‘ड्रॅगन’चे भारताला गाजर!

‘ड्रॅगन’चे भारताला गाजर!
‘ड्रॅगन’चे भारताला गाजर!

नवी दिल्ली/बीजिंग - दहशतवाद्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान अडचणीत आल्यानंतर त्यांच्या मदतीला जुना मित्र चीन आला आहे. भारताला रोखण्यासाठी ब्रह्मपुत्रा पाणीवाटपाबाबत चर्चेची तयारी चीनने दाखविली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांविरोधातील हल्ल्यांचे राजकारण न करण्याचा अनाहूत सल्ला देतानाच अणुपुरवठा गटात सहभागासाठी चर्चेचे गाजर दाखविले आहे.

ब्रह्मपुत्रेबाबत भारताशी सहकार्याचा दावा

ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपाबाबत भारताशी सध्या कोणताही वाद नसल्याचे सांगत, ब्रह्मपुत्रेचा प्रवाह, तसेच याबाबतच्या यंत्रणेबाबत सध्या भारताबरोबर योग्य प्रकारे सहकार्य सुरू असून तसेच ते पुढे ठेवण्याचा इरादा असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.

दोन देशांतून वाहणाऱ्या या नदीबाबत सहकार्य असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी आज येथे बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘सध्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपाबाबत योग्य यंत्रणा कार्यरत आहे. चीनच्या बाजूने याबाबत सहकार्य पुढेही कायम ठेवले जाणार आहे.’’ ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीवाटपाबाबत भारत व बांगलादेशसमवेत चीन सहकार्य करण्याच्या तयारीत असल्याचा लेख येथील सरकारी मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यावर शुआंग यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाणीवाटपाबाबत सध्या चीनचा भारताशी कोणताही करार नाही. त्यामुळे चीनच्या या भूमिकेला महत्त्व आहे.

‘चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी तिबेटमध्ये अडविणार’ अशा आशयाच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. ही नदी चीनमधून पुढे आसामात व नंतर बांगलादेशात वाहत जाते. या वृत्तामुळे भारतीय लोकांमध्ये संताप व्यक्त होत असणार यात शंका नाही, असेही या लेखात म्हटले आहे. अशा प्रकल्पांबाबत भारताने लगेच टोकाची प्रतिक्रिया देणाची गरज नाही. भारतातील काही माध्यमांनी याचा संबंध पाकिस्तानशी जोडला आहे. पाकिस्तानला मदत करण्याच्या हेतूने चीन ब्रह्मपुत्रा नदीवर प्रकल्प उभारून पाणी अडवत आहे, अशा आशयाचे वृत्त भारतातील माध्यमांनी दिले आहे. मात्र ब्रह्मपुत्रेच्या उपनदीवर धरण बांधण्याचा प्रकल्प २०१४ मध्ये सुरू केल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे. नदीच्या पाण्याचा वापर चीन शस्त्र म्हणून कधीही करणार नाही, असा दावाही लेखात करण्यात आला आहे.

अनेक बहुदेशीय नद्यांचा उगम चीनमध्ये होतो. लानकॅंग-मेकाँग नदी चीनमध्ये उगम पावते व पुढे म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम या देशांतून वाहत जाते. समजा चीनने राजकीय कारणांसाठी ब्रह्मपुत्रेचे पाणी अडविले, तर या देशांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल. याचा चीनच्या या देशांच्या संबंधावर परिणाम होईल, असे या लेखात म्हटले आहे. 

चीनने एक ऑक्‍टोबरला ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेल्या नदीवर लाल्हो धरण बांधण्याचे जाहीर केले होते. यामुळे ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर कोणताही परिमाम होणार नाही, असा खुलासा नंतर चीनने केला होता. सध्या ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपाबाबत भारत व चीनमध्ये तज्ज्ञांची यंत्रणा अस्तित्वात आहे. यामध्ये चीन नदीच्या पाण्याबाबतची माहिती भारताला देतो.

हल्ल्याचे राजकारण नको 

जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असतानाच, चीनने मात्र दहशतवादविरोधी कारवाईचा उपयोग राजकीय कारणांसाठी केला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.

अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला चीनने दोन वेळेस तांत्रिक मुद्दा उपस्थित करत आडकाठी आणली आहे. गोव्यात होणाऱ्या ‘ब्रिक्‍स’ परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग हे भारतात येणार आहेत. या वेळी या मुद्द्यावरून त्यांचे मन वळविण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जाण्याची शक्‍यता आहे. मसूद अझहर हा पठाणकोट आणि उरी हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचा भारताचा दावा आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनचे उपपरराष्ट्रमंत्री ली बाओडोंग यांनी भारतावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘‘सर्व प्रकारच्या दहशतवादाला चीनचा विरोध आहे. मात्र, याबाबत कोणाचीही दुटप्पी वागणूक असू नये. तसेच दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाखाली स्वत:चा राजकीय फायदा साधण्याचाही कोणत्या देशाने प्रयत्न करू नये.’’ बाओडोंग यांनी भारताचे थेट नाव घेणे मात्र टाळले.

अणू पुरवठादारांच्या गटात सहभागासाठी चर्चेस तयार

अणू पुरवठादारांच्या गटात भारताला सहभागी करण्याबद्दल चीन भारताशी चर्चेस तयार असल्याचे आज चीनने स्पष्ट केले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्‍स बैठकीसाठी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत.

शि जिनपिंग यांच्या भारतभेटीच्या पार्श्‍वभूमीवर चीनचे उपविदेश मंत्री ली बाओडोंग यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. अणू पुरवठादार ४८ देशांच्या गटात नव्या सदस्याला प्रवेश देण्याबाबत सर्व सहमती आवश्‍यक असल्याच्या मुद्यावर ली यांनी परत भर दिला. भारताच्या अणू पुरवठादार देशांच्या गटात सहभागाबद्दल विचारता ते म्हणाले, की ब्रिक्‍स बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग  यांच्यात याबाबत चर्चा होईल. नव्या सदस्यांना या गटात घेण्याबाबत नियमांप्रमाणे सर्व सदस्यांमध्ये एकमत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. हे नियम काही चीनचे एकट्याने तयार केलेले नाहीत. भारत आणि चीन यांच्यात चांगले संबंध असून, त्याबाबत चर्चेस तयार आहोत. भारत अन्य सदस्य देशांशी चांगले संबंध निर्माण करेल अशी आपल्याला आशा आहे, असे ली म्हणाले. अणू पुरवठादार देशांच्या गटात आपल्या सहभागास चीनचा अडथळा असल्याचा भारताचा आरोप होता, यावर विचारता ली म्हणाले, की याबाबत दोन्ही देशांनी मतभेद दूर करण्यासाठी नुकतीच चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com