अमेरिकेकडून भारत आणि पाकमध्ये हेरगिरी- विकिलीक्स

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

जगभरातील सुमारे 193 देशांतील सत्ताधारी आणि परदेशी गट, राजकीय पक्ष, संघटना आणि इतर संस्थांची हेरगिरी करण्याची परवानगी या संस्थेला देण्यात आली होती.

वॉशिंग्टन : अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (NSA) इतर देशांतील राजकीय पक्षांची हेरगिरी करीत असून, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, तसेच पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांवर अमेरिका नजर ठेवून असल्याचा दावा विकिलिक्सने केला आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील गैरव्यवहार उघड करणाऱ्या विकिलीक्स या संस्थेने म्हटले आहे की, नॅशनल सिक्युरिटी एजन्सीवर अशा प्रकारच्या हेरगिरीची खास जबाबदारी सोपविण्यात आली आहे. NSA ने पाकिस्तानातील मोबाईल नेटवर्कची यंत्रणादेखील हॅक केली आहे असे सांगत विकिलीक्सने अमेरिकेचे पितळ उघडे पाडले आहे. 

विदेशी गुप्तचर पाहणी न्यायालयाने (FISA) 2010 मध्ये अमेरिकेतील NSA या संस्थेला हेरगिरी करण्याची परवानगी दिली होती. याद्वारे जगभरातील सुमारे 193 देशांतील सत्ताधारी आणि परदेशी गट, राजकीय पक्ष, संघटना आणि इतर संस्थांची हेरगिरी करण्याची परवानगी या संस्थेला देण्यात आली होती. दरम्यान, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांची हेरगिरी करण्याचा अधिकार मात्र या अमेरिकन संस्थेकडे नव्हता. उत्तर तुर्कस्तानमधील काही राज्यांमध्येही अमेरिका हेरगिरी करत असल्याचे विकिलिक्सने म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांसारख्या संस्थांच्या हेरगिरीचे कामही देण्यात आले होते, असा दावाही विकिलीक्सने केला आहे. 
 

Web Title: american agency spying on bjp in india