ब्रिटीश संसदेसमोर हल्ला; हल्लोखोरासह 1 ठार, 12 जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

लंडनमधील सर्वाधिक सुरक्षित अशा ब्रिटीश पार्लमेंटसमोर आज (बुधवार) दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. बीबीसी आणि द गार्डियन या लंडनमधील अग्रेसर प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

लंडन : लंडनमधील सर्वाधिक सुरक्षित अशा ब्रिटीश पार्लमेंटसमोर आज (बुधवार) दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. बीबीसी आणि द गार्डियन या लंडनमधील अग्रेसर प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

हल्ल्यात एकूण बारा लोक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्याची अधिक माहिती मिळेपर्यंत हा दहशतवादी हल्ला समजला जाईल, असे ब्रिटीश पोलिसांनी म्हटले आहे. ब्रिटीश संसदेबाहेर सुरक्षिततेसाठी नेमलेल्या पोलिसांनी तातडीने गोळीबार करून हल्लेखोराला ठार मारले असल्याचेही वृत्त आहे.

हल्लेखोराने वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून ब्रिटीश संसदेच्या दिशेने कूच केले. त्याने वाटेत अनेक पादचाऱयांवर चाकूहल्ला केला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, असे 'बीबीसी'ने म्हटले आहे. हल्लेखोराने पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरकडे येताना एका पोलिसाला भोसकले. हल्लेखोराने आणखी पुढे येण्याच्या आत पोलिसांनी गोळ्या घालून त्याला संपवले.

हल्ल्याची घटना घडली, तेव्हा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे संसदेतच होत्या. त्या सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना संसदेच्या आवारात चंदेरी रंगाच्या जग्वार मोटारीतून सुरक्षित स्थळी नेण्यात आले, त्यावेळी संसद परिसरात गोळीबाराचे आवाज आल्याचेही 'बीबीसी'ने म्हटले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे कामकाज स्थगित करण्यात आले. अनेक संसद सदस्य सभागृहांमध्येच अडकून पडले आहेत.

बेल्जियमधील ब्रुसेल्समध्ये गेल्या वर्षी 22 मार्च रोजी आत्मघाती दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले होते. त्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच ब्रिटीश संसदेसमोर हल्ल्याची घटना घडली आहे.