वर्गणी देईना, जाहिराती मिळेना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे - गणेशोत्सवाला परिसरातील नागरिकांकडून मिळणारी वर्गणी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे, तर नोटाबंदी, वस्तू व सेवाकराची (जीएसटी) कारणे देत विविध क्षेत्रांकडून जाहिरातीही दिल्या जात नसल्याची सद्यःस्थिती आहे. त्यातच या वर्षी गणेशोत्सवाच्या खर्चात वीस टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पदरमोड करून खर्चाचे गणित जुळविण्याची वेळ मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते व काही पेठांमधील मंडळांना कमानी व मंडपांवरील जाहिरातींद्वारे काही प्रमाणात उत्पन्न मिळते. त्याद्वारे उत्सवाच्या खर्चाला थोडा हातभार लागतो; परंतु मध्यवर्ती भाग व काही पेठा वगळता उर्वरित ठिकाणी जाहिराती दूरच, परंतु वर्गणीही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची कैफियत मंडळे मांडत आहेत. 

गणेशोत्सवाला आजही नागरिक अकरा रुपयांपेक्षा जास्त वर्गणी देत नाहीत. अकरा रुपयांसाठी चार-पाच मजले चढ-उतर करण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नाही. त्यातच उद्योग क्षेत्रातील वातावरण थंड असल्यामुळे यंदा जाहिरातींतूनही उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे मंडळाला आर्थिक चणचण जाणवत आहे. असे असले तरीही उत्सव सुरूच राहणार आहे. 
- विनायक घाटे, अध्यक्ष, अकरा मारुती मंडळ, शुक्रवार पेठ 

वर्गणीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही आणि यंदा जाहिरातीही मिळालेल्या नाहीत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनाच जादा पैसे देऊन उत्सव करावा लागत आहे. 
- अर्जुन जानगवळी, अध्यक्ष, अरण्येश्‍वर मित्रमंडळ, सहकारनगर 

जीएसटी, नोटाबंदीची कारणे देत वर्गणी, जाहिरात नाकारली जात आहे. त्याचा सर्वाधिक फटका छोट्या मंडळांना बसत आहे. खर्चाचा ताळेबंद पूर्ण करताना कार्यकर्त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
- धीरज घाटे, अध्यक्ष, साने गुरुजी मित्रमंडळ 

मध्यवर्ती भागातील मंडळांना जाहिरातींद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून उत्सव साजरा करता येतो; परंतु उपनगरांमधील मंडळांना वर्गणीवर अवलंबून राहावे लागते. वर्गणी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे तर उत्सवातील खर्च वाढला आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होईल. त्यामुळे मंडळांनी स्वतः 
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. 
- उदय जगताप, आदर्श मित्रमंडळ, धनकवडी