काबुलमध्ये बॉंबस्फोटांत 80 ठार

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाजवळ धमाका; 350हून अधिक जखमी

भारतीय दूतावासातील कर्मचारी सुरक्षित
काबुलमध्ये झालेल्या जोरदार बॉंबस्फोटात भारतीय दूतावासमधील कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नसल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. देवाची कृपा आहे की, काबुलमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात भारतीय दूतावासमधील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, असे ट्विट त्यांनी केले. दूतावासापासून 100 मीटर अंतरावर बॉंबस्फोट झाल्याची माहिती भारताचे काबुलमधील राजदूत मनप्रीत व्होरा यांनी दिली.

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे बुधवारी सकाळी ट्रक बॉंबस्फोटाने हादरले. भारतीय दूतावासापासून केवळ 100 मीटर अंतरावर झालेल्या या स्फोटात 80 लोक ठार झाले असून, 350पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती अफगाण आरोग्य मंत्रालयाने दिली.

हा हल्ला सकाळी घाईगडबडीच्या वेळेत झाला. घटनास्थळी मृतदेह विखुरले होते आणि परिसरातून धूर निघत होता. या भागात अनेक देशांचे दूतावास आहेत. स्फोटानंतर अनेक मिशनरी आणि घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावरील घरांच्या खिडक्‍यांच्या काचा फुटल्या.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी लोक आणि घाबरलेल्या शालेय मुली आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे अनेक गाड्या रस्त्यांवरच अडकल्या. त्याच वेळी आपल्या प्रियजनांच्या शोधासाठी महिला आणि पुरुष सुरक्षा तपासणीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सांडपाण्याच्या टॅंकरमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. हल्ल्याचे लक्ष्य अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमधील वाढती असुरक्षितता अधोरेखित केली आहे. देशाचा एक तृतीयांश भाग सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे. हल्ला झाल्यानंतर बराच काळ रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयात घेऊन जात होत्या, तर अग्निशामक दल इमारतींना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रयत्न करत होते.
आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ प्रवक्ते इस्माईल कावोसी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, रुग्णवाहिका अजूनही मृतदेह आणि जखमींना घेऊन रुग्णालयात येत आहेत. गृह मंत्रालयाने काबुलच्या लोकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा डोके वर काढणारा तालिबान आपले हल्ले वाढवित आहे.
अफगाणिस्तानच्या राजधानीत अलीकडे झालेल्या अनेक बॉंबस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (इसिस) घेतली आहे. यामध्ये 3 मे रोजी नाटोच्या गटाला लक्ष्य करण्यात आलेल्या बॉंबस्फोटाचाही समावेश आहे. यामध्ये किमान आठ लोक ठार, तर 28 जण जखमी झाले होते.

ट्विट
काबुलमधील दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटाचा आम्ही जोरदार निषेध करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी भारत अफगाणिस्तानसोबत उभा राहील. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींचा नायनाट करण्याची गरज आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान