बाप्पांसाठी लिचीचा दरवळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

ठाणे - गणेशोत्सवानिमित्त बाजारात अगरबत्ती व धुपाचे नवनवे प्रकार आले आहेत. बाप्पासाठी यंदा प्रथमच बाजारात आलेल्या लिची फळाच्या सुगंधाचा दरवळ सर्वत्र पसरला असून नावीन्यपूर्ण वर्तुळाकार ‘रिंग ओ रिंग’ या पाच तास चालणाऱ्या अगरबत्तीची भुरळ पडली आहे. या लक्षवेधी अगरबत्तीसह स्टॅण्डच्या तळापासून सुवासिक धूर पसरवणाऱ्या मॅजिक धुपानेही धूम उडवली आहे.

गणेशाच्या पूजेअर्चेत अगरबत्ती व धुपाचे महत्त्व लक्षात घेऊन ग्राहकांकडून चिकित्सकपणे त्यांची खरेदी सुरू आहे. बाजारात सुमारे ५ ते १८ तासांपर्यंत दरवळणाऱ्या अगरबत्ती लक्षवेधी ठरल्या. अगरबत्त्यावर यंदा ५ टक्के जीएसटी आकारण्यात आल्याने यंदा किमान ८० रुपयांना मिळणाऱ्या अगरबतीने शंभरी गाठली आहे. तरीही श्रद्धेपुढे मोल क्षुल्लक ठरले असून भाविकांकडून विविध नावीन्यपूर्ण अगरबत्ती आणि धुपाच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. यंदा लिची फळाच्या सुवासिक अगरबत्तीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

‘रिंग ओ रिंग’ या सर्व सुवासांत असलेल्या वर्तुळाकार अगरबत्तीने ग्राहकांना मोहवून टाकले आहे. एका पाकिटात अवघ्या दोनच काड्या असल्या, तरी ही अगरबत्ती तब्बल पाच ते सहा तास चालते, अशी माहिती ठाण्यातील ७० वर्षे जुन्या मे. व्ही. एल. माशेरे कंपनीच्या अरुण माशेरे यांनी दिली.

धूप-अगरबत्तीच्या व्यवसायात सध्या स्पर्धा वाढली आहे; मात्र, आर्थिक सुधारणेचा फटका उत्सवांनाही बसत आहे. यंदा कच्च्या मालावर जीएसटी  भरूनही तयार अगरबत्तीवर ५ टक्के अतिरिक्त जीएसटी आकारल्याने सर्वच दर वधारले आहेत. तरीही, यंदा सात दिवसांचे गणपती असल्याने भाविकांनी धूपबत्तीची जोरदार खरेदी केली आहे.
- आकाश माशेरे, अगरबत्ती उत्पादक, भिवंडी.