मलेरियाच्या पहिल्या लसीसाठी आफ्रिकेची निवड

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

ही लस हा मलेरियावरील अंतिम उपाय नसला तरीही योग्य काळजी घेत त्याचा वापर केल्यास हजारो जणांचे आयुष्य वाचविण्याची लसीची क्षमता आहे, असे "डब्लूएचओ'चे विभागीय संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी सांगितले

जोहान्सबर्ग - मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आज जाहीर केले. या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू होणार आहे.

अद्यापही डॉक्‍टरांपुढे मलेरियाचे मोठे आव्हान असून, जगभरात या रोगामुळे दरवर्षी वीस कोटी जण आजारी पडतात. यापैकी पाच लाख जणांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये बहुतांश जण आफ्रिकेतील लहान मुले असतात. मलेरिया पसरण्यास कारणीभूत असलेल्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी येथे मच्छरदाणी आणि डास मारण्याचा फवारा असे दोन उपाय योजले जातात, त्यामुळे ग्लॅक्‍सो स्मिथ क्‍लिन या कंपनीने आरटीएस (अथवा मॉस्क्‍युरिक्‍स) ही लस तयार केली आहे. ही लस हा मलेरियावरील अंतिम उपाय नसला तरीही योग्य काळजी घेत त्याचा वापर केल्यास हजारो जणांचे आयुष्य वाचविण्याची लसीची क्षमता आहे, असे "डब्लूएचओ'चे विभागीय संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी सांगितले. मात्र, यासाठी या गरीब देशांमधील लहान मुलांना या लसीचे चारही डोस दिले जाण्याचे आव्हान संघटनेपुढे आहे.

मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात झालेल्या विविध प्रयत्नांमुळे गेल्या पंधरा वर्षांमध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत 62 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मात्र, "डब्लूएचओ'च्या म्हणण्यानुसार, या रोगाचा सर्वाधिक धोका असलेल्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये याबाबतची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने रोगाचे प्रमाण घटले, असे ठामपणे म्हणता येणार नाही.

सतरा महिन्यांपर्यंतच्या मुलांसाठी लस
पुढील वर्षीपासून दिली जाणारी मलेरियावरील ही लस पाच ते सतरा महिन्यांपर्यंतच्या मुलांना दिली जाणार आहे. प्रयोगशाळांमधील चाचणीवेळी लसीचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसून येतात का, हे या वेळी तपासले जाणार आहे. ही लस तयार करण्यासाठी गेली अनेक वर्षे संशोधक प्रयत्न करत होते आणि यासाठी कोट्यवधी डॉलर खर्च आला आहे. केनिया, घाना आणि मलावी या देशांमध्ये चांगले प्रतिबंधात्मक उपाय योजिले जात असूनही रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कायम असल्याने या तीन देशांची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. 2040 पर्यंत जगभरातून मलेरियाची समस्या दूर करण्याचे "डब्लूएचओ'चे लक्ष्य आहे.