गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

या जाहिरातीमध्ये हिंदू देवता गणपती कोकराचे मांस खाताना दाखविले आहे. या जाहिरातीमुळे ऑस्ट्रेलियामधील हिंदू समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कॅनबेरामधील भारतीय उच्चायुक्तांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र, दळणवळण आणि कृषी या तीन खात्यांकडे तक्रार नोंदविली आहे.

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियामधील एका कंपनीने जाहिरातीमध्ये भगवान गणेशाला मांस खाताना दाखविल्याने भारताने या वादग्रस्त जाहिरातीविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारकडे अधिकृतरीत्या तक्रार नोंदविली आहे. 

या जाहिरातीमध्ये हिंदू देवता गणपती कोकराचे मांस खाताना दाखविले आहे. या जाहिरातीमुळे ऑस्ट्रेलियामधील हिंदू समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कॅनबेरामधील भारतीय उच्चायुक्तांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र, दळणवळण आणि कृषी या तीन खात्यांकडे तक्रार नोंदविली आहे. कोकराच्या मांसाची प्रसिद्धी करण्यासाठीच्या या जाहिरातीमध्ये येशू, बुद्ध आणि इतर काही धार्मिक व्यक्ती कोकराचे मांस खाताना दाखविले आहेत. 

शाकाहारी देवता मानल्या जाणाऱ्या गणपतीचाही यामध्ये समावेश केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचे भारत सरकारने तक्रारीत म्हटले आहे. मीट अँड लाईवस्टॉक ऑस्ट्रेलिया (एमएलए) या कंपनीने ही जाहिरात केली आहे. या कंपनीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की संशोधन आणि विचार करूनच आम्ही ही जाहिरात बनविली आहे. आमचा उद्देश समानतेला पाठबळ देण्याचा विचार असून, कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा नाही.