93 वर्षीय कुंग फु मास्टर रणरागिणी चर्चेत

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

"मी चार वर्षांची असताना कुंग फू खेळायला सुरवात केली. ही 300 वर्षांपासून माझ्या कुटुंबात चालत आलेली परंपरा आहे."

बीजिंग- 'तिचे' वय 93 वर्षे... देहयष्टी दिसायला अगदी सामान्य, लहान... परंतु 'ती' अजूनही एका बुक्क्यामध्ये समोरच्याला गारद करू शकते... कारण, गेल्या 89 वर्षांपासून ती 'कुंग फु'चा नियमित कसून सराव करतेय! होय, ही वस्तुस्थिती असून, झँग हेक्सियन नावाच्या आजीबाई चिनी सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनली आहे. 

झँग यांचे कुंग फु खेळतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. झँग यांना जेव्हापासूनचा काळ आठवतोय तेव्हापासून कुंग फु हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. 
"मी चार वर्षांची असताना कुंग फू खेळायला सुरवात केली. ही 300 वर्षांपासून माझ्या कुटुंबात चालत आलेली परंपरा आहे."

आग्नेय चीनमधील झेजियाँग प्रांतामधील एका खेड्यामध्ये झँग राहतात. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य कुंग फु शिकले आहेत. झँग या स्वतः त्यांच्या खेडेगावातील इतरांनाही कुंग फु शिकवतात. 

"कुंग फुने अंगी शिस्त आणि ताकद येते. लहानपणापासून दररोज पहाटे उठून अंथरुणातून बाहेर निघण्याआधीच आम्ही कुंग फु सराव सुरू करत असू. 

1924 मध्ये चीनचे इतर देशांशी युद्ध सुरू होते तेव्हा माझा जन्म झाला. स्वसंरक्षण शिकण्याची प्रेरणा मिळण्यासाठी तो काळ अगदी योग्य होता."

झँग ज्या प्रकारचे कुंग फु खेळतात, तो मूळचा फुजिआन प्रांतातील असून, त्यामध्ये 15 प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात 36 चाली आहेत. एक प्रकार पूर्ण शिकायला किमान 3 वर्षे लागतात असे झँग यांनी सांगितले. अर्थात, त्या सर्व प्रकारांमध्ये झँग या तरबेज आहेत!
 

व्हिडीओ गॅलरी