पिंपरीत पावणेबारा तास मिरवणूक 

पिंपरीत पावणेबारा तास मिरवणूक 

पिंपरी -  "मोरया रे बाप्पा मोरया रे..' अशा गजरात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात पिंपरीत रविवारी लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य अनुभवण्यास आले. पावणेबारा तास चाललेल्या मिरवणुकीत 62 गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. काही निवडक मंडळांनी डीजेवर निर्बंध असतानाही डीजे वाजविला. 

यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवालाही चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश नागरिकांनी व गणेश मंडळांनी पवना नदीपात्रात मूर्ती विसर्जित करण्याऐवजी हौदामध्ये मूर्ती विसर्जित केल्या. गतवर्षी सुमारे शंभर गणेश मंडळांनी मिरवणुकीत भाग घेतला होता. यंदा ही संख्या घटल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. दुपारी साडेबारा वाजता पिंपरी येथील संत गाडगे महाराज चौकात (कराची चौक) विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही मिरवणूक संपली. झूलेलाल घाटावर विसर्जन झाले. जी. के. एन. सिंटर मेटल्स यांनी मिरवणुकीत सर्वप्रथम भाग घेतला. त्यापाठोपाठ झूलेलाल तरुण, दुर्गादेवी मंडळ, सदानंद तरुण मित्र, पवना मित्र, शिवशंकर मित्र आदी मंडळांनी गणरायाला निरोप दिला. पोलिस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदाडे आदी उपस्थित होते. सायंकाळी साडेसहापर्यंत केवळ 23 मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. रात्री आठनंतर खऱ्या अर्थाने मिरवणुकीत जल्लोष पाहण्यास मिळाला. ढोल-ताशांच्या दणदणाटाने अवघे वातावरण भारून गेले. रात्री बारापर्यंत 57 मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. रात्री बारानंतर पाच मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी मिलिंदनगर येथील वारवीर प्रतिष्ठानच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. 

बालवादकांचे ताशावादन 
पिंपरीगाव येथील न्यू चैतन्य मित्र मंडळाच्या मिरवणुकीत साई मंडळाच्या (मावळ) ढोल-ताशा पथकाने विविध खेळ सादर केले. नवचैतन्य तरुण मित्र मंडळाच्या मिरवणुकीत मातृभूमी ढोल-ताशा पथकाचा रंगतदार खेळ झाला. बालवादक योगद्रुम माने आणि सोहम सालपेकर यांच्या ताशावादनाने गणेशभक्तांना मंत्रमुग्ध केले. "एक ताल-एक लय' अनुभवण्यास आला. कृत्रिम फुलांची सजावट केलेल्या रथातून गणरायाची मिरवणूक निघाली. मिरवणूक मार्गावर फुलांची उधळण करण्यात आली. 

फुलांची मुक्त उधळण 
शिवराजे प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. घोडे, गणरायासाठी गजरथ असा वेगळा दिमाख होता. महिलांनी आकर्षक नृत्य केले. फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. खराळवाडी येथील भागवत तरुण मित्र मंडळाने कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली होती. ब्ल्यू स्टार मित्र मंडळाने (भीमनगर) भंडाऱ्याची उधळण केली. दोस्ती ग्रुपने गुलालाची उधळण केली. 

रंगतदार सनई-चौघडा वादन 
पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या मिरवणुकीत रंगतदार सनई- चौघडा वादन झाले. केंगार कन्हेर यांनी समई डोक्‍यावर ठेवून त्यावर पाण्याने भरलेली कळशी घेतली होती. या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशा वादनाने वातावरण जल्लोषमय झाले. आकर्षक फुलांची सजावट केलेल्या रथात गणराय विराजमान होते. 

कार्यकर्त्यांच्या फुगड्या व नृत्य 
सावित्रीबाई फुले भाजी व्यवसाय मार्गदर्शक संघाच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी फुगड्या, नृत्य सादर केले. शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या मिरवणुकीत ढोल-ताशावादन झाले. डी-वॉर्ड फ्रेंड सर्कलच्या मिरवणुकीत 15 फुटी हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. श्रीराम व लक्ष्मण यांची प्रत्येकी पाच फुटी मूर्ती होती. विश्‍वराजा मित्र मंडळाने "साईबाबा-सबका मालिक एक' हा देखावा केला होता. खराळवाडीतील महेश मित्र मंडळाने आकर्षक मयूर रथ सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com