जर्मनीमध्ये 'उगवला' कृत्रिम सूर्य

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

बर्लिन : जर्मनीमधील शास्त्रज्ञांनी अतिउच्च क्षमतेचे अनेक स्पॉटलाइट एकत्र तयार केलेला कृत्रिम सूर्य 'सुरु' केला आहे. 'सिनलाइट' असे या प्रयोगाचे नाव असून जर्मनीतील युलीश येथे त्याची अंमलबजावणी होत आहे. प्रदूषणमुक्त ऊर्जानिर्मिती करणे, हा प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रयोगासाठी जगातील सर्वाधिक क्षमता असलेले 149 फिल्म प्रोजेक्‍टर (झेनॉन शॉर्ट-आर्क लॅम्प) एकत्र करण्यात आले आहेत. मधमाशांच्या पोळ्याच्या रचनेप्रमाणे या सर्वांची जोडणी केली असून या प्रत्येक प्रोजेक्‍टरची क्षमता सरासरी बल्बपेक्षा चार हजार पटींने अधिक आहे.

जर्मन एअरोस्पेस सेंटर (डीएलआर) यांनी या प्रयोगाची जुळणी केली असून पृथ्वीवर पोचणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या दहा हजार पट अधिक ऊर्जा असलेला प्रकाश निर्माण करण्याचे या प्रयोगाचे ध्येय आहे. सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न होत असला तरी सध्याचे सौरघट फारसे परिणामकारक ठरत नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकाधिक ऊर्जेचा वापर करता यावा, यासाठी हा प्रयोग करणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रयोगादरम्यान सर्व प्रोजेक्‍टरची दिशा 20 सेमी बाय 20 सेमी आकाराच्या चौरस क्षेत्रावर केंद्रित केली जाणार आहे. यामुळे जगातील सर्वांत मोठा असलेला हा कृत्रिम सूर्य सुरू करताच त्यामुळे तब्बल 3500 अंश सेल्सिअस तापमान निर्माण होण्याचा अंदाज आहे. हा प्रयोग अत्यंत धोकादायक असल्याने तो बंद खोलीत केला जाणार आहे. या प्रयोगातून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. या प्रयोगाचा निष्कर्ष लवकरच जाहीर केला जाणार आहे.

Web Title: artificial sun rise in germany