मंगलमूर्ती मोरया ! 

मंगलमूर्ती मोरया ! 

पुणे - चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या मंगलमूर्ती श्री गणरायांचे शुक्रवारी (ता.25) आगमन होत आहे. सनई चौघड्यांच्या सुरावटीत श्रींची विधिवत प्रतिष्ठापना होईल. आप्तेष्टांसमवेत सामूहिक आरती, अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर विघ्नहर्त्याला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येईल आणि पुढील काही दिवस "गणपती बाप्पा मोरया'चा गजर सुरू राहील. अनेकांनी श्रींच्या उत्सवाची नियोजनबद्ध आखणी केली असून, मोरयाच्या उत्सवाचा प्रारंभ दणक्‍यात करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्तेही कार्यमग्न आहेत. 

ब्राह्ममुहूर्तावर (पहाटे साडेचार वाजल्यापासून) सुचिर्भूत होऊन कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांसमोर विडा, दक्षिणा, सुपारी ठेवून पूजा करायची. मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना करायची म्हणून भाद्रपद शुद्ध तृतीयेला (ता.24) बहुतांश नागरिक श्रींची मूर्ती आपल्या घरी आणत होते. वरुणराजाही साक्षीदार होता. अधून मधून येणारे तुषार अंगावर झेलीत, "आले रे आले बाप्पा आले'च्या जयघोषात टाळ, मृदंगाच्या गजरात, टाळ्या वाजवत बाप्पाचे स्वागत करत होते. शहर व उपनगरांतही हेच दृश्‍य दिवसभर पाहायला मिळाले. शुक्रवारी (ता.25) चतुर्थीलाही अनेक भाविक बाप्पाला वाजत गाजत घरोघरी तसेच मंडपामध्ये आणत असल्याचे दृश्‍य पाहायला मिळणार आहे. 

अवघ्या काही तासांवर श्रींचे आगमन होणार असल्याने, गुरुवारी असंख्य नागरिक श्रींच्या स्वागतासाठी दिवसभर झटत होते. विशेषतः मानाच्या गणपती मंडळांसहीत अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्त्यांना खरंतर दिवसही पूरत नव्हता. मिरवणुकीसाठी रथ, ढोलाताशा, झांज, लेझीम आणि बॅण्ड पथकांतील वादक यांच्यासह प्रतिष्ठापनेसाठी मान्यवरांची वेळ घेण्यापर्यंत गुरुवारी रात्रीपर्यंत कार्यकर्ते व्यग्र होते. घरच्या गणेशासाठी कमळ, केवडा आणि 21 प्रकारची पत्री, सत्यनारायण पूजा, ऋषिपंचमी पूजा, गौरींचे मुखवट्यांपासून त्यांच्या सजावटीचे साहित्य, घरातील आरास यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. अनेक प्रकारच्या सजावट साहित्यांसहीत माव्याचे मोदक, विविध पदार्थांचे आणि साहित्य खरेदीचा आनंद गणेशभक्तांनी घेतला. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर, पासोड्या विठोबा मंदिर परिसर, तपकीर गल्ली, बोहरी आळी, शनिवारवाड्यानजीक लावलेले श्रींच्या मूर्तींचे स्टॉल्स येथे सकाळपासूनच भाविकांची ये-जा सातत्याने सुरू होती. अनेकांनी विविध प्रकारचे साहित्य आणि श्रींची मूर्ती खरेदी करण्याचा आनंद घेतला. 

रंगीत दिवे असणारे टिपरू 
श्रींच्या उत्सवानिमित्त बाजारपेठेत नानातर्ऱ्हेच्या वस्तू आल्या आहेत. अगदी सेफ्टी पिनपासून अनेक वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. कागद, थर्माकोल, लाकूड, कृत्रिम फुलांपासून हजारो प्रकारच्या वस्तू खरेदीचा आनंद भाविक घेत आहेत. ढोलताशा वादकांना आकर्षण असते ते टिपरूचे. पराग शेलार आणि रोहित मिनोचा यांनी तांत्रिक कौशल्याद्वारे पॉली कार्बोनेट मटेरिअलपासून टिपरू बनविले आहे. पाच विविध रंगांमध्ये हे टिपरू उपलब्ध असून, ढोल वाजताना त्यातील रंगीत दिवे लागतात. 

श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासून मुहूर्त
श्रींच्या मूर्तीची शुक्रवार (ता.२५) पहाटे साडेचार वाजल्यापासून दुपारी पावणेदोनपर्यंत विधिवत प्रतिष्ठापना करावी, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘श्रींच्या प्रतिष्ठापनेपूर्वी कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांचे पूजन करावे. शुक्रवारी भद्रा करण सकाळी आठ वाजून २४ मिनिटांनी सुरू होत असले, तरीही श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी हा काळ वर्ज्य नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुरोहितांच्या सोयीनुसार दिवसभरात कोणत्याही वेळी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

श्रींच्या पूजेचे साहित्य  
श्रींची पूजेची मूर्ती, श्रींचे आसन 
हळदकुंकू, गुलाल, रांगोळी, दूर्वा, तुळस, बेल, विड्याची पाने, गूळ, खोबरे, पंचामृत, शेंदूर, गंध, जानवे, कापूर, उदबत्ती, नारळ, खारीक, बदाम, फळे, दक्षिणा. २१ प्रकारची पत्री आणि नानाविध प्रकारची सुगंधी फुले.

प्रतिष्ठापनेसाठीची पुस्तके, कॅसेट्‌स 
गणेशोत्सवासाठी दीड-दोन महिन्यांपासून पुरोहितांचे बुकिंग होते. परिणामी, घरच्या श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी पुरोहित मिळेलच असे नाही. त्यावर पर्याय म्हणून श्रींच्या प्रतिष्ठापनेची धार्मिक पुस्तके, कॅसेट्‌स, सीडीज्‌ बाजारात आल्या आहेत. गुरुवारी अनेकांनी पुस्तके, कॅसेट्‌स, सीडीज्‌ खरेदीचा आनंद घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com