अण्वस्त्रविरोधी "आयसीएन' संघटनेस शांततेचे नोबेल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

उत्तर कोरिया व अमेरिकेमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आण्विक शस्त्रांस ठाम विरोध करणाऱ्या संघटनेस दिले गेलेले हे नोबेल अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे

ऑस्लो - आण्विक शस्त्रास्त्रे नष्ट करावीत, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु करण्यात आलेल्या मोहिमेस (आयसीएन) या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

आयसीएन ही जगभरातील 100 पेक्षाही जास्त देशांमधील बिगरसरकारी संस्थांची संघटना आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कामकाज सुरु केलेल्या या संघटनेच्या निर्मितीची औपचारिक घोषणा व्हिएन्ना येथे 2007 मध्ये करण्यात आली होती. "सध्याच्या जगात आण्विक शस्त्रांचा वापर होण्याची भीती याआधी कधी नव्हती इतकी आहे,'' असे मत बेरिट रेस अँडरसन या नोबेल समितीच्या नेत्याने आयसीएनला नोबेल प्रदान करण्याची घोषणा करताना व्यक्त केले.

आण्विक शस्त्रांवर प्रतिबंध आणण्यासंदर्भातील संयुक्‍त राष्ट्रसंघाचा करार स्वीकरण्याची घोषणा गेल्या जुलै महिन्यात केली होती. मात्र अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन या जगातील प्रमुख अण्वस्त्रसज्ज देशांनी या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. याचबरोबर, उत्तर कोरिया व अमेरिकेमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आण्विक शस्त्रांस ठाम विरोध करणाऱ्या संघटनेस दिले गेलेले हे नोबेल अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.