पिंपरीत ऐतिहासिक, पौराणिक देखावे

पिंपरीत ऐतिहासिक, पौराणिक देखावे

पिंपरी - संत तुकारामनगरमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाही ऐतिहासिक आणि पौराणिक देखाव्यांची परंपरा कायम ठेवत देखावे सादर केले आहेत. 

शनी मंदिर चौकातील झुंजार तरुण मित्र मंडळाने प्रफुल्ल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावर ‘हॅंगिंग स्टेज’ उभारला असून कडेने सभामंडप तयार केला आहे. या स्टेजवर फुलांनी सजविलेल्या मयूर पंखाची सजावट केली आहे. या मयूर पंखांमध्ये ‘बाप्पा’ विराजमान झाले असून कार्नेशन फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मंडळाचे यंदा ३२ वे वर्ष आहे.

सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे २८ वे वर्ष असून अध्यक्ष रवींद्र बांबळे यांनी आठ मिनिटांच्या हलता देखाव्यातून ‘आरोग्यम धन संपदे’ची महती सांगितली आहे. ‘योगा’ या थीमवर ऑटोमॅटिक टायमिंगवर सात मूर्तींच्या मदतीने योगासनाचे विविध प्रकार सादर केले आहेत. या बरोबरच भाविकांसाठी निर्माल्य कलश, प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक आणि पुरुष आणि महिला कक्ष अशी स्वतंत्र बैठक व्यवस्था ठेवली आहे. 

सेवा विकास मित्र मंडळाने सुभेदार तानाजी मालुसरे यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ हा ऐतिहासिक अकरा मिनिटांची ध्वनिफीत असलेला हलता देखावा सादर केला आहे. सजावट संस्थापक संजय यादव आणि अध्यक्ष विनय साळवी, अय्याद अन्सारी यांनी केली आहे. १२ हलत्या मूर्तींचा वापर केला असल्याने हा देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे यंदा २३ वे वर्ष आहे. 

एकता विकास मित्र मंडळ २९ वे वर्ष साजरे करत आहे. पांढऱ्या फरचा उत्तम वापर करून बर्फाळ सभा मंडपाची सजावट केली आहे. हे मंडळ गेली २९ वर्षे पंचधातूची गणरायाची मूर्ती विराजीत करत असल्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले.

भक्ती-शक्ती तरुण मित्र मंडळाने थर्मोकोलचा वापर करून महल साकारला असून तीनमुखी बालाजी गणेशाची मूर्ती विराजीत केली आहे. फुलांची सजावट करत रंगीत विद्युत झोत सोडले आहेत. मंडळाचे २१ वे वर्ष असून अध्यक्ष तुषार कवडे आहेत.

गंगानगरमध्ये समाजसेवा मित्र मंडळाने कापड आणि कागदाचा वापर करून इको फ्रेंडली कमल फूल व हस्तीदंताचा देखावा सादर केला आहे. कमळ फुलात गणरायांना विराजमान केले आहे. मंडळाचे ३७ वे वर्ष आहे. अध्यक्ष प्रीतम भालेराव आहेत.

सुवर्णयुग मित्र मंडळाचे संस्थापक अनिल शेलार आणि अध्यक्ष नीलेश जयस्वाल यांनी फुलांची आरास सजावट करून त्यात साडेसहा फुटी गणेशाची मूर्ती विराजमान आहे. विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे १७ वे वर्ष आहे. 

एलआयजी कॉलनीमधील उत्कर्ष स्पोर्टस क्‍लबने अध्यक्ष अमित काटे व कार्यकर्त्यांच्या मदतीने टाकाऊपासून टिकाऊचा संदेश दिला आहे. मंडळाने दोन हजार बिसलरी बॉटलचा वापर करून कृत्रिम फुलांची बाग उभारली आहे. मंडळाचे ३५ वे वर्ष आहे.

दिगंबरा प्रतिष्ठान मित्र मंडळाने ‘स्नो व्हाइट’चा वापर करून ‘शिवपर्वत’ हा पौराणिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदा १९ वर्ष असून ज्ञानेश घोडे अध्यक्ष आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com