देऊरमध्ये पारंपरिक वाद्येच वाजणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉल्बी बंदीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मंगल कार्यालयांच्या मालकांनाही तशा सूचना केल्या आहेत. 
- मयूर वैरागकर, सहायक पोलिस निरीक्षक, वाठार स्टेशन

कोरेगाव : देऊर (ता. कोरेगाव) येथील ग्रामसभेत डॉल्बी बंदीचा ठराव झाला. यापुढे कोणत्याही सण, समारंभात केवळ पारंपरिक वाद्ये वाजवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. 

सरपंच नीलिमा कदम यांच्या अध्यक्षतेखाली व वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही ग्रामसभा झाली. या वेळी उपसरपंच बाळकृष्ण कदम, सदस्य राजेंद्र ब. कदम, अजित चं. कदम, प्रदीप म. कदम, नंदा कदम, धनश्री कुंभार, संगीता थोरात, वसंत जाधव, नंदा काकडे, शुभांगी देशमुख, ग्रामसेवक राहुल कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी ग्रामसेवक कदम यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यावर उपस्थितांनी संगोपांग चर्चा केली. दरम्यान, सहायक निरीक्षक वैरागकर यांनी सभेच्या माध्यमातून गावाला डॉल्बी बंदीचे आवाहन केले. केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर यापुढे कोणत्याही सण, समारंभात डॉल्बी वाजवू नये, असे श्री. वैरागकर यांनी या वेळी नमूद केले. सरपंच नीलिमा कदम यांनीही या आवाहनास कृतिशील प्रतिसाद देण्याची विनंती ग्रामस्थांना केली. त्या म्हणाल्या, ''आपल्या गावाला धार्मिक, ऐतिहासिक वारसा आहे. शैक्षणिक वारशामुळेही गावाच्या लौकिकात भर पडली आहे. आता ध्वनिप्रदूषणावरील उपाय म्हणून डॉल्बी बंदीसाठी गावाने पुढे यावे.'' त्यांच्या या आवाहनास सर्वांनीच प्रतिसाद दिला. त्यानुसार, अजित कदम यांनी मांडलेल्या डॉल्बी बंदीच्या ठरावास प्रदीप कदम यांनी अनुमोदन दिले आणि सर्वानुमते ठराव मंजूर झाला. दरम्यान, या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली.