"जी 20' मध्ये "मोदी-शी' चर्चा होणार नाही: चीन

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून द्विपक्षीय संबंधांत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मोदी व शी यांच्यामध्ये चर्चा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता

नवी दिल्ली - भारत व चीनमध्ये सध्या असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर जर्मनीत लवकरच होणाऱ्या जी-20 परिषदेमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार नाही, असे चीनकडून आज (गुरुवार) स्पष्ट करण्यात आले. शी-मोदी भेटीसाठी "चांगले वातावरण' नसल्याचे मत चिनी परराष्ट्र मंत्रालयामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

भारत-भूतान व चीन या देशांच्या सीमारेषा एकत्र येत असलेल्या (ट्रायजंक्‍शन) ठिकाणी भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून द्विपक्षीय संबंधांत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मोदी व शी यांच्यामध्ये चर्चा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र चीनकडून व्यक्त करण्यात आलेल्या या भूमिकेमुळे या अंदाजास पूर्णविराम मिळाला आहे.  

सिक्कीममधील डोकलाम भागात हद्दीच्या वादातून जवळपास एक महिन्यापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे. भारत आणि चीनमधील हा वाद योग्यरीतीने न हाताळल्यास त्याची परिणती युद्धात होऊ शकते, असे चीनमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांमधील सैन्य 1962 नंतर सर्वप्रथमच सर्वाधिक काळ एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

सिक्कीममधील वादग्रस्त भागामधील आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने "विनायुद्ध स्थितीतील' काही सैन्य तुकड्या येथील डोका खिंडीमध्ये तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत-चीन दरम्यान सीमेवरील "ट्राय-जंक्‍शन पॉइंट्‌स'(जेथे तीन देशांच्या हद्दी मिळतात) निश्‍चित करण्याच्या संदर्भात उभय देशांत 2012 मध्ये झालेला करार आधारभूत मानण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार असे तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करताना संबंधित तिसऱ्या देशाबरोबर सल्लामसलतीची तरतूद आहे. त्यामुळे असा एखादा तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न हा या कराराचा भंग असल्याचे स्पष्ट करून भारताने चीनचा पर्दाफाश केला आहे. तसेच या परिसरात "जैसे थे' स्थिती राखण्याचे आवाहन केले आहे.