"जागतिक विचारवंतां'च्या यादीत सुषमा स्वराज...

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पश्‍चिम आशियात युद्ध सुरु झाल्यानंतर तेथे अडकलेल्या हजारो भारतीयांसाठीच्या सुटका मोहिमेपासून अत्यंत वैयक्तिक स्तरावरील प्रकरणांनाही भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच भारतीयांसहितच बिगर भारतीयांनाही स्वराज यांनी मदत केल्याचे आढळून आले आहे

दिल्ली - गेल्या दोन वर्षांपासून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने विरोधकांची प्रशंसाही जिंकलेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना "फॉरेन पॉलिसी' या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण मासिकाने या वर्षीच्या जागतिक विचावंतांच्या यादीमध्ये स्थान दिले आहे.

स्वराज यांनी अवलंबिलेल्या "ट्‌विटर डिप्लोमसी'च्या नावीन्यपूर्ण प्रकाराची विशेष दखल घेत या प्रभावी मासिकाने स्वराज यांना गौरविले आहे. फॉरेन अफेअर्सने या वर्षी प्रभावी ठरलेल्या 15 जागतिक विचारवंतांची यादी प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये स्वराज यांच्यासहित अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्‍लिंटन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि कॅनडचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांचाही समावेश करण्यात आला आहे.

स्वराज यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. "आमच्या अत्यंत मेहनती परराष्ट्र मंत्र्यांचा जागतिक विचारवंतांच्या या यादीमध्ये समावेश झाल्याचा अत्यंत अभिमान वाटत असल्याची,' प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणून हाती सूत्रे घेतल्यानंतर स्वराज यांनी ट्‌विटरचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. मदतीसाठी विनंती केलेल्या विविध ट्‌विट्‌सना तत्परतेने प्रतिसाद देत स्वराज यांनी यासंदर्भातील प्रकरणांचा कार्यक्षम पाठपुरावा केल्याचे दिसून आले आहे. पश्‍चिम आशियात युद्ध सुरु झाल्यानंतर तेथे अडकलेल्या हजारो भारतीयांसाठीच्या सुटका मोहिमेपासून अत्यंत वैयक्तिक स्तरावरील प्रकरणांनाही भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच भारतीयांसहितच बिगर भारतीयांनाही स्वराज यांनी मदत केल्याचे आढळून आले आहे.

प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर झालेल्या यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतरही स्वराज यांच्या कामाचा वेग मंदावला नाही! या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या या कार्याची उचित दखल फॉरेन अफेअर्सने घेतली आहे. याआधी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने स्वराज या "सुपरमॉम ऑफ दी स्टेट' असल्याची स्तुतिसुमने उधळली होती.