ब्राह्ममुहूर्तापासून श्रींची प्रतिष्ठापना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

हरितालिकापूजन आज 
भाद्रपद शुद्ध तृतीयेला (ता. २४) सखी पार्वतीच्या मूर्तीसहित वाळूच्या शिवलिंगाचे पूजन करावे. सकाळी साडेसहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पूजा करावी, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

पुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (ता. २५) ब्राह्ममुहूर्तापासून अर्थात पहाटे साडेचार वाजल्यापासून मध्यान्हकाळ (दुपारी पावणेदोन) पर्यंतच्या सुमुहूर्तावर श्रींच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी. तत्पूर्वी कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांचे पूजन करावे. दशमीची वृद्धी झाल्याने यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. यापूर्वीही २००८, २००९, २०१० मध्ये बारा दिवस गणेशोत्सव साजरा झाला होता, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘शुक्रवारी भद्रा करण सकाळी आठ वाजून २४ मिनिटांनी सुरू होत असले, तरीही श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी हा काळ वर्ज्य नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही गुरुजींच्या सोयीनुसार दिवसभरात कोणत्याही वेळी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पाच सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी मंगळवार असला, तरीही नेहमीप्रमाणे प्रतिष्ठापित केलेल्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करता येईल. कुलाचार आणि कुलधर्माप्रमाणे जितके दिवस नागरिकांच्या घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना होत असेल, तितके दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी श्रींची आरती, मंत्रपुष्पांजली म्हणावी. घरातील प्रतिष्ठापनेची मूर्ती साधारणतः एक वीत (म्हणजे सात-आठ इंचांची) असावी. मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी. माती, शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.’’