प्रवेशबंदीविरोधात अमेरिकी कंपन्यांची एकजूट

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन : सात मुस्लिम देशांतील नागरिकांसह निर्वासितांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्णयाच्या विरोधात अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयामुळे अमेरिकेतील उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता असल्याचा दावा करत ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात एकत्रित लढाई सुरू करण्याचे सुतोवाच ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्‌विटर, फेसबुक आणि इंटेल यांच्यासह इतरही आघाडीच्या कंपन्यांनी केले आहेत.

ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयाच्या विरोधात या कंपन्यांनी एकत्र येत अपिलीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या कंपन्यांच्या यादीमध्ये तंत्रज्ञान विषयक आणि बिगर तंत्रज्ञान विषयक कंपन्यांचाही समावेश आहे. ईबे, नेटफ्लिक्‍स आणि उबेर यांचाही शंभर कंपन्यांमध्ये समावेश आहे.

ट्रम्प यांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली असून, ती मागे घेण्याची ट्रम्प प्रशासनाची याचिकाही फेटाळून लावली आहे. अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांनीही आता ट्रम्प प्रशासनाच्या प्रवेशबंदीच्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने ट्रम्प विरुद्ध इतर सर्व अशी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.
अमेरिकेतील 50 वर्षांहून अधिक जुन्या विदेशी नागरिकांना प्रवेश देण्याबाबतच्या यंत्रणेने आजवर जपलेल्या मूल्यांना ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयामुळे धक्का बसला असल्याचे विविध कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

तसेच, प्रवेशबंदीच्या निर्णयामुळे अमेरिकेतील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्‍यता असून, त्याचा परिणाम नवे संशोधन, उद्योगांची वाढ आणि कार्यक्षमतेवर होणार आहे, असे म्हटले आहे. "फॉर्च्यून 500' कंपन्यांमधील 200 पेक्षा अधिक कंपन्यांची स्थापना ही निर्वासितांनी किंवा त्यांच्या मुलांनी केली आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले असून, त्यामुळे ट्रम्प यांचा प्रवेशबंदीचा निर्णय अमेरिकेतील कंपन्यांवर घाव घालणारा ठरू शकतो, असे म्हटले आहे.
प्रवेशबंदीच्या निर्णयावरील स्थगिती मागे घेण्यास न्यायालयाने नकार दिला असून, या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून अधिका माहिती घेतल्यानंतर पुढील निर्णय दिला जाईल, असे अपिलीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले आहे.

एकत्र आलेल्या कंपन्या

 1. फेसबुक
 2. गुगल
 3. ऍपल
 4. ट्विटर
 5. इंटेल
 6. मायक्रोसॉफ्ट
 7. ईबे
 8. नेटफ्लिक्‍स
 9. उबेर
 10. लेवी स्ट्रॉस
 11. चोबानी
Web Title: american companies unite against visa ban