ऍडॉल्फ हिटलरच्या जन्मस्थळाचे करायचे तरी काय?

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नाझी हुकूमशहाचे हे जन्मस्थान "नव्या नाझीं'साठी प्रेरणास्थान ठरण्याची भीती येथील सरकारला आहे. मात्र आता ताब्यात घेतलेल्या या इमारतीचे काय करावयाचे, याबद्दल अद्याप ऑस्ट्रियामध्ये धोरणात्मक अस्पष्टता आहे

व्हिएन्ना - जर्मनीचा कुप्रसिद्ध हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर याचे जन्मस्थान असलेली ऑस्ट्रियामधील इमारत अखेर ताब्यात घेण्यासंदर्भातील कायदा येथील संसदेने केला आहे. हिटलर याचा जन्म या तीन मजली इमारतीमध्ये 1889 मध्ये झाला होता.

या इमारतीच्या मालक गेर्लिंड पोमेर या आहेत. पोमेर यांनी ही इमारत विकण्यास अथवा तिचे नव्याने बांधकाम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र आता त्यांना मोठी नुकसानभरपाई दिली जाणार आहे. पोमेर व ऑस्ट्रियन सरकारमध्ये या इमारतीवरुन मोठा संघर्ष झाला होता. या इमारतीचा ताबा घेण्यासाठी येथील सरकारांकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. अंतिमत: संसदेतील कायद्यान्वये ही इमारत सरकारकडून ताब्यात घेतली जाणार आहे.

नाझी हुकूमशहाचे हे जन्मस्थान "नव्या नाझीं'साठी प्रेरणास्थान ठरण्याची भीती येथील सरकारला आहे. मात्र आता ताब्यात घेतलेल्या या इमारतीचे काय करावयाचे, याबद्दल अद्याप ऑस्ट्रियामध्ये धोरणात्मक अस्पष्टता आहे. ही इमारत जमीनदोस्त करण्यापासून ते विविध कार्यांसाठी वापरण्यात यावी, असे विविध मतप्रवाह यासंदर्भात दिसून आले आहेत. ही इमारत जमीनदोस्त केल्यास ते कृत्य ऑस्ट्रियाचा नाझी इतिहास नाकारण्यासारखे ठरेल, असे मत या प्रकरणी सल्ला देण्यासाठी नेमण्यात आलेल्या इतिहासकारांच्या समितीने व्यक्‍त केले आहे. याशिवाय, या इमारतीचे वारसास्थळ म्हणून जतन करण्यात यावे, अशी मागणी येथील अनेक सांस्कृतिक संस्थांनी केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, आता या इमारतीसंदर्भात ऑस्ट्रियाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल कुतूहल आहे.

टॅग्स