मँचेस्टरमध्ये भीषण स्फोट; 19 ठार, 50 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

मँचेस्टर येथे पॉप गायिका अरियाना ग्रॅंडच्या म्युझिकल कॉन्सर्टच्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटात 19 जण ठार तर 50 जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मँचेस्टर (युके) : मँचेस्टर येथे पॉप गायिका अरियाना ग्रॅंडच्या म्युझिकल कॉन्सर्टच्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटात 19 जण ठार तर 50 जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक प्रमाण वेळेनुसार सोमवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी मँचेस्टर अरिना येथे हा हल्ला झाला. कॉन्सर्टच्या ठिकाणाची 21 हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. जवळपास तेवढेच प्रेक्षक तेथे उपस्थित होते. हल्ल्यापूर्वी ठिकाणाच्या तिकिट काढण्याच्या ठिकाणी दोन मोठे स्फोटाचे आवाज आले. मात्र स्फोटाचे नेमके कारण समजलेले नाही. स्फोट झाल्यानंतर गोंधळ उडाला. बाहेर पडण्यासाठी उपस्थित प्रेक्षक धडपड करत होते. या हल्ल्यात गायिका अरियाना सुखरूप असल्याचे वृत्त आहे.

जोपर्यंत या हल्ल्याचे नेमके कारण सापडत नाही तोपर्यंत हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृहित धरत आहोत, असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. घटनास्थळाजवळील रेल्वे स्थानकातील सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. हल्ल्याचा तीव्र निषेध करत असल्याचे सांगत आम्ही मृतांच्या कुटुंबियांसोबत असून जखमींसोबत आमच्या सदिच्छा असल्याचे मोदींनी ट्विटरद्वारे म्हटले आहे