ट्रम्प यांनी उडविली न्यायाधीशांची खिल्ली

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन राज्याचे ऍटर्नी जनरल बॉब फर्ग्युसन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सियटल येथील जिल्हा न्यायाधीश जेम्स रॉबर्ट यांनी ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशाला तात्पूर्ती स्थगिती दिली होती. ट्रम्प यांचा आदेश घटनाबाह्य असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन - सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्णयाला न्यायालयाने तात्पूर्ती स्थगिती दिल्यानंतर ट्रम्प यांनी स्थगितीचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशांची खिल्ली उडवत हा आदेश हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे मुस्लिम देशातील नागरिकांना प्रवेशबंदीची अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतर सुमारे 60 हजार नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र न्यायालयाने प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर ज्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे आहेत, अशा सर्वांना अमेरिकेत प्रवेशास परवानगी देण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.
 
वॉशिंग्टन राज्याचे ऍटर्नी जनरल बॉब फर्ग्युसन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सियटल येथील जिल्हा न्यायाधीश जेम्स रॉबर्ट यांनी ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशाला तात्पूर्ती स्थगिती दिली होती. ट्रम्प यांचा आदेश घटनाबाह्य असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. न्यायालयाचा हा आदेश संपूर्ण अमेरिकेत लागू होणार असल्यामुळे हा ट्रम्प प्रशासनाला बसलेला धक्का मानला जातो. 

अमेरिकेतील अनेक राज्यांमधील न्यायाधीशांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली असली, तरी "व्हाइट हाउस'ने मात्र न्यायाधीशांच्या निर्णयाच्या विरोधात शक्‍य तेवढ्या लवकर अपील करणार असल्याचे सांगितले. अध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन करताना "व्हाइट हाउस'ने म्हटले आहे, की देशाच्या हितासाठी निर्णय घेण्याचा अध्यक्षांना अधिकार आहे. अमेरिकेतील विधितज्ज्ञांनी ट्रम्प यांचा आदेश अमानवी असल्याचे सांगत त्याविरोधात भूमिका घेतली आहे. आपल्या आदेशाला स्थगिती देणाऱ्या न्यायाधीशांवर ट्रम्प यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

Web Title: amercica state department reverses visa ban