मलई, चॉकलेटच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

केसरी मोदक - ५४० रुपये (किलो)
मॅंगो मोदक - ५८० रुपये ( किलो)
खोबरे मलई मोदक ५०० रुपये (किलो)

पिंपरी - लाडक्‍या बाप्पाच्या स्वागतासाठी अन्य मोदकां-बरोबरच मलई आणि चॉकलेट मोदकाला अधिक पसंती दिली जात आहे. विविध रंगांत, चवीमध्ये आणि आकारांमध्ये उपलब्ध असलेल्या मोदकांचा दरवळ दुकानांमध्ये येत आहे. कंदी पेढा मोदक, मलई पेढा मोदक, गुलकंदाचे मोदक तर आहेतच, शिवाय काही दुकानांमध्ये आंबा-काजू, पिस्ता-काजू, केशर-काजू, मलई-केशर अशा मिश्र मोदकांचीही नैवेद्य बाप्पाला दाखविण्यासाठी मेवा मिठाई दुकानात गर्दी दिसत आहे.

गणरायाला आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. उत्सवकाळात घरोघरी बाप्पांच्या नैवेद्यासाठी कणकेचे, उकडीचे मोदक बनवले जात. पण आता मिठाईच्या दुकानामध्ये खवा आणि मलई मोदकांमध्ये विविध फ्लेवर दाखल झाले झाल्याने उत्सवाला लज्जत आली आहे. खास बाप्पांसाठी खवा आणि मलई मोदकांतील काजू, मावा, ड्राय फ्रूट, काजू चॉकलेट, पिस्ता, मॅंगो, खोबरे, मथुरा मोदक आणि गोली, दूध, केशर, मलई, मथुरा पेढा या फ्लेवरला पसंती मिळत आहे. आकार आणि फ्लेवरनुसार साडेतीनशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत मोदकांचा भाव आहे. मोदकांशिवाय कडक बुंदीचे लाडू, ड्रायफ्रूट बुंदीला मागणी होत आहे. याशिवाय खाजा, बालूशाही, रवा लाडू, बुंदी लाडू, शंकरपाळी आदींनाही डिमांड असल्याचे मिठाई दुकानदारांनी सांगितले. या सर्व मिठाईचे दर साधारणतः १७० ते एक हजार रुपये  किलो आहेत.

सजले मोदकाचे ताट  
तळणीचे मोदक नगावर मिळतात. बहुतांशी दुकानांमध्ये पारंपरिक उकडीच्या मोदकांची ऑर्डर ‘फुल्ल’ झाली. बाजारात मोदकांचे रेडिमेड बॉक्‍स, सुट्या मोदकांची ताटेही सजली आहेत.

डाएट मोदक - बन्सल
नैवेद्यासाठी आणि ज्या मोदकांवर मनसोक्त ताव मारायचा त्यासाठी कॅलरीज न वाढवणारे हे मावा शुगर फ्री मोदक असे खास डाएट मोदकही उपलब्ध असल्याचे प्रदीप स्वीट्‌सचे सुभाष ब न्सल यांनी सांगितले.