्रतिष्ठापितही केल्या. त्याव्यतिरिक्त कृत्रिम हारापासून सजावटीचे साहित्य बनविण्यापर्यंतच्या अनेक प्रशिक्षणांचा त्यात समावेश केला गेला. तसेच प्रसाद कसा बनवायचा याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी त्यात हिरिरीने सहभागी झाले. 

विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद हे या उपक्रमाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. केवळ अभ्यासात विज्ञान नाही, तर गणेशोत्सवामागेही आहे, हेदेखील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले गेले. ज्या विद्यार्थ्याच्या घरी गणपती विराजमान होतात, त्यांच्या घरी या गटाने जाऊन आरती, अथर्वशीर्ष पठण करावे, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे आज सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने त्याचे पालन करत आहेत. याबाबत केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर म्हणाले, ‘‘केवळ परंपरा जपण्यापेक्षा सहजपणे, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहभागाने, उत्साही वातावरणात बाप्पाचा उत्सव साजरा व्हावा, हा या उपक्रमामागील हेतू आहे. किंबहुना अर्थपूर्ण, संस्कारक्षम गणेशोत्सवाबाबत होणाऱ्या संवादाला कृतीरूप देणे, हीदेखील त्यातील भावना आहे. त्यामुळे या सर्व प्रयत्नांना समाजाकडून वैचारिक आणि कृतीपूर्ण दाद मिळणे आवश्‍यक आहे.’’